MarathiMati.com - Android App on Google Play Store

प्रभाते करदर्शनम्‌

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ फेब्रुवारी २०१४

प्रभाते करदर्शनम्‌ | Prabhate Kar Darshanam

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविंद: प्रभाते करदर्शनम्‌ ॥

प्रात:समयी हा श्लोक म्हणून करदर्शन घेतात आणि त्यानंतर आपल्या दिवसाला सुरवात होते. असं केल्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक मनोबलात वाढ होते. खरंच आपल्या या दोन हातांचं सामर्थ्य शब्दातीत आहे.

कविवर्य बा. भ. बोरकर यांनी म्हटलयं, ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’. मग ते मेहेंदीने सजवलेले नववधूचे हात असो किंवा नुकत्याच जन्म झालेल्या बाळाचे गोंडस हात असो. या हातांनीच आई आपल्यासाठी सुग्रास जेवण बनविते. चित्रकार सुंदर चित्र रेखाटतो. तर शिल्पकार मातीला आकार देऊन सुरेख मूर्ती घडवतो.

शेतकरी, कष्टकरी, अगदी आपल्या घरी काम करणारी कामवाली बाई या मंडळींचे हात जरी रखरखीत असले तरी सुध्दा आपलं आयुष्य सुसह्य करणार्‍या या मंडळींचे हातही सुंदरच असतात.

शेतकरी, कष्टकरी, अगदी आपल्या घरी काम करणारी कामवाली बाई या मंडळींचे हात जरी रखरखीत असले तरी सुध्दा आपलं आयुष्य सुसह्य करणार्‍या या मंडळींचे हातही सुंदरच असतात. जास्त कष्ट केल्यामुळे या मंडळींच्या हातावरच्या रेषाही पुसल्या जातात. पण त्यांना याचं काहीच नसतं. हातावरच्या रेषांवर काय असतं ? ज्यांना आपल्या हातांचं सामर्थ्य कळत नाही ते या रेषांवरुन आपलं भाग्य जाणण्याचा प्रयत्न करतात. नवजात बाळाचं मायेनं करणार्‍या दाईचे हात, लहान असताना चुकल्यावर पाठीत धपाटा घालणारे आजीचे हात, गरजूला दान देणारे हात, विवाहासाठी वधूला सजवणारे हात आणि आजारी रुग्णाचे शुश्रुषा करणारे हात या हातांना फक्त एकच माहित असतं ‘ममत्व’. मायेनं, आपुलकीने ओथंबलेले ते हात असतात.

नवनिर्मिती करणार्‍या हातांचा दिमाख काही वेगळाच, मग ती ‘श्यामची आई’ सारखी साहित्यकृती असो, ताजमहलसारखी अजरामर वास्तू असो किंवा चेहर्‍यावर गूढ हास्य असलेलं मोनालिसाचं पेंटिंग असो. असे हात वारंवार जन्माला येत नाहीत. हाताच्या बोटांमध्ये अंगठ्या घालून त्यांना सजवलं जातं. हरकत नाही, पण फक्त अंगठ्यांनी नाही तर त्यातून सुंदर सृजन करणारे हातचं जास्त मोहक वाटतात..

हेच हात आयुष्याच्या एका वळणावर कोणाच्या तरी हातात दिल्यावर निवांत वाटतं. कवी मंगेश पाडगांवकरांनी म्हटलयं तसं...

अपुल्या हाती नसते काही हे समजावे
कुणी दिले जर हात आपुले हाती घावे

इतकं ते सहज असावं.

MarathiMati.com - Android App on Google Play Store