दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ ऑक्टोबर २०१६

दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे - मराठी लेख | Diwali San Manuskichya Rangane Ujalude - Marathi Article - Page 3

समाज आणि देशाचा विकास, उन्नती आजच्या नवयुवकांच्या हातामध्ये आहे याचं भान आणि जाण नक्कीच आजच्या युवकांमध्ये आहे.

सामाजिक बांधिलकी या नात्याने समाजातील शांतता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘फुल नाही फुलाची पाकळी’ या नात्याने रंजल्या गांजल्यांसाठी आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आपण सदैव पुढे आले पाहिजे आणि प्रत्येक चांगल्या लोकोपयोगी कार्यासाठी आपला हातभार लागला पाहिजे. ही सामाजिक कृतज्ञतेची भावना प्रत्येकामध्ये रुजणे आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक, राजकीय वातावरण दूषित होत असताना प्रत्येकाने या देशाचा नागरिक या नात्याने या विषमतेच्या, जातीय आणि धर्मांधतेच्या वातावरणामध्ये दीप होऊन तेवत राहिले पाहिजे.

समाज आणि देशाचा विकास, उन्नती आजच्या नवयुवकांच्या हातामध्ये आहे याचं भान आणि जाण नक्कीच आजच्या युवकांमध्ये आहे. आजचा युवक नक्कीच संवेदनशील आहे, ‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे’ या विंदांच्या काव्यपंक्तीप्रमाणे आपल्याबरोबर वंचितांचे, दिन - दुबळ्यांचे आयुष्य आणि भविष्य उज्वल करण्याचे आणि आपल्या वंचित बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपण सार्‍या देशबांधवांनी, नवयुवकांनी करायचे आहे. आज या मंगलमय दिवाळीच्या सणानिमित्त आपण सर्वांनी हीच प्रतिज्ञा आणि प्रार्थना करायची आहे की, सर्वांचं आयुष्य सुखी समाधानाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे होऊ दे, सर्व प्राणिमात्रांना चांगली बुद्धी लाभू दे, सर्वाचे कल्याण होऊ दे आणि सर्वांच्या सुखाच्या आनंदाचा हिस्सा होण्याचे भाग्य आम्हाला लाभू दे हीच आपल्याला ईश्वर चरणी प्रार्थना करायची आहे.

स्वतःपुरते जगणारे कधीच खरे आयुष्य जगू शकत नाहीत ज्याला दुसर्‍याच्या दुःखाचा कळवळा आहे, दुसर्‍याच्या डोळ्यातील अश्रू पाहून ज्याचा उर भरुन येतो, ज्याला एकमेकांप्रती आपुलकी आणि सद्भावना आहे, मग तो मुका प्राणी का असेना; अश्या या आत्मीयता, आपुलकी, आपलेपण, बांधिलकी, समता, बंधुता असलेला समाज आणि व्यक्तीच बदल घडवू शकते आणि अश्या प्रकारचा समाज आणि व्यक्ती आपल्या समाजामध्ये आहे म्हणूनच हा समाज, हा देश तरलेला आहे. हीच आशा आणि अपेक्षा यापुढील काळातील तरुणाईकडूनही आहे.

चला तर मग आपल्या आनंदाबरोबर सर्वांचा आनंद द्विगुणीत करुया, अनेक संकटे येतील त्या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य आणि धाडस नक्कीच प्रत्येकामध्ये येवो आणि दुःखाच्या, संकटाच्या खाईतून सर्वांना तारुन पुढे घेऊन जावो हीच सद्भावना आणि प्रार्थना. दुसर्‍याच्या चेहर्‍यावरील दुःख तर आपण अनेकदा पाहत असतो पण इतरांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहण्याचे भाग्य क्वचितच काही जणांना लाभत असते, समोरच्या व्यक्तीच्या आनंदाचे कारण जर आपण असेल तर जगातील कोणत्याही आनंदापेक्षा हा आनंद सर्वात मोठा असतो. तर चला मग आज दिवाळीच्या क्षणाला इतरांच्या आनंदाचे कारण बनूया.

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी गुरु ठाकूर