चैत्र पालवी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ नोव्हेंबर २००९

चैत्र पालवी | Chaitra Palavi

चैत्र पालवी - [Chaitra Palavi] काल चक्रानुसार होणारे ऋतु बदल आणि भारतीय संस्कृतीमध्ये साजरे केले जाणारे सण-उत्सव, यांचे नाते थोडक्यात स्पष्ट करणारा लेख.

ऋतूबदल चैत्र महिन्यात घडतो. म्हणून तर झाडांना फुटलेल्या नव्या पालवीला ‘चैत्रपालवी’ म्हणतात.

भारतीय संस्कॄतीमध्ये सण-उत्सवांच्या परंपरांना कालचक्रानुसार होणाऱ्या ऋतुबदलांचेही परिणाम लाभलेले आहे. शिशिरानंतर वसंतऋतूचे आगमन होते. झाडांना नवीन पालवी फुटते, नवा बहर येतो. उत्साहाचे नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. असा हा आनंददायी ऋतूबदल चैत्र महिन्यात घडतो. म्हणून तर झाडांना फुटलेल्या नव्या पालवीला ‘चैत्रपालवी’ म्हणतात, पूर्वीच्या काळी चैत्र महिन्याला ‘मधुमास’ म्हणत; या नावावरूनच या ऋतूचा या महिन्याचा गोडवा ध्यानात यावा.

महाराष्ट्रात हिंदून परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जातो. या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्षप्रतिपदा मानली जाते. ‘प्रतिपदा’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत ‘पाडवा’ हा शब्द रुढ झाला. वसंतऋतूचे आगमन आणि नव्या नव्या वर्षाचा प्रारंभ म्हणून ‘चैत्री पाडवा’ साजरा होतो. या दिवशी गुढ्या. तोरणे उभारण्याची परंपरा रुजल्याने या सणाला गुढी पाडवा असे संबोधले जाते.

चैत्र शुद्ध प्रतिपदेस हे नाव आहे. या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात व भारताच्या इतर भागात नूतन वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेस होतो. या दिवशी काही धार्मिक विधीही सांगितले आहेत.

घरातील सर्वजण तैलाभ्यंण करून उष्णोदकाने स्नान करतात. नंतर कडुलिंबाची पाने भक्षण करतात. कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाचे टाळे व फुलांची माळ बांधून दारात तो ध्वज अर्थात गुढी उभारण्याचा पाडवा म्हणूनच याला गुढी पाडवा असे म्हणतात. दुपारी मिष्टान्नाचे भोजन करतात. उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफळ श्रवण करतात. गुढी पाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे.