सार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ सप्टेंबर २०१५

सार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज - मराठी लेख | Sarvajanik Ganeshotsav Kaal Aani Aaj - Marathi Article - Page 3

कोणाचा गणपती सर्वात मोठा? मिरवणुकीत कोणता गणपती सर्वात पुढे राहणार? कोणत्या मंडळाचा देखावा सर्वात भव्य आहे? DJ (Disc Jockey) चा सर्वात मोठा थर कोणत्या मंडळाचा आहे? सर्वात मोठे ढोल पथक कोणाचे? कोणते मंडळ, किती मोठा सेलिब्रिटी आणते ह्याचीच चुरस सर्व मंडळांमध्ये दिसते. सगळीकडे साधेपणापेक्षा नुसता बडेजावच जास्त आढळतो. स्थानिक नेते आणि व्यापारी, सणाचे औचित्य साधुन आपली जाहिरात करतात आणि त्या बदल्यात मंडळाला बक्कळ पैसे मिळतात, जे अवास्तव खर्च भागवण्यासाठी वापरले जातात. अनाधिकृतपणे मांडव घालुन अर्ध्यापेक्षा अधिक तर कधी कधी पुर्ण रस्ताच अडवला जातो. वाहतुकीस अडथळा होतो म्हणुन तक्रार करणाऱ्या वाहनचालकास दमदाटी, प्रसंगी मारहाण करायलाही काही मंडळाचे सदस्य मागे पुढे पाहात नाहीत. उत्सवासाठी रस्ते अडवल्यामुळे, अडलेल्या गरोदर स्त्रीया तसेच अपघात ग्रस्त लोकांना घेऊन जाणर्‍या रूग्णवाहिका वेळेवर रूग्णालयात पोहोचु न शकल्यामुळे कितीतरी लोक वाटेतच दगावल्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडतात. तसेच वेळेवर आगीची माहिती मिळूनही अग्निशामक दलाच्या गाड्या योग्यवेळी घटनास्थळी पोहोचू न शकल्यामुळे निश्कारण जिवीतहानी आणि वित्तहानी तर होतेच पण त्या आगीत पिडीतांच्या घरांबरोबरच त्यांच्या सुंदर भविष्याच्या स्वप्नांचीही राखरांगोळी होऊन जाते. एकाची मजा दुसऱ्यासाठी शिक्षा बनते. पण या सगळ्यापेक्षाही महत्वाचा आहे तो ऊत्सव! नाही का? कोणाच्या सुख दु:खाशी आपल्याला काय देणे घेणे? गर्दीचा फायदा घेऊन घडणारे गुन्हे, महिलांची होणारी छेडछाड, लहान मुलांचे गर्दीत हरवणे, दारु पिऊन होणाऱ्या मारामाऱ्या, अर्वाच्च भाषेतील शिवीगाळ आणि धिंगाणा हे नित्याचेच झाले आहे. हे सर्व पाहिल्यावर असे वाटते की सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यामागचा लोकमान्य टिळकांचा उद्देशच आज कुटेतरी हरवलाय किंबहुना आपण तो उद्देशच बासनात गुंडाळून ठेवलाय आणि उरलाय तो फक्त उत्सवाच्या नावाखाली सुरु असलेला दहा दिवसांचा तमाशा.

थोड्याफार फरकाने सर्व उत्सवांची आज हीच अवस्था आहे. मुर्त्या आणि फोटो बदलतात पण उत्सव साजरा करायची पद्धत मात्र तीच. सर्वच मंडळं असे करतात आणि सर्वच लोक या प्रकारचे समर्थन करतात असे नाही. काही मंडळे खुपच स्तुत्य कामगिरी बजावतात पण दुर्दैवाने ती हाताच्या बोटावर मोजण्या इतकी कमी आहेत. आपली वाटचाल नक्की कुठल्या दिशेने सुरु आहे? आज जे काही आपण करतोय त्यावर अंतर्मुख होऊन पुनःविचार करण्याची वेळ आली आहे, असे कोणालाच वाटत नाही का?

खरतर अजुनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी जर ठरवले तर ही परिस्थिती बदलु शकते. ऊत्सवांवर वारेमाप खर्च केला जाणारा पैसा राष्ट्र उभारणीसाठी आणि समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाला सबल करण्यासाठी खर्च केल्यास टिळकांच्या गणेशोत्सव सुरू करण्यामागील मुळ उद्देशाला सफल करण्याच्या दृष्टीने हे आपले पहिले पाऊल असेल. मंगलमुर्तीच्या आगमनाने आपणा सर्वांच्या मनावर साचलेली दांभिकतेची पुटे दूर होवोत आणि सर्वांनाच सद्बुद्धी व सन्मती प्राप्त होवो हीच सदिच्छा.

मंगलमुर्ती मोरया।