MarathiMati.com - Android App on Google Play Store

बायंगी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जुलै २०१५

बायंगी - मराठी कथा | Bayangi - Marathi Katha - Page 2

काही दिवसांनी मंदारचे राणी बरोबर प्रेम जुळल्याचे समजले. राणी दिसायला अगदीच सामान्य आणि खुपच बारीक होती, अगदी पाप्याचं पितर म्हणतात ना तशी, तर मंदार खुप देखणा होता. त्यांची जोडीच विजोड वाटायची. सर्वांनी मंदारला खुप समजावले पण ‘दिल आए गधी पे तो परी क्या चीज है’ अशी मंदारची अवस्था झाली होती. मंदार आपल्या मतावर ठाम होता, शेवटी आम्ही त्याला समजवायचा नाद सोडला. राणीचे वडील खुप श्रीमंत होते तर मंदारचे वडील मध्यमवर्गीय पण जमदग्नीचा अवतार. त्यांना मंदारचे प्रेम प्रकरण कळल्यावर त्यांनी खुपच आकांडतांडव केले, तेव्हा मंदार आणि राणीला पळून जाऊन लग्न करण्याव्यतिरिक्त काही उपायाच उरला नव्हता. गणपतीपुळ्याला जाउन त्या दोघांनी लग्न केले. मंदारच्या वडिलांनी त्यांच्यासाठी घराचे दरवाजे बंद केल्यामुळे दोन दिवस त्यांनी एका मित्राकडे काढले. नंतर लगेचच एक घर भाड्याने घेऊन त्यांनी आपला संसार थाटला. सुदैवाने मंदारला एकलव्य या शैक्षणिक संस्थेत नोकरी लागली होती. प्रत्येक एडमिशनसाठी दोन हजार रुपये त्याला मिळायचे. नेटाने ते संसार करू लागले. सुरवातीला सगळे ठीक होते पण दुर्दैवाने पुढे पुढे एडमिशनस् कमी मिळू लागल्या आणि खर्च भागवताना मंदारची ओढाताण होऊ लागली. साठवलेल्या पैशातून त्याने चायनीजची गाडी टाकली. दिवसभर एडमिशन मिळवण्यासाठी फिर फिर फिरायचा आणि संध्याकाळी चायनीजची गाडी चालवायचा. बिच्चारा संसाराचा गाडा ओढताना पुरता पिचुन निघाला होता पण त्याच्या चेहऱ्यावर कधी पश्चात्ताप नाही दिसला, की त्याने कधी आपल्या नाशिबाला दोष नाही दिला. खुप वाईट वाटायचे त्याचे, कष्ट तर खुप करायचा पण त्याला मनासारखे फळ काही मिळत नव्हते.

पुढे रत्नागिरी सोडुन नोकरी निमित्त मी पुण्याला आलो आणि आमचा संपर्क जवळ जवळ तुटला. जवळपास सात आठ महीन्यांनी मी रत्नागिरीला घरी गेलो होतो. संध्याकाळी समुद्रावर भेळ खात बसलो असताना कोणी तरी मला हाक मारली. आवाज ओळखीचा वाटला म्हणुन वळुन बघतो तर गर्दीत ओळखीचे कोणीच दिसेना. परत हाक ऐकू आली. आवाजाच्या दिशेने पाहातो तर मंदार मारुती एस्टीम मधुन हात हलवताना दिसला. मला तर शॉकच बसला. वर्षभरापुर्वी ज्याचे खायचे वांदे झाले होते तो आज नव्याकोऱ्या कार मध्ये बसला होता. गळ्यात सोन्याची चेन बोटात अंगठी आणि झकपक कपडे घातलेला मंदार एकदम देखणा दिसत होता. श्रीमंतीचे तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते. आपले ठेवणीतले हास्य ओठांवर आणत तो कार मधुन उतरला आणि मला मिठी मारून म्हणाला, कसा आहेस? आणि कधी आलास पुण्याहून? मी त्याच्याकडे पाहातच बसलो. म्हणाला पाहतोस काय असा? ओळखलेस नाही की काय मला? कारच्या दुसऱ्या दरवाज्यातून गणेशोत्सवातल्या गौरी सारखी दागिने आणि उंची साडी नेसलेली राणी उतरली. श्रीमंती माणसाला सुंदर पण बनवते असे उगाच मला वाटुन गेले. अजुनही मी त्या धक्यातून सावरलो नव्हतो. मी म्हटले, अरे मंदार! काय लॉटरी बीटरी लागली की काय? नवीन गाडी, अंगावर एवढे सोने हा काय प्रकार आहे? ‘सांगतो, सगळे सांगतो. आधी घरी तर चल’ असे म्हणत मंदारने मला कारमध्ये बसवले. एका छानश्या घराच्या गेट समोर गाडी थांबली. गेट मधुन आत जाताना अनिमिष नेत्रांनी मी त्याचे वैभव पाहत होतो. घरासमोर छोटासा पोर्च होता, डाव्या बाजूला हिरवीगार लॉन केली होती, त्यावर स्प्रिंकलर बसवले होते. लॉनच्या कडेला एक कारंजे होते ज्यात मध्यभागी एक जलपरी होती आणि साइडने चार डॉलफिन मासे बसवले होते. त्या माशांच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या जलधारांमधे ती जलपरी न्हाऊन निघत होती. मंदारच्या आवाजाने मी भानावर येत घराच्या पायऱ्या चढत दीवाणखान्यात आलो. घर एकदम मस्त सजवले होते. आत तीन पॉश अटॅच्ड बेडरूमस्, एक किचन आणि ऐसपैस हॉल होता. सगळ्या आधुनिक सेवा आणि दिमतीला नोकर-चाकर हजर होते. मला सोफ्यावर बसायला सांगुन राणी चहा नाश्त्याचे बघायला किचन मध्ये गेली. इतका वेळ दाबुन ठेवलेली उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. माझी अधीरता ओळखुन मला फार काळ ताटकाळत न ठेवता मंदार बोलू लागला.

MarathiMati.com - Android App on Google Play Store