चला परत लहान होऊयात

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ नोव्हेंबर २०१४

चला परत लहान होऊयात - मराठी लेख | Chala Parat Lahan Houyat - Marathi Article

मुले निरागसच असतात, त्यांना त्यांचे आयुष्य फुलवण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे. फुलपाखरांसारखं बागडू द्यायला पाहिजे, कच्च्या मडक्याला जसा आकार देऊ तसे ते मडके घडत असते. तसेच मुलांना जसे आपण घडवू तसेच ते घडत जाणार.

आईबाबा होणे हा निसर्गाने दिलेला सन्मान आहे. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालक म्हणतात कि मुलांना वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांना समजून घ्यायला आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. यामुळे मुले एकलकोंडी होतात असा समज झाला आहे.

आम्ही दोघे पण नोकरी करतो. आम्हाला पण साडे चार वर्षाचा मुलगा आहे. पण जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा आम्ही पण त्याच्या सोबत लहान होतो. त्यामुळे आमच्यासाठी रोजच बालदिन असतो. त्याचे हसणे, रडणे, मस्ती, खोडकरपणा, रुसणं, फुगणं हे सगळ आम्ही पण त्याच्या सोबत लहान होऊन त्याला समजावत असतो. यासाठी मुलांना काय आवडतं आणि काय नाही हे शोधणं आवश्यक आहे.

२१ व्या शतकातील मुले ही खूप हुशार, चंचल आहेत, मल्टी टॅलेन्टेड आहेत. त्यामुळे त्यांना समजून घेणे पण अवघड असत . त्यांचे प्रश्न कधी अशी असतात कि यावर आपल्या कडे उत्तर नसते. पण आपल्या मुलांबद्दल आपणच अभ्यास केला तर या सर्व गोष्टींचा मार्ग आपोआपच मोकळा होतो. आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क या मुलांना पण आहे. हा हक्क मिळालेल्या आपल्या नशीबवान मुलांनी आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याबाबतची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

पालकांनी ही जाणीव आपल्या मुलांच्या मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतीलच शिवाय कायमच वंचित आणि नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या ह्या प्रयत्नांमुळे चांगले आयुष्य मिळू शकेल. आपण सगळ्यांनी हे सुजाण पालक म्हणून स्वीकारलात तर ही पिढी नक्कीच सुसंस्कारित होईल.

मुला-मुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे. मुले निरागसच असतात, त्यांना त्यांचे आयुष्य फुलवण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे. फुलपाखरांसारखं बागडू द्यायला पाहिजे, कच्च्या मडक्याला जसा आकार देऊ तसे ते मडके घडत असते. तसेच मुलांना जसे आपण घडवू तसेच ते घडत जाणार. शेवटी चागलं-वाईट, योग्य-अयोग्य हे सांगायला तर आपणच आहोत.

आज १४ नोव्हेंबर भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान होते पंडित नेहरू. यांचा आज वाढदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो. या बालदिनाचे औचित साधून मी आमच्या मुलाला ‘सक्षम’ला मोठे करतानाचा आमचा अनुभव मी मांडला……चला तर मग पुन्हा आजपासून लहानपणाचा अनुभव घेउया. बालदिनाच्या शुभेच्छा.