फेसबुक सोशल नेटवर्किंग साईट

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जुलै २०१२

फेसबुक सोशल नेटवर्किंग साईट - मराठी लेख | Facebook Social Networking Site - Marathi Article

फेसबुकचे फायदे तोटे काहीही असले तरी फेसबुकने सामान्य माणसाला बरेच काही दिले आहे. फेसबुकमुळे आपल्यातला प्रत्येकजण विचार करायला लागला, आपलं मत मांडायला शिकला. राजकीय, सामाजिक क्रांती घडवण्याचे सामर्थ्य फेसबुकने सामान्य माणसाला दिले.

जगभर सध्या गाजत असलेली ‘फेसबुक’ ही सोशल नेटवर्किंग साईट चर्चेचा विषय बनली आहे. ४ फेब्रुवारी २००४ रोजी ‘फेसबुक’ ही सोशल नेटवर्किंग साईट अस्त्तिवात आली. हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या ‘मार्क झुकरबर्ग’ या विद्यार्थ्याने आणि त्याच्याबरोबर शिकत असलेल्या काही मित्रांनी ही साईट निर्माण केली. सुरवातीला हार्वर्ड विद्यापीठाच्या विदयार्थ्यांपुरतीच मर्यादित असणारी ही साईट हळूहळू इतर महाविदयालयातील विदयार्थांसाठीही खुली करण्यात आली. अल्पावधीतच ही साईट विदयार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली. त्यानंतर लगेचच १३ वर्षांवरील सर्वं व्यक्तींसाठी ही साइट खुली करण्यात आली आणि बघता बघता फेसबुकने जगभरातल्या जनमाणसांची मनं जिंकली. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग हा अवघा २८ वर्षांचा आहे. १४ मे १९८४ साली जन्मलेल्या मार्कचं संपुर्ण नाव आहे ‘मार्क इलियट झुकरबर्ग’. झुकरबर्गचे वडिल व्यवसायाने डेन्टिस्ट तर आई मानसपोचारतज्ञ आहे. वयाच्या १२ व्या वर्षापासुनच मार्कला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मध्ये रस निर्माण झाला होता. मुलाची कॉम्प्युटर मधली आवड बघुन मार्कच्या वडिलांनी त्याच्यासाठी खासगी शिक्षकाची नियुक्ती केली. लहानपणी केवळ मजा म्हणुन मार्कने अनेक कॉम्प्युटर गेम्स तयार केले होते. लहान वयातच त्याने अटारी बेसिक वापरायला सुरवात केली. त्याने घरात एकमेकांना संदेश देण्यासाठी एक प्रोग्रॅम विकसित केला. याचा उपयोग त्याच्या वडिलांच्या दवाखान्यात रुग्णांना त्यांचा नंबर आला आहे हे सुचित करण्यासाठी केला गेला. या नेटवर्कला ‘झुकनेट’ असं नाव दिले गेलं. नवनवीन प्रोग्रॅम लिहणं हा तर झुकरबर्गसाठी छंदच झाला होता. मार्कने हार्वर्ड विदयापीठात कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी या शाखेत प्रवेश घेवुन आपल्या माहाविदयालयीन जीवनाला सुरवात केली. या काळात मार्कने गंमत म्हणुन ‘फेसमस’ हा प्रोग्रॅम तयार केला. यात पोस्ट केलेल्या फोटोंवर विदयार्थ्यांनी आपलं मत मांडायचं होतं. पण हा प्रोग्रॅम काही दिवसातच बंद पडला. परवानागी शिवाय फोटो वापरल्याबद्द्ल झुकरबर्गवर टिकाही झाली अणि त्याला माफीही मागावी लागली. परंतु हाच प्रयत्न झुकरबर्गला फेसबुकच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरला. मार्क शिकत असलेल्या अ‍ॅकॅडमीत विदयार्थ्यांची माहिती आणि फोटोज संकलित केलेली डिरेक्टरी असायची त्याला फेसबुक असे म्हटलं जायचे यावरुनच साईटला ‘फेसबुक’ असं नाव दिलं गेलं असं म्हटलं जाते.

वेबच्या दुनियेत क्रांती घडवणाऱ्या झुकरबर्गचे यश त्याच्या वयाच्या मानाने कितीतरी मोठे आहे, यशाची एकेक पायरी चढत असताना मोठया उद्योगसमुहांकडुन येणाऱ्या ऑफर्स डावलून फेसबुक ने आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवली. मला अणि माझ्या सहकाऱ्यांना केवळ पैसा महत्वाचा नसुन लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट्य आहे. “My aim is making world open” असं त्याने एक मुलाखतीत म्हटलं आहे. आजमितीला मार्क झुकरबर्ग हा जगातला सर्वात कमी वयाचा अब्जाधीश आहे. जगात ९०० मिलियन फेसबुकचे युजर्स आहेत.

फेसबुकमुळे शाळा-कॉलेज मधले मित्रमैत्रिणी पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. मित्राचा मित्र, मैत्रिणीची मैत्रीण, तिची बहिण, तिचा भाऊ, सख्ये, चुलत - निलत अगदी शेजारी राहणारे ताई, माई, दादा सुध्दा ही लिस्ट तर हजारांवर जाऊन पोहचते. ज्यांना रोजच काय पण अनेक वर्षात भेटता आले नाही किंवा ज्यांच्या भेटीची शक्यताही दुरापास्त आहे त्यांना आता आपण रोज भेटतो फेसबुकवर. या सगळ्याच्या सुखदु;खात जरी आपल्याला प्रत्यक्षपणे सामील होता आलं नाही तरी अप्रत्यक्षपणे सामील होण्याची सोय फेसबुक ने उपलब्ध करुन दिली आहे. एरव्ही सामाजिक, राजकीय विषयांवर टिका, टिपण्णी करणं ही पत्रकार आणि नेते मंडळीचीच मक्तेदारी समजली जायची पण फेसबुकमुळे सामान्य माणुस या विषयांवर आपलं मत हिरीरीने मांडू लागला. फेसबुकमुळे प्रत्येकाला हक्काचं व्यासपीठ मिळालं. आखाती देशातल्या हुकमशाहीविरुद्धच्या आंदोलनाचं श्रेय फेसबुकला जाते. त्याचबरोबर इंटरनेट साक्षरतेचं प्रमाणही वाढलं. आता तर दहशतवादी ही फेसबुकच्या मोहाला बळी पडले आहेत साहजिकच याचा फायदा पोलिसांना झाला. आता तर म्हणे नोकरी देण्याआधी कंपन्या उमेदवाराचं फेसबुक फ्रोफाईल बघतात. फेसबुकमुळे कांदापोहयांचा कार्यक्रम ही बंद पडायला फार दिवस लागणार नाही. फेसबुकचा प्रभाव इतका आहे कि, जर्मनीत एका मुलीने तिच्या वाढदिवसाचं आमत्रंण पब्लिकली पोस्ट केलं होतं. तिच्या वाढदिवसाला १,६०० लोक जे निमंत्रीत नव्हते तेही जमा झाले होते. परिणामी जमावाला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांची कुमक मागवावी लागली. याचं आणखी उदाहरण म्हणजे फेसबुकवर १३ वर्षाखालील मुलांना अकांऊट उघडण्यास बंदी आहे पण एका कंज्युमर रिपोर्ट सर्व्हेनुसार १३ वर्षाखालील ७.५ मिलियन मुलांचं अकाऊंट फेसबुकवर आहे.

फेसबुकचे जसे फायदे आहेत तसे तोटे ही समोर यायला लागले आहेत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. फेसबुकचं जग जेवढं मोठं आहे तेवढं खोटं आहे. या जगात सगळंच उघडं वाघडं असतं. फेसबुकला मराठीत ‘चव्हाटा’ असं म्हटंल तर वावगं ठरणार नाही. चकाट्यापिटण्यासाठी दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्यासाठी तसंच ढोल पिटण्यासाठी फेसबुक उत्तम चव्हाटा असं मत आज व्यक्त केलं जातयं . आज गल्लोगल्ली खेडोपाडयात फेसबुकाचा प्रसार झाला आहे. जर तुमचं फेसबुकवर अकांऊट नसेल तर तुम्ही कितीही उच्चशिक्षित असलात तरी तुम्ही अडाणी समजले जाता. लग्न, मुंज, नविन बाळाचा जन्म, वाढदिवस, सक्सेस, सरकारचा निषेध, आदरांजली, श्रद्धांजली सगळच इथे शेअर केलं जातं. इथे सगळ्याच फोटोज्‌ना लाइक्स मिळतात आणि मिळालेले लाईक्स बघुन सगळेच हुरळून जातात. तासन्‌तास फेसबुकवर घालवणारे महाभाग कमी नाहीत. फेसबुक काहींच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसच कामाच्या वेळेत फेसबुकवर रमणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगाम घालण्यासाठी अनेक कंपंन्यामध्ये तर फेसबुकवर बंदी घातली आहे. भ्रष्टाचारविरोधी चळवळ असो किंवा दडपशाही त्याविरोधात फेसबुकवर नेहमीच आवाज उठवला जातो. आपल्या देशातील भ्रष्टाचारविरोधी चळवळ, अण्णांचं उपोषण किवा सत्यमेव जयते सारख्या कार्यक्रमासाठी फेसबुकवर तर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो. पण हे सगळं लाईक्स आणि कॉमेंट या पलीकडे जात नाही. आता तर उठसुठ, खरं - खोट याची चाचपणी न करता तसच परिणामांचा विचार न करता काहीही पोस्ट करण्याचा प्रमाण वाढलं आहे. एकदा तर फेसबुकवर भला मोठा नाग असलेला फोटो पोस्ट केला होता आणि खाली तो खरा असल्याचं सागंण्यात आले होते, वर दिसल्यास खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. तो नाग खोटा असल्याचे स्पष्ट दिसत होते. हे अफवा पसरवण्यासारखे नाही का? स्त्री भ्रुण हत्या हा तर फेसबुकवर सध्या सर्वात हॉट टॉपिक आहे. पण आपली मित्रमंडळी ‘मुली वाचवा’ हा संदेश देताना जी छायाचित्रे पोस्ट करतात ती मन विषण्ण करणारी असतात. एकदा तर एका पोस्ट मध्ये एका उंच कडयावरुन एक पुरुष स्त्रीला लाथ मारुन ढकलून देतो असा फोटो होता आणि लिहलं होतं प्रोब्लम सॉल्व. पोस्ट करणाऱ्यानी हाहा अशी कॉमेंट केली होती आणि वर त्याला लाईक्स ही होते. या पोस्ट मधुन तर पोस्ट करणारा आणि त्याला लाईक्स करणारे यांच्या खुज्या मानसिकतेचे प्रदर्शन झाले. विषेश म्हणजे स्त्री भ्रुण हत्येविरोधात आवाज उठविणारे हेच ते ढोंगी असतात. आपल्याच समाजात लपलेले हितशत्रु आपल्याला कळतात ही फेसबुकची सकारात्मक बाजु म्हणावी लागेल. हे सगळं थाबंण्यासाठी काही बंधने घालण्याची सोय अजिबात नाही कारण ते फेसबुकला मान्य नाही.

आता तर फेसबुकवरची अकाऊंट ही हॅक होऊ लागली आहेत. हॅकर्स अकाऊंट हॅक करुन त्यावरुन अश्लील फोटोज पोस्ट करतात म्हणजेच तुम्ही जरी फेसबुकवर नैतिकता जपण्याचा प्रयत्न केला तरी उद्या तुमचं अकाऊंट हॅक करुन त्यावरुन काहिही पोस्ट केलं जाऊ शकतं. मध्यंतरी बंगळूरमध्ये २००० हजाराहुन अधिक युजर्सची अकाऊंट हॅक झाल्याची बातमी प्रसिध्द झाली होती. परंतु अकाऊंट हॅक च्या बातम्यांना वावडया ठरवणाऱ्या फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गचं फेसबुकवरील अकांऊट हॅक झालं. आता तर वाढणाऱ्या घटस्फोटांना फेसबुकला जवाबदार ठरवलं जातय. झुकरबर्ग स्वत: जरी लग्नाच्या बंधनात अडकला असला तरी जगभरातल्या एक तृतीयांश लोकांच्या घटस्फोटांना फेसबुकवरची जवाबदार धरलं गेलय. ब्रिटनमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. अर्जात जोडीदाराने फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह गोष्टींची नोंद किंवा संदेश यांचा समावेश करण्यात आला होता. ब्रिटनच्या संस्थेने मागील वर्षी झालेल्या ५ हजार घटस्फोटांचा अभ्यास केला त्यात हे निष्कर्ष समोर आले आहेत. फ्लर्ट करण्यासासाठी फेसबुकच सगळ्यात सोपा मार्ग आहे असंही त्यात म्हटलं आहे. मोबाइल वर फेसबुक उपलब्ध झाल्याने आधी फोनला चिटकलेली तरुणाई आता फोनवर बोलण्यापेक्षा फेसबुकवर चॅट करणं पसंत करते.

फेसबुकचे फायदे तोटे काहीही असले तरी फेसबुकने सामान्य माणसाला बरेच काही दिले आहे. फेसबुकमुळे आपल्यातला प्रत्येकजण विचार करायला लागला, आपलं मत मांडायला शिकला. राजकीय, सामाजिक क्रांती घडवण्याचे सामर्थ्य फेसबुकने सामान्य माणसाला दिले. आखाती देशातील उलथापालथ हे याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणुनच चीन आणि इतर आखाती देशात सामान्य माणसाचा आवाज चिरडण्यासाठी फेसबुक वर बंदी घातली गेली. मार्क झुकरबर्ग ने अवघ्या जगाला सशक्त माध्यम उपलब्ध करुन दिलं आहे, त्याचा वापर कसा आणि किती करायचा?, हे आपल्यावरच नाही का!

फेसबुक चे अधिकृत संकेतस्थळ: www.facebook.com