विवेकवादाचे बळी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जानेवारी २०१६

विवेकवादाचे बळी - मराठी लेख | Vivekvadache Bali - Marathi Article - Page 2

म्हणून हा प्रश्न कोण्या एका चळवळीचा, गटाचा, पक्षाचा, धर्माचा नसून एका लोकशाही देशाचा प्रश्न आहे. आजपर्यंत आपल्या देशाचा इतिहास पाहिल्यास त्यातून आपल्याला हे स्पष्टपणे दिसते की, आमच्यावर कोणतेही आक्रमण चालणार नाही. धर्मात केलेली ढवळाढवळ खपवून घेतली गेली नाही. मग ते मुस्लीम आक्रमण असो की वैदीक आक्रमण हेच अधोरेखीत होते.

या तीनही विचारवंताचे काम हे धर्मातील अनिष्ठ चालीरिती अंधश्रद्धा यातून धर्माची मुक्तता करुन एक विवेकवादी समाजाची निर्मिती करणे हा एक समान कार्यक्रम या विचारवंताच्या विचारधारेत दिसतो. म्हणून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या हा समाजाला लागलेला एक कलंक असून ही केलेली एक विचाराची हत्या आहे.

फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर, रानडे, गोखले, टिळक यांच्यापासून सुरु झालेली महाराष्ट्रातील समाजसुधारणेची चळवळ ही वादविवादाकडून-सुसंवादाकडे गेलेली दिसते. परंतु मनुवादीची विचारसरणीची पिल्लावळ ही वादविवादाची चळवळ जाणीवपूर्वकरित्या विसंवादाकडे नेत आहे.

म्हणून २१व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना दाभोलकरांची सुरु केलेली विवेकवादी चळवळ कलबुर्गी पर्यंत येवून थांबते आणि इथल्या राज्यकर्त्यांना विचारते आहे की, देशात अजुन किती दाभोलकर होणार.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा उलगडा न होणे हे एक गुपीतच आहे. जे गुपीत सुसंस्कृत नागरिक समजून घेवू शकतो. यांची ज्या प्रकारे हत्या झाली. त्यामध्ये एक समान धागा दिसतो तो म्हणजे मारेकरी हे मोटारसायकलवरुन आले होते आणि पाठीमागून गोळ्या घालून क्षणात पसार झाले. पण शीना बोरा हत्याकांडासारख्या गुन्ह्यामध्ये ज्यापद्धतीने तपासाची चक्रे फिरली आणि प्रसारमाध्यमांच्या झगमगटीमध्ये ज्या पद्धतीने पोलीस अधिकारी तपासाची माहिती देत होते. दिवसेंदिवस नवनवीन माहिती उलगडत होती. परंतु या उलट परिस्थिती या तीनही घटनांमध्ये आपल्याला दिसते. याचे कारण तपासासाठी देशातील यंत्रणेला सक्षमपणे काम करु दिले जात नाही आणि राजकीय हस्तक्षेपाशिवाय तपास यंत्रणाने काम केल्यास मला वाटत नाही की, मारेकरी सापडणार नाहीत आणि यातील तिसरा महत्वाचा दुवा म्हणजे तपास यंत्रणा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने तपास करीत आहेत. त्यांच्यामध्ये कुठलाही समन्वय नाही आणि झालेली घटना ही एकाच अनुषंगाने घडली असतानाही तपास यंत्रणा जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत असल्याचे दिसते. म्हणून मुळ मुद्दाच हा आहे की, ही एक पद्धतशीरपणे शांत डोक्याने केलेली विचारांची हत्या आहे. ज्या विचारप्रणालीने हे सर्व घडवले आहे. त्या विचारसरणीचा अभ्यास केल्यास त्यातून एकच जाणवते ते म्हणजे आम्हाला जे विचार मान्य नाही ते विचार आम्ही हत्येने नष्ट करु असा मारेकर्‍यांचा उद्देश दिसतो.

म्हणून कोणताही विचार हा ती व्यक्ती मृत झाली म्हणून मरत नाही, कोणताही विचार हा हिंसेने नष्ट करता येत नाही. हेच पुन्हा एकदा ज्या उम्मेदीने मुक्ता आणि हमीद हे दाभोलकर डॉक्टरांच्या हत्येनंतरही काम करीत आहेत त्यावरुन याची प्रचिती येते.

म्हणून सरकार नावाचे जे घट्ट त्वचेचे भूत संवेदना शून्य होऊन राज्यकारभार करीत आहेत त्यांनी आपल्या संवेदना जागृत ठेऊन कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या राजकीय दबावाला न डगमगता निःपक्षपद्धतीने तपास करुन मारेकर्‍यांना शोधून पुन्हा एकदा समाजमन कसं समृद्ध आणि सौहार्दपूर्ण होईल याची काळजी घ्यावी.