सापांना कृत्रिमरित्या जन्म घालणारा अवलिया

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ सप्टेंबर २०१०

सापांना कृत्रिमरित्या जन्म घालणारा अवलिया । Saapanna Krutrimritya Janma

सापाने वर्दळीत सोडलेली अंडी कुत्र्या-मांजरापासून वाचवत त्यांना जन्म घालणारा हा सर्पमित्र अत्यंत अफलातून आहे.

रात्री ३ वाजण्याची वेळ, प्रकाश चिंचनसुरे यांचे कुटुंब गाढ झोपेत असताना त्यांच्या १३ वर्षीय मुलाची अंथरुणात वळवळ सुरू झाली. अंगावर काहीतरी वळवळत असल्याचा भास झाल्यामुळे तो चटकन उठून बसला आणि डोळे चोळत त्याने समोर पाहिले ते काळजाचे पाणी करणारे दृश्य होते! भला मोठा फणा काढून, फुत्कार टाकणारा महाकाय कोब्रा पाहून त्याच्या अंगात थरथरी सुटली आणि बोलतही बंद झाली. त्यानंतर अवघ्या कुटुंबानेच घर डोक्यावर घेतले, कुटुंबातील लहान-मोठ्यांचीही पाचावर धारण बसली. मग सुरू झाली पळापळ! घरातल्या गलक्यामुळे कोब्राने भांड्याच्या कपाटाचा आधार घेतला पण त्याला मारणार कोण? या धास्तीने स्वतः चिंचनसुरेही घामाघुम झाले. त्यावेळी सर्वांनाच आठवण झाली ती गावातल्या सर्पमित्र बालाजी कोळी यांची. कोळी यांच्या प्रयत्नाने कोब्रा हातात आला. त्यानंतर या कोब्राने २० अंडी दिली. त्याने दिलेल्या अंड्यापासून सर्पमित्र कोळी यांनी चक्क सापांच्या १५ पिलांना जन्म दिला. कधी कोवळे उन्ह तर कधी जमिनीची धूप देऊन कृत्रीमरित्या सापांना जन्म घालणाऱ्या कोळी यांचा हा प्रयोग म्हणाल तर अघोरी, जीवावर बेतणारा आणि जगावेगळा- कुतूहलाचा सुद्धा! यापूर्वीही त्यांनी अशा पद्धतीने शेकडो पिलांना जन्म घातलाय. १० वर्षात सुमारे अडीच हजार साप आणि अजगरांना पकडण्याचा विक्रम त्यांच्या नावाने नोंदला गेला आहे. पेशाने शिक्षक असलेल्या कोळी यांच्या अंगात एवढ्या धाडसाचे, रानटी शौर्य कोठून आले? सापाशी खेळ जीवघेण असताना, महाकाय सापसुद्धा अलगद उचलून ते चित्तथरारक कामगिरी करतात कसे?

साप म्हटलं की भल्या-भल्यांची बोलती बंद होते. त्यातच किंगकोब्रा, घोणस, परड, नाग, मन्यार, फुरसे अशा अतिविषारी जातीच्या सापांचा फुत्कार आणि त्यांची तेजस्वी चपळता पाहून काळजाचं पाणी व्हायला होतं. काहींचे शब्दही बंद पडतात. सापाच्या सरपटण्याची साधी कल्पनाही करवत नाही. त्यामुळेच लहान मुलांना सापांच्या गोष्टी सांगताना बहुतांश पालकांच्या अंगावर काटा उभा राहतो आणि गोष्टी वळण घेतात. वृद्धांनाही सापांची धास्तीच! त्यातच साप डुख धरतो, त्याच्या नजरेला नजर मिळवल्यास गुरे मरतात, त्याच्या अंगावर केस असतात, भोवताली अधुनमधुन दिसणारा मोठा साप आपल्याच पूर्वजांच्या रुपातला असतो, यांसारख्या भाकड कथा आणि गैरसमज समाजात आहेत. समाजाला या गैरसमजातून बाहेर काढण्यासाठी साप हा शत्रू नसून शेतकऱ्यांचा मित्र आहे अशी जाहीरातबाजी शासनाला करावी लागली. अनेक सर्पमित्र संघटनांही सापाबद्दल जनजागृती करत आहेत. काही भागात तर अनेक सर्पमित्रांकडून सापांना पकडायचं कसं, त्याच्या अंड्याची ओळख, प्रजनन पद्धती याबाबतचं प्रशिक्षण दिलं जात आहे.

निलंगा भागात साप पकडण्याविषयी मार्गदर्शन केलं जात असलं तरी लातूर जिल्ह्यातील या चळवळीनं खऱ्या अर्थाने जोर पकडला आहे. निलंगा तालुक्यातील काही गावात साप दिसल्यास तो मारायचा नाही, असा दंडक घालण्यात आला आहे. त्यामुळेच गेल्या १० वर्षापासून काही गावांमध्ये नजरेस पडणाऱ्या असंख्य सापांना जीवदान देण्यात आलं आहे. सर्पमित्र बालाजी कोळी यांच्या जनजागृतीचा आणि प्रशिक्षणाचा हा परिपाक आहे. ‘साप मेला पाहिजे पण काठी मोडायला नको’ ही संकल्पनाच मोडीत काढून सापाची काठीशी कधीच गाठभेट होऊ दिली जात नाही. कोळी यांच्या या पद्धती अगदी ८-१० वर्षाच्या मुलांनीही उपयोगात आणल्या आहेत. ‘दिसला साप सोडा जंगलात’ असा वाक्यप्रचार जणू गावांनी कृतीमध्ये आणला आहे. सजीव सृष्टी संवर्धन संस्थेच्या माध्यमातून बालाजी कोळी यांनी राबविलेली ही चळवळ जनकल्याणाची तर आहेच पण सर्पसंवर्धन करुन प्राणीमात्रांवर दया दाखवणारी सुद्धा आहे. निलंगा तालुक्यातल्या हलगरा गावचे बालाजी कोळी पेशाने शिक्षक असून ते याच तालुक्यातील कासारशिरसी येथे जि. प. शाळेत कार्यरत आहेत. १० वर्षापासून त्यांना साप पकडण्याची आवड झाली त्यांनी ती गरज म्हणून जोपासली. कारण ते ज्या गावात नोकरी करतात त्याच गावालगत जंगल असल्यामुळे विविध जातीचे साप गावात येत. दररोज कुणाच्या तरी घरात अवतरणाऱ्या सापांना मारण्यात गावकरीही पटाईत झाले होते. जंगलाचा परिसर आणि डोंगराळ जमिनीमुळे सापाचं दर्शनही नित्याचंच; मात्र किडे, मुंग्या, उंदरासारखे भक्ष्य करुन शेतमालाची नासाडी थांबणाऱ्या सापांचा अजून किती काळ बळी जाणार या चिंतेतून कोळी यांनी स्वतःपासूनच ‘विष’ प्रयोग सुरु केले. गावात निघालेला साप न मारता त्याला कौशल्याने पकडून जंगलात सोडण्यात येऊ लागले. हळूहळू सुरू झालेला हा प्रयोग कधी सरावाचा झाला ते त्यांनाच कळलेच नाही. पण कोळी यांच्याकडे काहीतरी अद्भूत शक्ती, मंत्र, जादू, भानामती असल्याचा साक्षात्कार गावकऱ्यांना झाला. त्यामुळेच त्यांना साप पकडता येतात असा दावा केला जाऊ लागला. ‘तुमचे डोळे मोठे आहेत, डोळ्यातून द्रव्य बाहेर येते, तुमच्याकडे मंत्र आहेत त्यामुळे तुम्ही एवढ्या मोठ्या सापांना चटकन पकडता’ अशा शंका कोळी यांच्याबाबतीत व्यक्त केल्या जावू लागल्या. त्यांनी या सगळ्या थोतांड कल्पना आहेत, सापांबद्दलच्या अंधश्रद्धा काढून टाका, असे आवाहन करुनही गावकऱ्यांनी कुजबूज थांबत नव्हती. त्यामुळे त्यांनी गावातील ५ तरूणांना साप पकडण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. साप दिसताच काठ्या जमवणारे तरुण काही दिवसातच जीव घेण्याऐवजी जीवदान देण्यासाठी पुढे सरसावले. हळूहळू गावात सर्पमित्र नावाच्या चळवळीने इतका जोर धरला की परगावहून दूरध्वनी आले की, कासारशिरसीमधले तरुण मिळेल त्या वाहनाने जाऊन साप पकडू लागले.

सजीव सृष्टी संस्थेमार्फत चालणाऱ्या या अद्भूत कामाचा परिसरातही गवगवा सुरू झाला. सापांबद्दल समाजातील अंधश्रद्धा, भिती दूर व्हावी, सापांच्या नावाखाली चालणारी लुटालूट थांबावी यासाठी कोळी यांनी उचललेले पाऊल साधेसुधे नव्हते; मात्र लातूर जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या अनेक भागात त्यांनी जनजागृतीचे कार्यक्रम घेऊन सापांचे सवंर्धन काळाची गरज असल्याचे दाखवून दिले. निलंगा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता साप पकडण्यासाठी परगावहून सर्पमित्रांना बोलावले जात नाही तर त्याच गावात तरूण सापांना पकडून गावाबाहेर सोडतात. जगजागृती करण्यासाठी सर्पमित्र कोळी यांना कळसूत्री बाहुल्यांचे नाट्य प्रयोग सादर करावे लागले. ‘समाजात असलेली अंधश्रद्धा आणि सापांबद्दल असलेल गैरसमज घालण्यासाठी केवळ जाहिरात बाजी उपयोगी ठरणार नाही, त्यासाठी प्रात्यक्षिकाची गरज आहे. सापांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. कारण वर्षासाठी शेतीतील २७ टक्के अन्नधान्याची नासाडी उंदराकडून केली जाते. तर उंदराची प्रजनन क्षमता वेगवान असून वर्षाकाठी उंदराचे १ जोडपे साडेआठशे ते नऊशे पिलांना जन्म देते. उंदरांना बिळात जाऊन शोधून भक्ष्य करण्याचा सापाशिवाय अन्य प्रभावी पर्याय नाही असे सर्पमित्र कोळी सांगतात. एरव्ही मादी साप बिळात अंडी घालतात; मात्र भरकटलेल्या भागात त्यांना बिळाचा आधार न मिळाल्यास ते आडोसा पाहून अंडी घालतात. त्यानंतर वर्दळीमुळे जागीच अंडी सोडून निघून जातात त्यामुळे अशा अंड्यांना कुत्र्या-मांजरापासून धोका असतो. भक्ष्य, शोधत भटकत असलेल्या सापांमुळे त्यांची प्रजनन क्षमता घटत आहे. त्यामुळे पकडलेला मादी साप अंडी देण्याच्या अवस्थेत असेल तर त्याला काही कालावधीपर्यंत घरात ठेवून, अंडी दिल्यानंतर त्याला जंगलात सोडले जाते.

सापांना जन्म देण्याची पद्धत

निलंगा तालुक्यातील बडूर गावातील जाधवांच्या घरात २००६ साली निघालेल्या कोब्रा जातीचा साप भला मोठा होता. तो अंडी घालण्याच्या अवस्थेत असल्यामुळे श्री कोळी यांनी त्याला घरी आणले. त्याच सायंकाळी सापाने ४३ अंडी घातली. ही अंडी ताब्यात घेऊन सापाला जंगलात सोडले. त्यानंतर घरासमोर दोन बाय दीड आकाराचा खड्डा खोदला. गोवऱ्याचा धूर देऊन हा खड्डा निर्जंतूक केला. त्यानंतर ओलसर माती टाकून धान्याच्या तणसाचा भुसा अंथरला. त्यावर अंडी ठेवली, त्यावर ऊब तयार होण्यासाठी शेणाचा अल्पसा थर दिला. १० दिवसानंतर ही अंडी बाहेर काढून कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवली. असे ३ वेळा प्रयोग झाल्यानंतर ७० ते ७३ दिवसांच्या कालावधीत या अंड्यातून एकेका कोब्राने जन्म घेतला. अंड्यातून सापाचा जन्म हा कुतूहलाचा विषय असल्याचे कोळी सांगतात.

जन्मापूर्वी पिलाला एक टोकदार दात असतो. हा दात अंड्यातील पोकळी असलेल्या भागावर प्रहार करुन पिल्लू अंड्याबाहेर पडते. आठवड्यानंतर हा दात पुन्हा गळून पडतो. सापाबाबत एवढा सुक्ष्म अभ्यास असणारे श्री कोळी पकडलेला साप किती वेळात अंडी देऊ शकतो हे सुद्धा अचुकपणे सांगतात. कात पाहून ते सापाची जात ओळखतात. एकदा भक्ष्य मिळाल्यानंतर साप आठ दिवस भक्ष्य करत नाही. तर दोन महिन्यापर्यंत पाण्याशिवाय राहू शकतो. आत-बाहेर करणाऱ्या जीभेमुळे त्याला १०० फुटापर्यंत असलेले भक्ष्य कळते. असे ते सांगतात. अंड्यातून बाहेर पडलेले कोब्राचे पिल्लू एक फुट लांबीचे असते. जन्मताच त्याच्यामध्ये विषारी लाळग्रंथी असतात. त्यामुळे त्याचा दंश महागात पडू शकतो. अंड्याचे निरीक्षण इतके महत्त्वाचे असते की, अंडेवस्थेतून बाहेर पडण्याच्या ७०-७३ दिवसांच्या कालावधीत त्याकडे बारकाईने पहावे लागते. परडीमध्ये घालून सापांचा जीवघेणा खेळ आपण चौका-चौकात पाहतो. गारुड्यांकडून होणारा त्यांचा छळ पहावत नाही. पोटाच्या खळगीसाठी सापावर चालणारा हा प्रपंच पाहून अनेकदा त्याकडे डोळेझाक केली जाते. पण सापांना जीवदान देऊन त्यांच्या अंड्याचे कृत्रीमरित्या प्रजनन करणारा बालाजी कोळीसारखा अवलिया सर्पमित्र विरळच. सापाने वर्दळीत सोडलेली अंडी कुत्र्या-मांजरापासून वाचवत त्यांना जन्म घालणारा हा सर्पमित्र अत्यंत अफलातून आहे.