१०० करोड रुपयांच स्मारक कशाला ?

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ फेब्रुवारी २०१४

१०० करोड रुपयांच स्मारक कशाला ? | 100 Crore Shivaji Monument

छत्रपती शिवाजी महाराज या एकट्या स्मारकातून लक्षात राहणार आहेत का ?

पर्यटनाला वाव मिळावा, महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून शासनामार्फत गिरगाव चौपाटीसमोर समुद्रात १०० कोटी रुपये खर्च करुन स्मारक उभारण्याची संकल्पना आहे, प्रत्यक्षात या स्मारकाची गरज आहे का? छत्रपती शिवाजी महाराज या एकट्या स्मारकातून लक्षात राहणार आहेत का ? याचं उत्तर...

शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, शिवाजी हे नुसतं कर्तृत्व नाही, शिवाजी हे नुसतं नेतृत्व नाही तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिणाम आहे आणि म्हणूनच शिवाजी महाराज जनमाणसाच्या हृद्यात आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षानंतरही माझ्या राजा बद्दलची जी जनमाणसात प्रतिमा आहे ती एवढ्याचसाठी, त्याच्या विचारांचा जागर आहे तो एवढ्यासाठी.

मग या आमच्या शिवरायांच्या ऎतिहासिक आठवणींना जतन व संवर्धन करायचे सोडून आज परत त्यांच्या नावाने नवीन स्मारक कशाला ?

शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या ३५० किल्ल्यांची देखभाल केल्यास त्या परिसराचा विकास होईल आणि आपण शिवाजी महाराज पुढच्या पिढीसाठी उत्तमरित्या सादर करु शकू, त्याच्या मनात रुजवू शकू.

शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत १३ किल्ले बांधले. सिंधुदूर्ग व विजयदूर्ग हे जलदूर्ग आजही पराक्रमाची गाथा गात आहेत. रायगड, पन्हाळगड, शिवनेरी असे निवडक किल्लेच आम्हाला माहित आहेत. पण प्रत्यक्षात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ३५० हून अधिक किल्ले, बुरुज, खिंडी, देवळे आपली वाट पहात आहेत, याची माहिती आम्हाला कधी होणार? आम्ही केव्हा जागे होणार?

अशा अनेक ठिकाणांची माहिती आज लोप पावत आहे. दूर्ग, बुरुज ढासाळले आहेत, तर पुरातन शिल्प, मुर्त्या चोरीस जात आहेत, इतिहासाच्या पाऊलखुणा आपणच पुसून टाकत आहोत.

लोकहो ! अशी महाराजांची माहिती मराठी माणसाच्या नव्हे तर सर्व धर्मातील माणसा-माणसाच्या हृद्यात कोरली जावी याचा आचारात्मक विचार व्हायला हवा. मराठमोळ्या तरुणाईत शिवरायांच्या शौर्याचा संचार व्हायला हवा.

आणि हेच नेमकं शासनात घडवून आणायला हवं. इ.स. १९ फेब्रुवारी १६२७ ते १३ एप्रिल १६८० (५३ वर्षाचा) प्रदीर्घ काळ एक महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजोमय काळ्खंड आहे. या काळखंडात महाराजांनी जी पराक्रमाची शिखरे जिंकली वा काबीज केली, त्यांचा इतिहास आमच्या शैक्षणिक वर्षात अ, आ, इ, ई.. शिकवितांनाच शिकविला, सांगितला गेला पाहिजे. आमच्या राजाबद्दलची सखोल माहिती, पराक्रम त्या त्या ठिकाणी नेऊन समजावली पाहिजे. दूर्ग, भ्रमंती, गिर्यारोहण, सहली यासारख्या उपक्रमांतून बालवाडी पासून ते माध्यमिक विद्या शिक्षण घेईपर्यंत शिवाजी आमच्या रक्तात सळसळायला हवा. कॉलेज जीवनात तर ही तरुणाई स्वतःहून दर्‍या-खोर्‍यात, कड्या-कपारीत आपला इतिहास उलगडवून पाहिल यात शंका नाही. पण यासाठी आवश्यक आहे वा आवश्यकता आहे ती शासनाकडून प्रत्येक गडावर, बुरुजावर, मंदिरांवर उत्तम मार्गदर्शक वा गाईड नेमण्याची. ज्या गाईडकरवी प्रत्येक दगडाचा, पायरीचा इतिहास संदर्भ पर्यटकांना आकर्षित करायला हवा, त्या ऎतिहासिक वास्तुची देखभाल व्हायला हवी, त्याचे संरक्षण व संवर्धन व्हायला हवे. म्हणजेच एखादा बुरुज, दूर्ग ढासळला असेल तर त्यांची ऎतिहासिक रचना तपासून परत बांधून घायला हवा, त्या परिसराची स्वच्छता राखली जावी, त्याचे पावित्र्य राखले जावे यासाठी पर्यटकांवर कडक बंधनेही टाकावीत. जेणे करुन हे पुढल्या पिढीस वारसा स्वरुपात बहाल करता येईल. या दूर्ग, बुरुज, देवळे, खिंडी यांच्या शेजारी उत्तम राहण्याची सोय असावी जेणे करुन पर्यटकांना या स्थळाचा पूर्णपणे आस्वाद घेता येईल आणि हि सर्व सोय माफक दरात पर्यटकांना उपलब्ध व्हावी.

जसे पर्यटक कन्याकुमारी, काश्मीर वा परदेशभ्रमणाच्या सहली करतात तशाच टूर-ट्रॅव्हल्स यांच्याकडून दूर्ग, बुरुज, मंदिरे हे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज टूर (सहली) निघायला हव्या.

आज रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात राजमाता जिजाऊची समाधी आहे. या समाधीस्थळी पंचधातूचा जिजाऊचा पुतळा आहे. पण काही चोरट्यांनी हा पुतळा देखील चोरुन नेला. महाराष्ट्राच्या सर्व वर्तमान पत्रात बातमी आली पण संपूर्ण महाराष्ट्र गप्प बसून राहिला. अवघ्या मराठी जनतेसाठी शिवबानं आपलं जीवन वेचलं. शूर संभाजीनं मरण यातना भोगत प्राण सोडले, पण धर्म बुडविला नाही. अशा बलिदानाच्या पराक्रमाच्या गाथांना आम्ही एवढ्या लवकर विसरलो? आमचं रक्तं एवढ्यातच गोठलं?

माझ्या महाराष्ट्राला लाभलेल्या या सुपुत्राची ओळख जनमानसात खोलवर रुजवायची असेल तर त्यास नव्या स्मारकाची गरज नाही. या महाराष्ट्रात पुरातन ऎतिहासिक जे दूर्ग आहेत, बुरुज आहेत, खिंडी आहेत यांची डागडुजी करावयास हवी. नुसता पुरातत्व खात्याचा ‘ऎतिहासिक वास्तु’ असा बोर्ड लावून चालणार नाही.

तर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पावनखिंडीस प्रत्येक शिवप्रेमीने भेट द्यायला हवी. त्या पावन खिंडीतच बसुन झुणका भाकर खात-खात महाराजांच्या पराक्रमाचे गोडवे गायला हवे. इतका बदल घडवून आणणे शासनाकडून अपेक्षित आहे. १०० कोटी रुपयांमधील काहिसा भाग या सर्व उपक्रमांसाठी खर्च व्हायला हवा.

जर महाराष्ट्राच्या मातीच्या, मातीत वाढलेल्या मराठमोळ्या तरुणाईत पुन्हा शिवाजी रुजला, बहरला आणि संचारला तर काय बिशाद बिहार प्रमाणे आमच्याही महाराष्ट्रात दिवसा ढवळ्या अबलेची अब्रु लुटली जाईल, काय मजाल की कोणी लाचखोरी करेल आणि कष्टाच्या भाकरीचा गोडवा मंत्र्यासंत्र्यांनाही रुचेल.

माझ्या राज्याच्या शौर्याला, त्याच्या तेजाला कुण्या वेगळ्या स्मारकाची गरज नाही. गरज आहे ती उघड्या डोळ्यानं समाजाकडे पाहण्याची, समाजाच्या प्राथमिक गरजा भागविण्याची.

शिवाजी महाराज हे स्मारकापुरतं मर्यादित नाव नाही की शेंदूर पुसून देवळात पुजायला ठेवलेला मारुती नाही. तो राजा आहे जनमाणसाचा, तो राजा आहे जनमाणसाच्या हृद्याचा.

या राज्याच्या आचारांचा, विचारांचा जागर जनमाणसात रुजायला हवा.

धन्यवाद.