बायंगी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जुलै २०१५

बायंगी - मराठी कथा | Bayangi - Marathi Katha - Page 3

अरे तुला माझी अवस्था तर माहीतच होती. एकीकडे एडमिशनस होत नव्हत्या आणि दुसरीकडे चायनीजचा धंदा पण होत नव्हता. चौकातच ८ चायनीजच्या गाड्या लागल्यावर काय धंदा होणार? असाच एक दिवस गिऱ्हाइकाची वाट पाहत बसलो असताना माझा कॉलेजचा एक मित्र चायनीज खायला आला. सहज गप्पा मारताना मी त्याला माझी परिस्थिती सांगितली तसा तो मला म्हणाला की, १० हजार रुपये खर्च करू शकत असशील तर एक उपाय आहे. तुझे नशीब पालटलेच म्हणुन समज. १० हजार म्हटल्यावर मी गप्पच बसलो. तो म्हणाला की माझ्या बरोबर लांज्याला चल, तिथे एक माणुस आहे जो बायंगी भुत देतो, तु जे मागशील ते भुत तुला देईल. हो-नाही करत मी तयार झालो. म्हटले एकदा जाऊन भेटायला काय हरकत आहे? पुढच्या पौर्णिमेला तो मला लांज्यातील एका माणसाकडे घेऊन गेला. झोपडीवजा त्याचे घर पाहुन मला शंका आली. जर हा लोकांचे एवढे भले करतो तर याची ही अवस्था का? पण काही न बोलता मी मित्रासोबत आत गेलो. आतमध्ये साधारण पन्नाशीचा एक माणुस कॉटवर बसला होता. आम्हाला पाहताच त्याने समोरच्या मोडक्याशा खुर्च्यांवर बसायला सांगितले. काही वेळ माझ्या चेहऱ्याकडे तो एकटक पाहात राहिला जणू काय माझा चेहराच वाचत होता. पाच एक मिनिटांनी तो म्हणाला की तुम्हाला बायंगी धार्जिणे नाही, द्यायला ते तुम्हाला भरपूर काही देईल, पैसा अडका, गाडी, सुख; जे म्हणाल ते देईल पण नंतर तुमच्याकडे ते आपली इच्छा पूर्ण करण्याची विनंती करेल ती पुर्ण करण्यास जर का तुम्ही चुकलात तर मग ते तुम्हाला त्रास देईल आणि तो साधा सुधा नसेल. त्यामुळे तुम्ही बायंगी न नेलेलेच बरे. असे म्हणुन त्या माणसाने आम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला. पण खुप गयावया केल्यावर तो बायंगी द्यायला तयार झाला. पुढच्या पौर्णिमेला १० हजार घेऊन या आणि सोबत बायंगी घेऊन जा पण लक्षात ठेवा झटपट मिळालेले शाश्वत नसते तर आयुष्यासारखेच क्षणभंगुर असते.

माझ्याजवळ १ महिना होता, त्यात मला १० हजारांचा जुगाड करायचा होता. मग बायकोचे मंगळसुत्र गहाण ठेवले तरी ५ हजार रुपये कमी पडत होते मग चायनीजची गाडी विकून आणि थोडे मित्रांकडून उसने पैसे घेऊन १० हजार रुपये जमवले आणि ठरल्याप्रमाणे पौर्णिमेला त्या माणसाकडे गेलो. त्याने मला एका रिंगणात बसवले अंगावर एक पंचा घ्यायला सांगितले नंतर नजर लागू नये म्हणुन दारावर लिंबू मिरची सोबत काळी बाहुली बांधतात तशीच पण पांढऱ्या कापडाची एका बाहुली त्याने माझ्या बाजूला बसवली त्याने तिच्या पण अंगावर छोटे पंचासारखे वस्त्र ठेवले नंतर माझ्या आणि त्या बाहुलीच्या कपाळाला कसला तरी काळपट लालसर टिळा लावला. नंतर धारीवाले एक लिंबू त्याने हातात धरले आणि डोळे मिटून काही मंत्र वगैरे पुटपुटु लागला. नंतर त्याने ते लिंबू उभे चिरले आणि त्या बाहुलीवर पिळले त्याबरोबर त्या बाहुलीत हालचाल होऊ लागली. ते पाहुन मी चांगलाच टरकलो पण त्याने मला न हलण्यास सांगितले. ती बाहुली आता भारली गेली होती. त्याने तिच्याकडे पाहत परत काहीतरी पुटपुटायला सुरवात केली आणि माझ्याकडे बोट केले तसे त्या बाहुलीने मान वळवून माझ्याकडे पहिले. तो प्रकार पाहुन मला चांगलाच घाम फुटला होता. जसे त्याचे अनुष्ठान संपले तसे ती बाहुली पुन्हा निर्जीव झाली. माझ्या हातात ती बाहुली देऊन त्याने मला ती कोणाला न दाखवता घरात लपवून ठेवण्यास सांगितले. त्याला १० हजार रुपये देवून आम्ही निघणार तोच त्याने मला थांबवले म्हणाला की, ‘त्या बायंगीने सांगितलेली प्रत्येक इच्छा जर का तु पुरी करू शकलास तर मग पुढे तुला कधीच मागे वळून बघायची गरज नाही पण ते शेवटी एक भुत असल्यामुळे त्याची इच्छा अमानवीय असण्याचीच जास्त शक्यता आहे तेव्हा थोडे सांभाळून’. आणि अशा प्रकारे मी त्याला घरी घेऊन आलो आणि आज हे सगळे वैभव आहे. दोन्ही घरात आम्हाला आता यायची-जायची परवानगी आहे. आणि त्या बायंगीच्या मागण्या अगदीच शुल्लक आहेत. दर पौर्णिमेला कधी कोंबड तर कधी नारळ कधी मटन. तर हे सगळे असे आहे बघ.