MarathiMati.com - Official WhatsApp Number

मकरसंक्रांत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१३

मकरसंक्रांत - मराठी लेख | Makar Sankranti - Marathi Article

महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत! सूर्याच्या मकरसंक्रमणावर आधारलेला एक हिंदुस्थानी सण वर्षभरात बारा राशीतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे, कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो.

सूर्याच्या संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकारासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगळ्या असतात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते व दुसऱ्या दिशेला जाते. त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते.

हिंदुस्थानात बहुतेक भागात हा सण साजरा केला जातो. दक्षिणेत याचवेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी, तर नंतरच्या दिवसाला किंक्रांत किंवा करीदिन म्हणतात. स्त्रिया मृत्तिका घटाचे दान देतात व देवाला तीळ, तांदूळ अर्पण करतात आणि संक्रातीनिमित्त सौभाग्यपण लुटतात. या दिवशी तिळगुळ मोठ्यांनी लहानांस द्यावा अशी वहिवाट आहे. मकरसंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत चालतो.

प्रत्येकाचे आयुष्य सध्या धावपळीचे आहे. त्यामुळे स्वतःकडेही लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. यात आपण बदल करणे आवश्यक झाले आहे. मकरसंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत चालत असून, यात रोज एखाद्या स्त्रीकडे हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो. समजा आपण हा कार्यक्रम एका मोठ्या सभागृहात आयोजित करून यात विवाहित, अविवाहित, तसेच विधवा स्त्रियांना सहभागी करून या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून स्त्रियांमध्ये दडलेली कलाकृती सादर करण्यास एक उत्तम अशी संधी देऊन आपल्यामध्येसुद्धा इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. आपल्यालासुद्धा या जगात, समाजात एक विशिष्ट प्रतिष्ठा आहे याची जाणीव प्रत्येक स्त्रीला होईल.

यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले तर नोकरी करणाऱ्या तसेच गृहिणींना आपली आवड सहजरीत्या जोपासता येईल व समाजाला एक नवी दिशा मिळेल. हळदीकुंकवाच्या वेळी एखादी वस्तू वाण म्हणून दिले जाते यात देवांची पोथी, रोपटे, पुस्तके यासारख्या ज्या की नेहमी उपयोगात, आठवणीत राहतील यासारखे साहित्य द्यावे तर मग आली जवळ मकरसंक्रांत लागायचंना तीळगुळाचे लाडू करायला म्हणून शेवटी जाता जाता ‘तीळगुळ घ्या गोड गोड बोला’.

Book Home in Konkan