गांधी विचार आणि आजची तरूणाई

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ ऑक्टोबर २०१५

गांधी विचार आणि आजची तरूणाई - मराठी लेख | Gandhi Vichar Aani Aajachi Tarunai - Marathi Article

विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे. बंदूकीच्या गोळयांनी प्रश्न सूटणार नाहीत तर समाज दुभंगायला आणि समाजामध्ये अशांतता निर्माण व्हायला मदत होणार आहे. समता, बंधूता, एकता, सर्वधर्म समभाव ही गांधीजींची तत्वे घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर उभा राहिलेल्या समाजाला आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. हे सर्व करण्यासाठी गांधी विचार आणि तत्त्व महत्वाचे आहे. त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. दुःखावर आणि संकटावर मात करून महात्मा गांधीजींनी असामान्य कर्तृत्व गाजवलेल आहे. ब्रिटीश शासनाला आव्हान देऊन न्याय हक्कासाठी लढा देणारे आणि सर्वसामान्यांवर होणार्‍या अन्यायाविरूध्द आवाज उठवण्याचे धाडस आणि त्यासाठी कोणतीही शिक्षा भोगण्याची तयारी हे मनाचं धारिष्ट फक्त आणि फक्त गांधी जीवन कार्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळेल.

संयम कसा असावा? शांतीचे महत्व काय? सत्य का आवश्यक आहे? शुध्द चारित्र्य निर्मितीसाठी काय आवश्यक आहे? सर्वसामांन्याच्या विकासासाठी आपण काय करू शकतो? समाजाला दहशतवादापासून कसे वाचवू शकतो? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी गांधीजींना समजून घेणे आवश्यक आहे. आज मोठया प्रमाणावर फॅशन वाढलेली आहे. क्षणिक सुखाला, मोहाला तरूण बळी पडताना दिसत आहे. आजच्या तरूणांना स्वार्थाने गुरफटलेले आहे. हव्यास वाढलेला आहे. अवाढव्य महत्वाकांक्षा वाढलेली आहे. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी आणि त्याग आणि समर्पण वृत्ती काय असते हे समजण्यासाठी गांधीजींना वाचणे आवश्यक आहे. भोगापेक्षा त्याग महत्वाचा आहे हे फक्त तुम्हाला गांधी विचारातून समजेल ती ताकद गांधी विचार आणि कार्यात आहे.

शांती आणि संयमाने जशास तसे उत्तर देणे आणि समोरच्याला स्वतःची चूक लक्षात आणून देऊन त्याचे मन परिवर्तन करणे ही खूप मोठी गोष्ठ आहे आणि या मनपरिवर्तनासाठी गांधी विचार अंगिकारणे महत्वाचे आहेत.

वारंवार देशामध्ये घडणारे बॉम्बस्फोट, जाळपोळ, लुटालुट, दरोडे यासारख्या घटना पाहिल्यानंतर वाटते की महात्मा गांधीजींनी जो देशासाठी त्याग केला, प्राणाची आहुती दिली ती यासाठीच का? त्यांच्या स्वप्नातील भारत असा होता काय? महात्मा गांधीजींनी शिकविलेला अहिंसेचा मार्ग विसरत चाललो आहोत काय? महात्मा गांधीजींनी शिकविलेला मार्ग हाच काय? कुठे गेली धर्मसहिष्णूता? कुठे गेली धर्मनिरपेक्षता? किती दिवस देशविघातक कारवाया घडत राहणार? आम्ही उघडया डोळयांनी नुसतेच बघतच राहणार? हे अपेक्षित होतं का महात्मा गांधीजींना? विसरलो काय आम्ही गांधीजींच्या त्यागाला? देशासाठी दिलेल्या बलिदानाला? महात्मा गांधीजींनी स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार करून त्यांचा आग्रह धरला. या आग्रहातूनच खादीचा उगम झाला. पण तो आग्रह विसरून आम्ही परकिय संस्कृतीचे आचरण करीत आहोत. विदेशी वस्तू वापरणे आम्हाला प्रतिष्ठेचं वाटायला लागले आहे. आमच्या अस्मितेचं आम्ही जतन करायचं विसरत चाललो आहोत. आजही देशाला जर प्रगतीच्या शिखरावर घेवून जायचं असेल, विकसित करायचं असेल तर स्वदेशीचा वापर महत्वाचा आहे.

गांधीजींच्या अहिंसा, शांतता, सत्य या मूल्यांचे महत्व जगाला पटू लागले आहे. संपूर्ण जग दहशतीच्याखाली वावरत असताना अफगाणिस्तान, ईस्त्राईल, इराण, इराक, म्यानमार या सारख्या देशामध्ये रक्ताचे पाट वाहत असताना जगाला गांधीजींच्या विचारांचे स्मरण होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. कारण संयुक्त राष्ट्रसंघाने सुध्दा ‘२ ऑक्टोबर’ हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केलेला आहे. गांधीजींना युध्द नको, शांतता हवी आहे; हिंसा नको, अहिंसा हवी आहे. आज जगाला अहिंसाच तारू शकेल. ‘अहिंसा परमो धर्म’ युध्द, हिंसा, दहशतवाद यांनी काहीही साध्य होणार नाही. हे आजच्या दहशतवादाचे समर्थन करणार्‍या तरूणांनी समजणे आवश्यक आहे. हे आजच्या तरूणांनी समजून घ्यावे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीमध्ये १४३ देशांनी बहुमतांनी पाठिंबा दिला आणि २ ऑक्टोंबर हा दिवस अहिंसा दिन म्हणून पूर्ण जगामध्ये पाळला जाऊ लागला. या पाठीमागे उद्देश असा होता की, जगामध्ये अहिेंसात्मक दृष्टीकोन वाढीस लागला पाहिजे, गांधी विचार व कार्य जगाला समजले पाहिजे, तरूणांना दहशतवादापासून परावृत्त केले पाहिजे, तसे या अनुषंगाने अहिंसा सप्ताह साजरा करून विविध कार्यक्रम घेतले पाहिजेत. हे अशा पध्दतीचे कार्य हे निरंतर चालू राहिले पाहिजे. तरच अहिंसात्मक दृष्टीकोन, शांतीमय विचारधारा जगामध्ये रूजायला मदत होणार आहे. गांधीजींच्या मूल्यांच्या जपणूकीसाठी हे महत्वाचे आहे.

गांधी विचार आणि आजची तरूणाई - संबंधित उपयुक्त लेखन/दुवे