चहा तो चहाच

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ जानेवारी २०१८

चहा तो चहाच - मराठी लेख | Chaha To Chahach - Marathi Article

माझ्या मते चहा तो चहाच. त्याची सर अन्य कोणत्याही पेयाला येत नाही. आपण कितीही थकलेले दमलेले असो चहाचा एक कप तरतरी आणल्याशिवाय रहात नाही.

मध्यंतरी एक जाहिरात पाहण्यात होती. त्यात म्हटले होते की, बाईने कुंकला अन्‌ मर्दाने चहाला नाही कधी म्हणू नये. मी तर चहाचा पहिल्यापासून चाहता आहे. दिवसातून मला किमान दोन - तीन वेळा तरी चहा लागतोच. एक परी जेवण मागे पुढे झाले तरी चालेल मात्र चहाची वेळ चुकता कामा नये. मला शुगर असल्याने डॉक्टरांनी गोड खाणे सोडण्याचा सल्ला दिला. मी त्यांचा सल्ला काही अंशी मानला मात्र चहाच्या बाबतीत मानला नाही. काही लोक चहापेक्षा कॉफी, कोको, दूध पिणे चांगले असा सल्ला देतात. माझ्या मते चहा तो चहाच. त्याची सर अन्य कोणत्याही पेयाला येत नाही. आपण कितीही थकलेले दमलेले असो चहाचा एक कप तरतरी आणल्याशिवाय रहात नाही. गोरगरीबांचे सर्वात स्वस्त पेय म्हणून चहाकडे पाहिले जाते. घरातील चहा वेगळा, गाड्या वरील चहा वेगळा. मित्रांसोबत दोन कटींग अशी ऑर्डर देवून चहा पिण्यात एक वेगळीच मजा असते. गप्पा मारत मारत एक कप चहा कधी संपतो तेच कळत नाही. चहाचा कप हे मैत्री जुळविण्याचे एक खास साधन मानले जाते. दोन माणसे कधीही एकत्र भेटली की ‘चला चहा घेऊ या’ असे म्हणत मैत्रीचा धागा अधिक भक्कम करतात. चहाचा एक कप मैत्री जुळवतो तसेच फार दिवसाचे वैमनस्य देखील दूर करतो. प्रेम जुळविण्यात तर चहाचा कप चांगलीच मध्यस्ती करतो. प्रथम भेटलेल्या प्रेमी युगुलात बोलण्याचे धाडस चहाच्या एका कपाने येते.