बाप्पा मोरया

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ ऑगस्ट २०१४

बाप्पा मोरया | Bappa Morya

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥

नमस्कार! आपल्या आयुष्याला चैतन्याचा, मांगल्याचा, प्रसन्नतेचा साज चढवणारा गणेशोत्सव सुरू झालाय. आरतीचे स्वर ऎकू येत आहेत. सुवासिक अगरबत्ती, सुगंधी फुलं यांनी आसमंत भरून गेलाय. फळं, फुलं, पत्री, दुर्वा, विविध प्रकारच्या मिठाया, सजावटीचं सामान यांनी बाजारपेठा फुलून गेल्यात. एकंदरीत काय अनंतचतुर्दशीपर्यंत वातावरण भारलेलं असणार आहे.

गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या आनंदाचा, अभिमानाचा आणि भक्तिभावाचा विषय आहे. सर्वजनिक गणेशोत्सवाला तर शंभर वर्षाहून मोठी परंपरा आहे.

गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने तर दरवर्षीच साजरा होतो. पण आपलं जे दैवत आहे त्याच्या गुणांचं अनुकरण करणं, त्याच्या वागण्याचा आदर्श आपल्या आचरणातून व्यक्त होणं म्हणजेच त्याची खरी उपासना आहे याचा मात्र विसर पडायला नको.

‘गणेशाची गुणाने पूजा बांधणे’ हे केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर समाजहिताच्या आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीनेही आवश्यक ठरतं. गणेश ही देवता सर्वसमावेशक आहे. मानवी जीवन सर्वांगाने फुलावं - बहरावं अशी शिकवण गणपती बाप्पा आपला सखासांगाती आहे. सर्वच क्षेत्रात असाधारण बुद्धीमत्ता आणि डोळे दीपवणारे कर्तुत्व दाखविणाऱ्या गणपतीचं आज घराघरात पूजन होत आहे. गणपती बाप्पापुढे नतमस्तक होताना आपण एका पराक्रमी परोपकारी नेतृत्वाची पूजा करत आहोत ही भावना मनात हवी. भारताच्या इतर भागातही गणपतीचं पूजन होतं.

कोकणात गणेशोत्सवाची मोठी धमाल असते. गावात साजरा होणारा गणेशोत्सव वैशिष्ट्यांनी नटलेला आहे. कोकण मुळातच पारंपारिकतेवर प्रेम करणारा आहे. गणेशोत्सव हा कोकणातला महाउत्सव आणि खवळे महागणपतीची तर ख्यातीच न्यारी.

एकाच ठिकाणाहून एकाच प्रकारची माती आणून एकाच वजनाची मूर्ती दरवर्षी घडवणारा ३१३ वर्षांची परंपरा असलेला गणपती म्हणजे खवळे महागणपती. पहिले चार दिवस सफेद नंतर संपूर्ण रंगकाम केलेला आणि विसर्जनाच्या दिवशी पिवळे ठिपके दिलेला असा २१ दिवसात २१ रुपात दिसणारा हा एकमेव महागणपती आहे.

मूर्ती घडवण्यासाठी पाटावर माती ठेवल्यापासून नवस बोलला जाणारा देवगड तालुक्यातील नाडणचा सार्वजनिक गणपती आहे. या गणपतीवर येथील नागरिकांची अपार श्रद्धा आहे.

मुर्तीकामासाठी माती पाटावर ठेवल्यानंतर अगरबत्ती धुपारतींनी पूजा होते. गेल्या तीन पिढ्या मोठ्या श्रद्धेने पूजला जाणारा गणपती चित्रशाळेत असेपर्यंत चतुर्थीपर्यंतचे दिवस अगदी मंतरलेले असतात.

मालवण तालुक्यातील कोईल गावात ‘एक गाव एक गणपती’ ही प्राचीन काळापासून सुरु असलेली संकल्पना. या गावातले लोक गावाबाहेरील मातीतून कोणतीही मूर्ती घडवित नाहीत आणि कुठल्याही भागातील मातीच्या मूर्तीला हात लावून नमस्कार करत नाहीत. गावातील गणपती मंदिरातील पाषाणाची यथासांग पूजा होते. कोईलमध्ये गणपतीची विसर्जन मिरवणूक निघत नाही. त्याऎवजी फुलपात्री आणि निर्माल्य गंगापर्ण केलं जातं. गावचा गणपती एकच. या गावात गणेशाचं कोणत्याही अवतारातलं अथवा कोणत्याही कलाकृतीतलं छायाचित्र ग्रामस्थांच्या घरात आढळून येणार नाही. अशाप्रकारे कोकणप्रांतात गणपतीचं आगळंवेगळं महत्व आहे.

गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या आनंदाचा, अभिमानाचा आणि भक्तिभावाचा विषय आहे. सर्वजनिक गणेशोत्सवाला तर शंभर वर्षाहून मोठी परंपरा आहे. या गणेशोत्सवाने महाराष्ट्राला नेते, अभिनेते, वक्ते, कार्यकर्ते दिले. जनसामान्यांमध्ये देशाभिमान जागविला. लोकमान्य टिळकांनी प्रत्येक वर्षाच्या गणेशोत्सवात जी भाषणं दिली त्यातील प्रत्येक भाषण म्हणजे संजीवनी मंत्रच आहे. असा हा मराठी मातीत रुजलेला मराठी मनाला मोहवून टाकणारा मराठी माणसाच्या जीवनाशी समरस झालेला गणेशोत्सव.

कलीयुगात गणपतीचं नाव धूम्रवर्ण असं आहे. धूम्र म्हणजे धूर. अज्ञानाच्या अंधश्रद्धेच्या प्रदूषणाच्या काळात हे नाव किती यथार्थ आहे हे वेगळं सांगायला नको. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणपतीकडे चांगलं अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी बुद्धी आणि शक्तीचं वरदान मागूया.

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !