शब्द

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जून २०१४

शब्द | Shabda

ओंकारात उत्पन्न झालो नाद
नाद निनादात स्वर स्पंदन
श्वासा गुंजनात निर्माण झालो उच्चार
आणि सहज प्रकट झाले शब्द
शब्द आकारले
प्रत्येक शब्दात ब्रह्मांडाचो अर्थ
अनमोल शब्द
असे हे अद्‌भुत शब्दब्रह्म्‌

शब्दांची कधी कविता होते, कधी कथा, तर कधी कादंबरी. प्रत्येक शब्दाची अनुभूती वेगळी. परिणाम वेगळा.

आकाशवाणीच्या बहुभाषिक संमेलनात सादर झालेली इंदू गिरसप्पे यांची कोंकणी कविता. आज वाचकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळतेय याच शब्दांच्या माध्यमातून. दोन अक्षर शब्द. पण त्याचे सामर्थ्य किती मोठे. किती रुपं या शब्दांची. काही कठोर, काही मृदू, काही जखमा करणारे, काही जखमा भरणारे. काही दु:खावर हळूवार फुंकर घालणारे, कधी मायेने गोंजारणारे, कधी निराशेच्या गर्तेत ढकलणारे, कधी मनाला उभारी देणारे, कधी हास्याची कारंजी फुलवणारे, कधी सांत्वन करणारे. मन मोकळं करताना लागतात ते शब्दच. लहान बाळाशी बोलताना बोबडे होणारे तर याच बाळाला शिस्त लावताना कठोर होणारे. प्रियकराला साद घालताना हळूवार होणारे. शब्दांची रुपं तरी किती !

याच शब्दांची कधी कविता होते, कधी कथा, तर कधी कादंबरी. प्रत्येक शब्दाची अनुभूती वेगळी. परिणाम वेगळा. कांती घडवणारे जोशपुर्ण शब्द, अन्यायाविरुध्द लढा देणारे जळजळीत शब्द, वाट चुकलेल्याला दिशा दाखवणारे प्रकाशाने झळाळणारे शब्द. आजीचे अनुभवी शब्द. प्रेम व्यक्त करणारे शब्द. राग व्यक्त करणारेही शब्दच. शब्दांशी इमान राखणारी, शब्द पाळणारी आपण माणसं याच शब्दाला नेहमी जागतो का?

असे हे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटणारे शब्द. आयुष्य उजळून टाकणारे शब्द आणि आयुष्य उधळून टाकणारेही शब्दच. काही मायेने ओथंबलेले शब्द तर काही मायेचा लवलेशही नसलेले कोरडे शब्द. संत तुकाराम महाराजांनी शब्दांचं योग्य वर्णन केलय,

आम्हा घरी धन । शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे । यत्न करुं ।
शब्दचि आमुच्या । जीवाचे जीवन ।