बायंगी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जुलै २०१५

बायंगी - मराठी कथा | Bayangi - Marathi Katha - Page 4

मी सगळे शांतपणे ऐकले पण माझी सुई त्या बायंगीच्या अमानवीय मागणीवरच अडकली होती. त्याने असे काही मागितले जे मंदार देवू नाही शकला तर पुढे काय? हा प्रश्न मला छळु लागला. मी तसे त्याला बोलुनही दाखवले पण त्याने माझे म्हणणे उडवून लावले तो म्हणाला तु उगाचच काळजी करतोयस, त्याने तसे काहीच मागितले नाही आजपर्यंत. पण याचा अर्थ तो पुढे मागणार नाही असे नाही होत. मी माघार घेत नाही हे पाहुन त्याने बघु रे मागेल तेव्हा, तु चहा तर घे पाहू आधी, म्हणत विषयाला बगल दिली. माझे मन आतुन ओरडून ओरडून सांगत होते की काहीतरी अनिष्ट घडणार आहे. पण त्यावेळी मी गप्प बसणेच उचित समजलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी मंदारला समुद्रावर भेटायला बोलवले. थोडा नाखुशीनेच तो आला. “कालचा विषय काढणार असशील तर मी निघतो” आल्या आल्याच तो म्हणाला. मी नाही काढणार म्हटल्यावर तो बसला. थोडा वेळ कोणी काहीच बोलले नाही. मग न राहवुन तो म्हणाला, बोल काय बोलायचे आहे तुला ते. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी त्याला विचारले, “हे बायंगी काम कसं करतं? म्हणजे ते तुला श्रीमंत कसे बनवते?” तो म्हणाला. ‘ते आपल्या साठी सर्व काही अनुकुल करते. पैश्याची संधी उपलब्ध करुन देते. आधी त्याने माझ्या सासऱ्याला आणि बापाला नरम केला त्यामुळे दोघांचा मला सपोर्ट मिळाला. एक बिझनेस प्रपोझल चालून आले, त्यात गुंतवायला सासऱ्यांनी भांडवल दिले. तिप्पट फायदा झाला. सासऱ्याचे पैसे परत केले. सट्टयामधे पैसे लावले तिथे पाचपट कमावले. असे करत करत शॉर्टकटने आज इथे पोहोचलो. बिघडलेल्या नाशिबाला सुधारायचे काम ते भुत करते’. अरे पण असे शॉर्टकटने कमावलेले टिकत नाही मित्रा त्याची खुप मोठी किंमत चुकवावी लागते, मी म्हणालो. अगदी त्या बाबासारखाच बोलतोस हा तू पण! अरे माझी बायको उपाशी होती घरातच काय चायनिजच्या गाडीवर शिजवून लोकांना खायला घालायला पण अन्न शिल्लक नव्हतं. मग मला जे योग्य वाटले ते मी केले. तु म्हणतोस ते अगदी बरोबर आहे रे, पण पोटच्या भुके पुढे हा विचार माझ्यासाठी क्षुल्लक होता. मंदार भावुक होवून रडु लागला तसा मी अजुन काही बोलण्यात अर्थ नाही हे समजून गप्प बसलो.

एकदा ते बायंगी बघायची मला इच्छा झाली पण त्या बाबाने त्याला लपवून ठेवण्यास सांगितले असल्याने तो विचार मी डोक्यातून काढून टाकला. रजा संपत आल्याने मी पुण्याला परत निघालो पण निघण्याआधी मंदारला थोडे सावध राहण्यास सांगितले आणि अशीच काही आवाक्याबाहेरील मागणी जर भूताने केलीच तर लगेच नाही म्हणू नकोस तर थोडा वेळ मागुन घे असे सांगितले. शक्य असेल तर ते भुत वेळीच परत कर, कमावलेस ते पुष्कळ आहे. आता हा शॉर्टकट बस झाला. ठीक आहे बघु कसे काय ते, म्हणुन माझा त्याने निरोप घेतला. पुढे कामाच्या व्यापात तीन चार महिने रत्नागिरीला जाणे जमले नाही आणि एक दिवस अचानक तुषारचा मला फोन आला आणि ती दु:खद बातमी कळली. मंदारचा शून्यात हरवलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. शेवटी बायंगीने आपला डाव साधला होता. माझ्या मनाने दिलेला कौल दुर्दैवाने खरा ठरला होता.