Download MarathiMati.com's New Android App from Google Play

थर्ड बेल - पींडाला कावळा शिवला नाही

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ मार्च २०१०

थर्ड बेल - पींडाला कावळा शिवला नाही - मराठी लेख | Third Bell - Marathi Article

मुळात संवेदनांचा भावार्थ न उमगलेली मंडळी जेव्हा ज्वलंत दु:खावर मायेची खोटी फुंकर घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात तेव्हा, खरोखरच पींडाला कावळा शिवला नाही असे नकळत सुचलेले पण प्रचलीत बोल एखादा प्रसंग जिवंत करुन जातात.

हा प्रसंग आपणास नवीन नाही, जर आपण कळपा-कळपाने कुच करणारे समाजवीर असाल तर हा विषय अगदीच अखत्यारीतला. माणूस मेल्यानंतर त्याची पुरती विल्हेवाट लावण्यासाठी समाज कार्याचा झेंडा मिरवणारी मातब्बर मंडळी अंत्यविधी सारख्या प्रसंगांना न चुकता हजेरी लावतात.

मुळात संवेदनांचा भावार्थ न उमगलेली मंडळी जेव्हा ज्वलंत दु:खावर मायेची खोटी फुंकर घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात तेव्हा, खरोखरच पींडाला कावळा शिवला नाही असे नकळत सुचलेले पण प्रचलीत बोल एखादा प्रसंग जिवंत करुन जातात.

रडारड, बायकांची जबर गर्दी, घरातल्या अंगणात मृतदेहाला उकळत्या पाण्याने आंघोळ घातली जाते, नंतर नवीन कपडे, अंगावर हार-फुले, तिरडीवर मृतदेहाची ही सजावट सुरु असतांना.. अवघ्या तीन फुटावर किसन भाऊंना तंबाकु मळतांना बघून कुठल्याही माणूस प्राण्यास त्यांच्या निडर काळजाचा हेवा न वाटल्यास नवलच. मृतकाच्या नातलगांची देहबोली आरडा-ओरडा करुन सांगत असते आमच्या घरात दु:ख आहे हो! पण चेहरा आणि नजर मात्र बॅक स्टेज कलाकाराप्रमाणे थर्ड बेल देण्यासाठी सज्ज असते. असो..

हळूहळू कळपातील माणसे गोळा होत जातात, पांढरी टोपी, पांढरा सदरा त्यात फाटका पण पांढरीच बनीयन आणि हो पांढरा पायजमा. “अवाढव्य शरीर यष्टीची माणसे अशा नाजुक प्रसंगी कशी धावत येतात?” या नुसत्या कल्पनेने थोडी घेरी आल्या सारखे होते. (याच मृतदेहात दोन दिवसापुर्वी संवेदना असतांना मात्र या संवेदनांची किंमत फक्त काही चिमुटभर माणसांची आणि असंवेदनशील मृतदेहाची किंमत..?) घरातल्या अंगणात जमलेला कळप आता बुडाला झटकत आपापली जागा सोडतात.. राम नाम सत्य हे.. राम बोलो भाई राम.. प्रत्येकास जमेल ते. आळी-पाळीने खांदा बदलला जातो.. कसा-बसा मृतदेह नदीवर पोहोचतो.

गावातली मान्यवर मंडळी अगोदरच लाकडांचा आहेर घेवुन तयारीत असतात, डालडाचा डबा उघडला जातो. मृतदेहाला लाकडांच्या ढीगावर झोपवण्याचं काम गावातली जेष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी करतात. मृतदेहाचे पाय आणि कपाळ कोणत्या दिशेला असावे हा सल्ला त्यांचाच. त्यांच्या सहकार्याने मृतदेहाला मुखाग्नी दिला जातो, सरपन व्यवस्थित पेटल्याची खात्री होताच काही जण काढता पाय घेतात आणि काही कपाळमोक्ष होईपर्यंत थांबतात, आजचा कार्यक्रम इथेच थांबतो.

मृताच्या नातेवाईकांसह इतर सर्व घराकडे वळतात.

पुढल्या दिवशी सकाळीच मृतदेहाची राख सावडण्याचा कार्यक्रम होतो, राख/अस्थी एका रुमालात किंवा मातीच्या भांड्यात गोळा केली जाते.

बाळू बामनाच्या आदेशानुसार राखेचे विसर्जन गंगेत केलेले उत्तम (याने मृतात्म्यास मुक्ती मिळते) तेव्हा ‘टॉप लेव्हल चे कलाकार’ ही मोहीम फत्ते करतात अस्थी विसर्जित करतात.. घरी येतात.

आजचाही कार्यक्रम इथेच संपतो.

आता १० दिवस ओलांडून गेलेले असतात, दशक्रियेची तयारी सुरु झालेली असते.

नदी शेजारच्या आवनात एक मांडव उभारण्यात आलेला असतो, “हॅलो-हॅलो माईक टेस्टींग” प्रवचनकार आपला आवाज सर्वांपर्यंत पोहोचला जावा याची खटाटोप करीत असतात, पान नं.१४७ उघडून ठेवलेले असते. प्रवचनकारांच टेस्टींग मात्र फेल गेलेलं असतं. काही तांत्रिक कारणांमूळे माईकची बॅटरी काढावी लागते, तरीही काही सामाजिक कार्यकर्ते तातडीने गावाबाहेर जावुन एका जनरेटरची सोय करतात. पुन्हा “हॅलो-हॅलो माईक टेस्टींग” मात्र जनरेटरचा आवास्तव आवाज ही टेस्टींग देखील फेल करतो.

मृतकाच्या जवळच्या नातेवाईकाच्या शेटची एन्ट्री होताच ‘महाराज’ प्रवचनाची सुरूवात करतात (बॅकग्राउन्ड मध्ये जनरेटरचा आवाज सुरू असतो) प्रवचन सुरू असतांनाच काही मान्यवरांचे आगमन होते, गर्दीचा आढावा घेत ते मांडवात प्रवेश करतात. ‘महाराजांना’ नमन करून उन्हातच बसण्याचा निर्णय घेतला जातो. प्रवचनात ऎतिहासीक, पौराणीक, शास्त्रीय दाखले दिले जातात. श्रोत्यांचा ओघ एक-एक करून सुरू असतो, मांडवात आता व्यवस्थीत गर्दी झालेली असते. तिकडे नदीकिनारी मृतकाचे जवळचे नातेवाईक बाळू बामणाच्या मार्गदर्शनानूसार मृतात्म्याच्या शांतीसाठी विधीवत पूजा करण्यात मग्न असतात, चकोटी केल्यामुळे डोकं जाम तापलेलं असतं पण.. असो!

कमरेला एक पंचा व खांद्यावर एक उपरणे असल्याने धर्म कार्यात कसूर होत नसल्याचे पुर्ण समाधाण मिळालेले असते.

विधी संपलेला असतो आणि आता वेळ असते ती कावळ्याला घास ठेवण्याची, त्या प्रमाणे तीन-चार वेळा जागेत बदल करून अन्न पात्राहून पाणी फिरवूनही जेव्हा कावळा घास घेत नाही, तेव्हा बाळासाहेब “हा घास गाईला देण्यात यावा” असा मोलाचा सल्ला देतात (“गो मातेत ३३ कोटी देव असतात, तेव्हा हा मार्ग सर्वात उत्तम” अशी चर्चा नातेवाईकांत सुरू होते) सल्ला बहूमताने मान्य होतो, गाय घास घेते. घास ठेवणारी मंडळी नदीवर जमते, मृतात्म्यास पाणी दिले जाते. माईक आणि वासुदेव महाराजांचा सुर अजुनही जुळलेला नसतो. तेव्हा मान्यवर मंडळी पुढाकार घेत जेनरेटर बंद करतात. वातावरण शांत होते. आता प्रवचन अखेरच्या टप्प्यात आलेले असते. प्रवचन-मार्गदर्शन संपते “वासुदेव महाराजांचा” सत्कार मान्यवरच करतात, महाराज श्रोत्यांना अभिवादन करतात.

आता..
गर्दीतील एक तरूण बंद माईक समोर उभा राहत शोकसभा सुरू होत असल्याचा नाद करतो. एक-एक करून मान्यवरांना आपला शोक प्रगट करण्यासाठी आमंत्रित केले जाते, हा जंगी कार्यक्रम सुरू होतो. पुढाकार घेत एक मान्यवर महोदय उठतात, बोलतात…

तसा तो फार चांगला होता प्रामाणिक, एकनिष्ठ तर होताच पण कनवाळू-दयाळू पण होता, पण दैवा पुढे थोडचं चालतं काही, नशीबात लिहीलं आहे तसचं घडतं. फार चांगला माणुस आज आपल्याला सोडून गेला! हा! “चुना आहे का? संपत शेठ”

“आहे ना”

“घ्या!”

(तंबाकु मळता-मळता) तर मंडळी आप्पासाहेब जोश्यांच्या आत्म्याला परमेश्वर शांती प्रदान करो (तंबाकुचा बोकना तोंडात भरता-भरता) अशी आपणा सर्वांच्या वतीने मी परमेश्वर चरणी प्रार्थना (दातात अडकलेली तंबाकुची काडी काढतं) करतो, आणि एवढं सगळं बोलून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र!

गावातील जुने जाणते प्रतिष्ठित आसामी दुसरा नंबर लावतात…शेजारच्याचा आधार घेत उभे राहतात.

बंधुंनो आज जोशी कुटुंबावर जे संकट कोसळले आहे, त्या संकटात आपण सर्वजण त्यांना मदतीचा हात (हातातला मळका रुमाल झटकत) देण्यासाठी जमलो आहोत. बंधुंनो (मान डावीकडे-उजवीकडे फिरवता-फिरवता, समोर बसलेल्या प्रेक्षकान कडे मात्र लक्ष नाही). आप्पा मामांचा आमच्या घरावर फार जीव, आम्ही लहानचे मोठे त्यांच्या अंगा-खांद्यावर झालो (मान सारखी उजवीकडून डावीकडे, चेहरा अपराधी पणाच्या भावनेने ग्रस्त) आमच्या अडचणींच्या,पडतीच्या काळात (हातातल्या रूमालाची घडी शर्टाच्या वरच्या उजव्या खिशात ठेवत) त्यांच्या मदतीनेच आम्ही पुन्हा उभे राहू शकलो (रूमाल व्यवस्थीत ठेवला आहे का? याची खात्री करत) शिक्षणे पुर्ण केली आणि पुढे राजकारणाचे धडे गिरवले त्यांच्या कडूनच! आज त्यांच्या जाण्याने आमच्या घरावर देखील शोककळा पसरली आहे.

परमेश्वर आप्पामामांच्या आत्म्याला चिरशांती देवोत. तेव्हा ही प्रार्थणा करून माझे दोन शब्द संपवतो. जय महाराष्ट्र!

एक-एक करता सर्व मान्यवरांची शोकावर्तने संपतात, लोक जागा सोडतात उठतात, उर्वरीत लोकही आता नदीवर मृतात्म्यास पाणी देतात. सर्वजण घराकडे वळतात, मृतकाचे नातलग मारूतीच्या देवळात मुर्तीचे दर्शन घेवून घरी येतात.

आता नातेवाईकांसह-भाऊबंध आणि इतर सर्व लोकांची गर्दी घरासमोर जमते. आता एका अनविक्षिप्त कार्यक्रमाची सुरूवात होते.

नातलग आणि भाऊबंध वगळता सर्व लोक एक भल मोठ्ठ रिंगण करतात आणि मृतकाचे दुःखी नातेसंबंधी त्यांची शासकीय पद्धतीत भेट घेतात. हा कार्यक्रम झटपट संपतो. नंतर कार्यक्रम होतो तो दुःख वाटुन घेण्याचा त्याला ‘दुखवटा’ असेच म्हणतात. लग्नातल्या आहेरा प्रमाणे येथे दुखवटा दिला जातो. पैसा, कपडा या स्वरूपात हा दुखवटा मृतकाच्या जवळच्या नातलगास दिला जातो.

एक मनुष्य हा सर्व ‘दुखवटा’ गोळा करण्याचे काम चोख पार बजावत असतो. दुखवट्याचा आहेर दिला गेला की लगेच त्याचे नाव पुकारले जाते.“बहीरू महीपत ११रू दुखवटा, शिवाजी संपत काळे ५रू दुखवटा”. अशा प्रकारे दुखवट्यांचे सत्र संपल्यानंतर जेवनावळ सजते.

मृतात्म्यास खांदा देणार्‍या कष्टकर्‍यांच्या हातात गुळ-खोबरे देऊन त्यांच्या खांद्याला तेलाचा लेप दिला जातो, त्यांचा सत्कार टोपी-टॉवेल देऊन करताच जेवणावळ सुरू होते. प्रत्येकास काय हवे-नको ते पानात वाढुन घेतले जाते. दुःखाचा शिण आता कमी होत जातो, सर्व लोक जेवणा नंतर पडवीतच हात धुतात. घरासमोर खरकट्या पत्रावळ्यांचा ढीग कुत्री, मांजरी आणि कोंबड्या मात्र अजुनही फस्त करीत असतात.

सर्वसामान्य दुःखाची कल्पना येथे फोल ठरून सर्वमान्य दुःखोत्सव संपलेला असतो. आणि अखेर पर्यंत पिंडाला कावळा शिवलाच नाही ही सल मात्र गढुळ,कोरड्या नदीपात्रात खोल रूतुन बसते, निर्मळ प्रवाहासह वाहून जाण्याच्या प्रतिक्षेत.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play