गांधी विचार आणि आजची तरूणाई

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ ऑक्टोबर २०१५

गांधी विचार आणि आजची तरूणाई - मराठी लेख | Gandhi Vichar Aani Aajachi Tarunai - Marathi Article

खर्‍या अर्थाने विचार करायला गेला तर मानवी संघर्षाच्या इतिहासात एका नव्या अस्त्राचा जन्म गांधीजींच्या रूपाने झाला असे म्हटले जाते. गांधीजींनी त्यांच्या कार्यातून खरे तर लढणार्‍यांना नवे बळ दिले. तर अन्याय करणार्‍यांना त्यांच्या सहनशीलतेतून, कार्यातून दृढनिश्चयातून आत्मपरीक्षण करायला लावले.

खर तर गांधीजींच्या सत्याग्रही संकल्पनेला एका व्यापक मानवतावादी तत्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. प्राचीन संस्कृतीमध्ये अहिंसेला फार महत्वाचे स्थान आहे. प्राचीन काळाचा विचार करायला गेल्यानंतर असे लक्षात येईल की, भागवत धर्माने पहिल्यांदा अहिंसेचा पुरस्कार केलेला आहे. प्राचीन काळामध्ये बौध्द, जैन धर्मानेही अहिंसेला महत्व दिलेले आहे. अहिंसा या विचारधारेचा स्विकार केलेला आहे.

महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव या सर्व महान संतांनी अहिंसेचा पुरस्कार केलेला आहे हे आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्न, राजकीय, सामाजिक, आर्थिक दरी, विषमता सोडविण्याच्या दृष्टीकोनातून हिंसा व शस्त्रशक्ती निरूपयोगी आहे. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी अहिंसात्मक सत्याग्रहाचाच मानवतेच्या रक्षणार्थ पर्याय योग्य आहे. गांधीजींचा संदेशच मुळात असा आहे की, जुलमाचा प्रतिकार केला पाहिजे.

दुर्बलांची अहिंसा बदलून शूरांची अहिंसा मला करावयाची आहे असे गांधीजी नेहमी म्हणत. अहिंसा म्हणजे काय? तर सत्याचा अविष्कार म्हणजेच अहिंसा आहे. सुसंघटीत समाजाचा पाया अहिंसा आहे. सत्याग्रहाचा पाया अहिंसा आहे. अहिंसेची अंगे दया, अक्रोध, अमान अशी आहेत.

खर तर सत्यातून प्रेम, मृदुता, अहिंसा निर्माण होते. भ्याडपणा हा नपुसंकपणा आहे. तो हिंसेहुनही अधिक वाईट आहे. गांधीजींचा नेहमी एक संदेश असायचा तो म्हणजे जुलुमाचा प्रतिकार करा. अहिंसेला कमी समजू नका, अहिंसात्मक लोकांना दुर्बल, भेकड समजू नका, अहिंसा ही दुर्बल आणि भेकड लोकांची नाही. आम्हाला आमचा, आमच्या स्त्रियांचा आणि पुजा स्थानांचा बचाव आत्मक्लेषाच्या म्हणजेच अहिंसेच्या बळावर कसा करावा हे ज्ञात नसेल तर आणि मर्द असू तर अहिंसेची लढाई करून त्यांचा बचाव करण्याची तरी शक्ती निदान आपल्यात असली पाहिजे. असे गांधीजींनी वारंवार स्पष्ट केलेले आहे.

महात्मा गांधीजींचा चंपारण्य, खेडा सत्याग्रह, खिलाफत आंदोलन, असहकार आंदोलन, दक्षिण आफ्रिकेतील संघर्ष, स्वातंत्र संग्रामातील संघर्ष, स्वदेशी, स्वराज्य, मीठाचा सत्याग्रह, छोडो भारत आंदोलन हा सर्व संघर्ष आणि त्यामध्ये त्यांना मिळालेले यश हे पाहिल्यांनतर गांधीजी या त्यांच्या कार्यातून आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. त्यांचा त्याग, कर्तृत्व या सर्व कार्यातून आपल्याला प्रतित होत राहिलं. गांधीजींचा सर्वसामान्यांच्या न्याय, हक्कासाठीचा लढा आपल्याला सतत स्मरणात ठेवून वाटचाल करावी लागेल. आज आमची हीच जबाबदारी आहे की त्यांच्या कार्य कर्तृत्वाची ज्योत आपल्याला सतत तेवत ठेवावी लागेल.

हिंसक प्रवृत्तीचे, दहशतवादाचे समर्थन करणारे, नितिमत्ता सोडून वागणारे लोक, मानवी मूल्यांची पायमल्ली करणारे लोक, देशविभाजन करायला निघालेले लोक, विघटनवादी विचारसरणीचे लोक देश विभाजनासाठी, भारत-पाकिस्तान विभाजनासाठी गांधीजींना दोषी ठरवून चुकीचा प्रचार आणि प्रसार करून तरूणांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करीत आहेत. देशाच्या शांतीला बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आजच्या तरूणांनी पुन्हा एकदा इतिहासाकडे डोकावून, डोळसपणे पाहण्याची आवश्यकता आहे. सत्य जाणून घेण्याची आवश्यकता आहे. तो जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या तरूणांनी करावा. पुराव्याअभावी, चूकीच्या माहितीच्या आधारावर कोणताही निष्कर्ष न लावता गांधी जीवन व कार्य समजून घेवून आत्मसात करावे ही कळकळीची विनंती आपल्याला आहे.

गांधीजींना देशाचे विभाजन मान्य नव्हते, गांधीजींना देशाचे तुकडे करणे पसंद नव्हते. गांधीजी धार्मिक एकतेच्या तत्वाशी बांधील होते. पण बॅ. जिना यांच्या आग्रहामूळे आणि इंग्रजांच्या ‘फोडा व राज्य करा’ या कुटील नितीमुळे, क्रुर खेळीमुळे देशाचं विभाजन झाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. या विभाजनाच्या विरोधात गांधीजी अखेरपर्यंत लढले. हे सत्य आपल्याला स्विकारावे लागेल. हे सत्य आजच्या तरूणांनी लक्षात घ्यावे. कोणत्याही दिशाभुलीला बळी पडू नये. आशा आहे हिंसक मनुष्य अहिंसक बनण्याची आणि गांधी विचारांना पुढे घेवून जाण्याची. चला गांधी विचारांचे पाईक होवून अहिंसात्मक लढा मजबूत करूया. शांती आणि प्रेम जगाला अर्पण करूया.

गांधी जीवन व कार्याचा आढावा घ्यायचा असेल, जीवन जाणून घ्यायचे असेल तर जळगांव मधील शिरसोली रोडवरील जैन हिल्सवरील गांधी संशोधन केंद्र आणि गांधी संग्रहालयाला भेट दयावी. नक्कीच आपल्याला नवा विचार करायला लावणारा, सुखद अनुभव देणारा आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा तो क्षण असेल.

गांधी विचार आणि आजची तरूणाई - संबंधित उपयुक्त लेखन/दुवे