दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ ऑक्टोबर २०१६

दिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे - मराठी लेख | Diwali San Manuskichya Rangane Ujalude - Marathi Article

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥संत ज्ञानेश्वर

‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’ या तत्वांना घेऊन आज आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करुया.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून मांडलेले हे विचार जगाला मानवतेची शिकवण देतात. दिवाळी हा सण उत्साहाचा, आनंदाचा आणि नवे विचार नवी दिशा दाखवणारा सण, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आणि जीवन उजळवून टाकणारा दीपोत्सवाचा सण, वाईट प्रवृत्तीचा नाश करुन चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायला लावणारा सण. नवा जोश, नवा उत्साह घेऊन येणारा सण, मानवतेचा संदेश आणि शिकवण देणारा सण, मैत्री वाढवणारा आणि वैरभावना नष्ट करणारा सण, हर्षोल्लीत करणारा, सुखवणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण, दिवाळी नव्या सप्तरंगाची उधळण, दिवाळी म्हणजे नवे कपडे, नव्या वस्तुंचं भांडारच, दिवाळी म्हणजे आवडत्या वस्तुंची खरेदी आणि सोनेरी स्वप्नाची बरसात.

‘दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती’ या तत्वांना घेऊन आज आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करुया. अलीकडच्या काळामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो. आजच्या बदललेल्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवनवीन वस्तुंची खरेदी करणे, वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबासमवेत फिरायला जाणे, मौज मजा करणे, मित्रांसोबत पार्टी करणे, भरमसाठ महागाचे फटाके फोडणे इतकाच मर्यादित अर्थ आजच्या तरुणाईला माहीत आहे. हे तरुणाईच्या वेगळ्या प्रकारच्या उत्साहावरुन आणि वर्तनावरुन जाणवते.

बदलती जीवनशैली, वाढते औद्योगिकीकरण, कारखानदारी, भांडवलशाही, दळणवळणाच्या साधनांची वाढ, चैनविलासी जीवनप्रवृत्ती, चंगळवाद यामुळे आजची तरुणाई दिशाहीन होताना दिसत आहे. तंत्रज्ञानांचा वाढता अमर्यादित वापर आणि संगणकाने घेतलेल्या मानवाच्या मेंदूवरील ताबा यामुळे स्वतः विचार करण्याची शक्तीच क्षीण होत चालली आहे. अश्या या बाहेर पडता न येणार्‍या जाळ्यात आम्ही सापडलेलो आहोत, पण आपल्या या समाजामध्ये असाही एक वर्ग चाचपडत आहे. दुर्लक्षिलेला आणि वंचित आहे. आम्हाला या वर्गाशी काही देणे घेणेच नाही. आम्ही फक्त पुस्तकातील प्रतिज्ञेपुरतं मर्यादित ठेवलं आहे त्यांना.