Maharashtra | महाराष्ट्र
MarathiMati.com - Android App on Google Play Store

वस्त्रे

ए. श्री. मोरवंचीकर

Maharashtra Historical Coins

कापसाचा शोध मानवी जीवनातील अतिशय क्रान्तिकारी घटना होय. कारण या शोधामुळे मानवाची रानटी अवस्था संपून त्याची सुसंस्कृत अवस्थेकडे वाटचाल सुरु झाली. आता नखदंतावलंबी, भटके, अर्धनग्न जीवन संपून स्थिर व निश्चित जीवनास आरंभ झाला. कारण कापूस पिकविणे म्हणजे कृषीजीवन जगणे होय.आता त्याला झाळांच्या ओधड-धोबड साली नेसण्याची व मृत जनावरांची कातडी पांघरण्याची आवश्यकता नव्हती. कारण कापसापासून सहजरीतीने वस्त्रे तयार करता येत होती. तसेच ती टिकाऊ असून धुता येत होती त्यामुळे त्यांचा झपाट्यांने प्रसार झाला.

कापसापासून कापड तयार करण्याचे ज्ञान त्याला पशुपक्ष्यांपासून अवगत झाले असावे. स्त्रियांनी या क्षेत्रात कमालीची प्रगती साधली. कारण स्त्रिया वस्त्र विणन्यात प्रवीण असल्याचे अनेक संदर्भ आपणास प्राचीन वाङ्‍मयामध्ये सतत आढळतात.
रेशमाचा शोध ही सुद्धा मानवी जीवनातील अत्यंत सुखद घटना होय. रेशीम कापसापेक्षा मुलायम असून त्याची वस्त्रे अधिक आकर्षक व टिकाऊ असतात. तथापि भारतीयाना रेशीमतयार करण्याचे ज्ञान नव्हते असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. कारण रेशमाची पैदास करणारा चीन हा एकमेव देश असून त्याने हेज्ञान इसवी सनाच्या काही शतकांपर्यंत अत्यंत गुप्त ठेवले होते. आजही जगामध्ये भारतीय रेशमापेक्षा चिनी रेशीम अधिक लोकप्रिय आहे. तसेच प्राचीन साहित्यामध्ये रेशमाचा उल्लेख `चीनसुक' अशा प्रकारे आलेला आढळतो. त्यामुळे वरील विधानास पुष्टी मिळते. त्यामुळे रेशमाचे उत्पादन व त्यापासून वस्त्र तयार करण्याची कला भारतीयाना ज्ञात नसावी असा समज पसरण्यास मदत झाली.
असे असले तरी पुरातत्व शास्त्रज्ञाना अगदी अलिकडे नवीन पुरावे उपलब्ध झाले आहेत. प्रागैतिहासिक व ऐतिहासिक स्थळांच्या उत्खननामध्ये अगदी खालच्या थरात रेशमाचे अवशेष उपलब्द झाले आहेत. या सर्व पुरातत्वीय पुराव्यावरून येथील मानवास कापसाप्रमाणेच रेशमापासून वस्त्रे तयार करण्याची कला प्रागैतिहासिक
(proto-historic) कालापासून अवगत असल्याचे स्पष्ट होते. या बरोबरच त्याला जरतारी व भरतकामाचेही ज्ञान असल्याचे समजते.
प्राचीन साहित्यामध्ये सुती, रेशमी व भरजरी कपड्यांचे उल्लेख विपुल प्रमाणात सापडतात. ऋग्वेदामध्ये जरतारी वस्त्राचा उल्लेख हिरण्यद्रपी म्हणून आला आहे. तर महाभारतामध्ये याचा उल्लेख मणिचिरा असा करण्यात आला आहे. यामध्ये जरतारी कामाबरोबरच माणिक-मोती व मौल्यवान हिरे गुंफण्याच्या नोंदी मिळतात. अशा प्रकारच्य मौल्यवान रेशमी वस्त्रांचा उल्लेख जैन साहित्यामध्ये पट्टा या नांवाने करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्रातील मौल्यवान वस्त्रांचा विचार केल्यास महानुभाव साहित्यामध्ये पैठणच्या भरजरी उल्लेख आढळतो. पाश्चिमात्य प्रवाशांच्या नजरेतून अशा प्रकारची वस्त्रे व ही वस्त्रे निर्माण करणारी केन्द्रे सुटली नाहीत. एकंदरीत प्राचीन कालापसून भारतामध्ये अशा प्रकारची वस्त्रे निर्माण करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट होते.
पारंपारिक कलाकाराने निर्माण केलेली ही अमोल वस्त्रे प्रतिकूल अशा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये टिकून राहिली यामध्येच त्यांचे मोठेपण दिसून येते. वैचित्र्यपूर्ण नक्षीकाम आणि उच्च पोत (texture)यामुळे जागतिक बाजारपेठातून भारतीय वस्त्रानी एकाधिकाअ प्रस्थापित केला. आणि दोन सहस्त्रकाहून अधिक काळ हा एकाधिकार अबाधित राहिला.
सुबक वीणकाम व त्यावरील गुंतागुंतीच्या विरंजन (bleaching)आणि रंगप्रकिया (dyeing) तसेच कोणत्याच प्रकारच्या आधुनिक तंत्राचा वापर न करता हाताने किंवा मागाचे सहाय्याने त्यावर नक्षीकाम करणे, हे युगानयुगांच्य परिश्रमाचे फलित मानावे लागेल. अशा प्रकारची कला ही सर्वसामान्यपणे आनुवंशिक असते. कठोर परिश्रम करण्याची तयारी, धंद्यावरील निष्ठा आणि परस्पर सहकार्याची भावना यामधून हे नैपुण्या साध्य होत असे. कला आनुवंशिक असल्याने धंद्यातील कसब बापातूनच मुलात उतरत असे. तसेच हा धंदाही पित्याकडून पुत्राकडेच जात असल्याने धंद्यातील जीवघेणी स्पर्धा टाळण्यास त्यामुळे मदत होत असे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत लेखामध्ये महाराष्ट्राच्या शतकानुशतकातील वस्त्रांचा इतिहास रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.
या परैसरातील सातवाहनांच्या उदयाने सांस्कृतिक विकासाचे आगळे दालन खुले झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली येथील नागरीकरणास (urbanisation) गती प्राप्त होऊन तेर, नाशिक (गोवर्धन), भोगवर्धन, जुन्नर, कोल्हापूर (ब्रह्मपुरी) आदि नागरी केन्द्रांचा उदय झाला. सातवाहन घराण्यांनी या परिसरावर चार शतकाहून (230 इ.स. पूर्व व ते 23o इ,स,) अधिक काळ राज्य केले. सातवाहन काळात लाभलेले राजकीय स्थैर्य आणि आर्थिक सुबत्ता नागरीकरण प्रक्रियेस पोषक ठरली. तसेच सातवाहन सम्राट व्यापाराबाबत अतिशय दक्ष होते. त्यांनी देशान्तर्गत व्यापारात सुसूत्रता प्रस्थापित करताच परदेशीय व्यापाराची (विशेषतः पाश्चिमात्य देशांशी) जोरदार आघाडी उघडली. अल्पावधीतच त्यांनी ग्रीक व रोम येथील बाजारपेठा हस्तगत केल्या.
याच सुमारास (इ. स. ४५-४६ मध्ये) हिप्पोलसने मान्सून वाऱ्याचा (मौसमी वारे) शोध लावून त्याची व्यापारासाठीची उपयुक्तता पटवून दिली. त्यामुळे सातवाहनांच्या पश्चिमी व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हा सर्व व्यापार भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून होत असल्याने पश्चिम किनाऱ्याचे महत्त्व वाढले. आणि लवकरच या परिसराचे नागरीकरण होऊन तेथे भडोच, कल्याण, नालासोपारा, चौल आदि बंदरे उदयास आली. प्रस्तुत बंदरे सह्याद्री पर्वतातील घाटमार्गांनी देशावरील प्रमुख बाजारपेठाशी जोडली गेली. त्यामुळे देशभर व्यापाराचा विस्तार होण्यास मदत झाली.
पाश्चिमात्य बाजारामुळे सातवाहनांची फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. ही त्यांची समृद्धी क्षत्रप या त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना सहन झाली नाही. म्हणून कोकणपट्टीवर व सातवाहन साम्राज्यावर प्रखर हल्ले करून पाश्चिमात्य व्यापार ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तथापि गौतमीपुत्र या सातवाहन सम्राटाने क्षत्रपांचे समूळ उच्चाट्टान करून परराष्ट्रीय व्यापारातील आपली पकड मजबूत केली.
मान्सून वाऱ्याचा शोध व क्षत्रपांचा पराभव यामुळे सातवाहनांचा व्यापार फार मोठ्या प्रमाणात वाढला. आणि त्यांच्या वैभवात भर पडली. व्यापारामध्ये प्रामुख्याने कापडाची फार मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती. कापडामध्ये रंगी-बेरंगी सुती व रेशमी कापड, रेशीम व तलम कापडाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. व्यापार सातवाहनांना फायदेशीर असल्याने ग्रीस व रोममधून फार मोठ्या प्रमाणात पैशाचा ओघ दक्षिण भारताकडे येत होता. या वस्त्रानी पाश्चिमात्य जगाला वेडे केले होते. प्लिनी या समकालीन लेखकाने रोमन लोकांच्या या उधळेपणावर सडकून टीका केली आहे. हा ओघ थांबविण्यासाठी रोमन लोकसभेला या आयातीविरुद्ध प्रतिबांधात्म कायदे करावे लागले होते. आज परिस्थिती नेमकी उलटी झाली असून आपणास पाश्चिमात्य आयातीवर बंदी घालावी लागत आहे. यालाच इतिहास चक्राची उलटी गती असे म्हणावे लागेल.
या वैभवाचे पडसाद समकालीन पाश्चिमात्य लेखकांच्या प्रवासवर्णानातून ठायी उमटलेले दिसतात. या परिसरातील वस्त्रोद्योग हे या समृद्धीचे मूलभूत कारण होते. आणि महाराष्ट्राने वस्त्रोद्योगात एकाधिकार प्रस्थापित केला होता. तसेच या कालखंडात पैठण हे सातवाहनांच्न्या राजधानीचे ठिकाण असून ते वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध होते. याशिवाय तेर, नेवासा, जुन्नर, नाशिक आदि केन्द्रेही वस्त्रनिर्मितीमध्ये अग्रेसर होती. आजच्या रौप्यमहोत्सवी वर्षात या दोन हजार वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचे स्मरण करणे आपले कर्तव्य ठरते.
हालसातवाहनाच्या गाहासत्तसई या प्राकृत काव्य ग्रंथातून आपणास समकालीन वैभवाची व बस्त्रप्रावरणाची कल्पना येते. प्रस्तुत ग्रंथात सातशे शृंगारिक गाथा असून पैकी गाथा क्रमांक २५५ ते २६३ आपणास वीनकाम, रंगकाम, भरतकाम व शिवणकाम यांची तपशीलवार माहिती देतात.
सातवाहनकालीन नाशिक येथील शिलालेख या उद्योगातील समृद्धीची कल्पना येण्यास फारच उपयुक्त आहेत. याशिवाय पितळखोरा, कार्ले, भाजे, बेडसा, अजिंठा आदि लेण्यातील शिल्पावरून आपणास समकालीन वस्त्रांची कल्पना येण्यास मदत होते. भारतीय पारंपारिक पोषाखामध्ये प्रामुख्याने मागावरील तयार कपड्यांचा समावेश होतो. त्यामध्ये प्रामुख्याने साडी, शेला, धोतर, शाल, फेटा लुंगी पट्टी (scarf) आदि वस्त्रे येतात. सर्वसामान्यतः ही वस्त्रे सुती असत; कारण प्राचीन कालापासून हा परिसर कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
भारतीय स्त्री आणि पुरुष यांच्या पोषाखाचा विचार केल्यास त्यामध्ये फारसा फरक आढळत नाही. स्त्रिया चोळी कंचुकी वापरीत त्याऐवजी पुरुष उत्तरीय नांवाचे वस्त्र पांघरीत असत. पोषाखात एकंदरीत अधोवस्त्र, अंतर्वस्त्र आणि परिवस्त्र असे तीन घटक असत. पुरुष डोक्यावर फेटा गुंडाळीत तर स्त्रिया अंगावरुन ओढणी घेत असत.
सुती कपड्यांशिवाय रेशमी कपडे वापरण्याची प्रथा होती. रेशमी कपड्यांवर जरतारी मीनाकारी करण्याच्या कामात येथील कारागीर आरंभापासून वाकबगार होते.. सुती आणि रेशमी कपडे रंगविण्याकडे लोकांचा कल होता. अजिंठा व बाग लेण्यातील नखरेल रंगीत चित्रे हि याची साक्ष होत. तसेच तलम वस्त्रे अतैशय लोकप्रिय होती. तलम वस्त्रे विणण्यात भारतीय कलाकार एकमेवाद्वितीय होता. शिल्पांनी उपरोक्त लेण्यातील शिल्पावर हीच वस्त्रे असल्याने शिल्पे अर्धनग्न किंवा नग्न भासतात. तथापि परिधान केलीली वस्त्रे अतिशय तलम असून त्याची जाणीव केवळ वस्त्रांच्या घड्यावरून होऊ शकते. एकंदरीत वास्तवाचा आभास निर्माण करणारा शिल्पी व वास्त्वात इतकी तलम वस्त्रे निर्माण करणार दोन्ही श्रेष्ठ होत.
तुलनात्मकदृष्ट्या रेशमी कापड महाग व केवळ श्रीमंतांनाच परवडणारे होते. आजही या स्थितीमध्ये फारसा बदल झालेला दिसता नाही. प्राचीन काळापासून स्त्रिया पोषाखाबाबत विशेष चोखंदळ वाटतात. त्यांची वस्त्रांविषयीची आवड, रंग-संगती व वस्त्र परिधान करण्याची पद्धती वाखाणण्यासारखी होती व आहे. साडी परिधान करण्याच्या अनेक पद्धती असून ते परिसरावर अवलंबून होते. सर्वसामान्यतः आठव्या शतकापर्यंत विकच्छ साडी आणि डोक्यावरून पदर प्रथा होती. नंतरच्या कालात ती नष्ट होऊन सकच्छ साडी घालण्यास प्रतिष्ठा लाभली. आणि आजही सकच्छ साडी आणि डोक्यावरून पदर हे महाराष्ट्रीय स्त्री -पोषाखाचे आगळे वैशिष्टय मानावे लागेल.
भारतीय पोषाखाचा विचार केल्यास ही पद्धती पारंपारिक असून त्यामध्ये बदल करण्यास फारसा वाव नाही. कारण ही वस्त्रे म्हणजे कमी अधिक लांबी रुंदीच्या मागावर तयार होणाऱ्या पट्ट्याच होत. यामध्ये शिवणकामास फारसे महत्त्व नाही. महाराष्ट्रही या पद्धतीस अपवाद नाही. तथापि भारतीयांचा जेव्हा परकीयांशी संबंध आला तेव्हा त्यांनी परकीयांचे कांही उपयुक्त वस्त्र प्रकार येथे रुढ करण्याचा प्रयत्न केला. आणि सम्राट अलेक्झांडरच्या आक्रमणापासून ब्रिटिश आक्रमणापर्यंत ही प्रक्रिया सातत्याने चालू असल्याचे दिसत. महाराष्ट्रात याचा आरंभ क्षत्रपांच्या आक्रमणापासून होतो. सातवाहन जेव्हा क्षत्रपांच्या संपर्कात आले तेव्हा सातवाहनानी त्यांचे कांही वस्त्रप्रकार आत्मसात केले. म्हणूनच आपणास नंतरच्या शिल्पकृतीमध्ये हा फरक जाणवतो. यामध्ये आपणास विजार, तंगविजार, शिरबंध, बंडी, झगा ( पायघोळ व अर्धा), पट्ट्यापट्ट्याची व फुलाफुलांची वस्त्रे आदि आढळतात.
सातवाहनोत्तर कालखंडातील वस्त्र प्रकारात थोड्याफार प्रमाणात बदल झाल्याचे बाणभट्ट, ह्युएनत्संग यांच्या लिखाणावरून व अजिंठा आणि बाग येथील चित्रलेण्यावरून जाणवते. आता स्त्रियांच्या अंगावर काठापदराच्या साड्या व अत्याधुनिक प्रकारची वस्त्रे आढळतात. सैनिकांनाही आता गणवेशामध्ये दाखविण्यात आले आहे. नंतरच्या शतकातही असाच पोषाख असावा असे मार्को-पोलो, इब्न-बतूता आदींच्या लिखाणावरुन वाटते.
मध्ययुगीन इस्लामी आक्रमणानी भारतीयांच्या वेशभूषेत कमालीचा बदल घडवून आणल्याचे स्पष्ट होते; कारण पोषाख विषयक त्यांच्या कल्पना भिन्न होत्या. तसेच त्यांच्या सौंदर्य-विषयक संकल्पानाही पूर्णपणे वेगळ्या होत्या. त्यांना अतिशय तलम, जरतारी व शिवलेल्या वस्त्रांची विशेष आवड हाती.. शिवाय ते राज्यकर्ते असल्याने त्यांचा कल नटण्या-मुरडण्याकडे अधिक होता. समाजात त्यांच्या आवडी-निवडी त्वरित रुजल्या गेल्या. त्यांच्याच रंगसंगतीला प्राधान्य मिळाले. ते प्रामुख्याने मध्याआशियातून स्थलांतरित झाले असल्याने त्यांनी आपल्या समवेत आपल्या देशाच्या पद्धतीही आणल्या होत्या. दक्षिणेतील इस्लामच्या आगमनाने कपड्यांच्या शिलाई व भरतकामास वेगळीच गती प्राप्त झाली. या प्रकारच्या वस्त्रामध्ये जामा, कोट, जॅकेट, स्कर्ट, पेटीकोट आदींचा समावेश होता.
याच कालखंडात हिंदू-मुस्लिम संस्कृतीमध्ये सुसंवाद निर्माण होऊन कांही नवे वस्त्र प्रकार रूढ झाले. तसेच या परिसरातील नागरीकरण प्रक्रियेस गती प्राप्त होऊन अनेक नवे केन्द्रे उदयास आली. यामध्ये गुलशनाबाद (नाशिक), दौलताबाद (देवगिरी),औरंगाबाद (खडकी), मोमीनाबाद (अंबाजोगाई), येवला, जालनापूर, शहागड, बाळापूर, पुणे, वाई, सातारा आदि प्रमुख होत.
मोगल सत्तेनंतर या परिसरात मराठ्यांचे राज्य निर्माण झाले (इ.स. १६३० ते १८२०) मराठ्यांना पारंपारिक हिंदू पोषाखाची विशेष आवड होती. तथापि त्यांनाही प्रस्थापित लोकप्रिय इस्लामी वस्त्र प्रकारांचा स्वीकार करावा लागला. या पार्श्वभूमीवर आपण या कालखंडातील वस्त्रप्रकारांचा मागोवा घेऊ या.
वाढत्या लोकसंख्येची गरज म्हणून या नवोदित नागरी केन्द्रातूनही वस्त्रोद्योगास आरंभ झाला. आणि थोड्याच कालावधीत येथील वस्त प्रकारांना राष्ट्रीय मान्यता लाभली. उदा. देवगिरी (आता दौलताबाद) तलम वस्त्रासाठी प्रसिद्ध होत. महंमद तुघलकास या तलम वस्त्रांनी व येथील कलाकारांनी मोहित केले म्हणून त्याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी येथे स्थलांतरित केली. देवगिरीचे दौलताबाद करण्यात आले (इ.स. १३२२ ) या स्थलांतरामुळे येथील लोकसंख्या वाढली म्हणून वस्त्रनिर्मितीस प्राधान्य देण्यात आले. आणि कलाकारांस विशेष सवलती देण्यात आल्या. त्यामुळेच या परिसरातील पैठण, बीड, कंधार, नांदेड, लातूर आदि केन्द्रे पुढे येण्यास मदत झाली.
अमीर खुश्रू या समकालीन कवीने तलम वस्त्रांचे वर्णन अतिशय मार्मिक शब्दात केले आहे. त्याच्या सांगायचे झाल्यास `चंद्राची मुलायम त्वचा म्हणजेच तलम वस्त्र होय'. शंभर यार्ड मलमल सुईच्या नेढ्यातून सहज पार जात होती. या परिसरातील रेशीमही तेवढेच लोकप्रिय व आकर्षक होते. अल्लाउद्दीन खिलजीच्या लुतीमध्ये रेशमी वस्त्रांचे हजारो प्रकार होते.
देवगिरीप्रमाणेच इतर नएक केन्द्रामधून वस्त्र निर्मिती होत होती. या प्रत्येक केन्द्रात निर्माण अ होणाऱ्या वस्त्रांचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्या वस्त्रांस त्या केन्द्राच्या नांवाने ओळखळे जात होते. उदा. पैठणची पैठणी, शहागडची शहागडी, धनवडची धवडी. जैनाबादची जैनाबादी, कालिकातचे कॅलिको आणि मसोलची मस्लिन वगैरे.
महाराष्ट्रातील वस्त्रोत्पादन करणाऱ्या महत्वाच्या पेठा व त्यांचे वस्त्र प्रकार पुढे दिले आहेत.
औरंगाबाद हिमरू-मशरू
दौलताबाद मलमल
बाळापूर चंद्रकळा साडी
संगमनेर चंद्रकळा साडी
पैठण असावली किंवा पैठणी, पीताम्बर, किमखाब धोतरे
येवला पैठणी, जामदानी, पीताम्बर
तेर मलमल
शहागड शहागडी (साडी), धोतरे
नाशिक जरीकाठी साडी
नागपूर रेशमीकाठी धोतरजोडी
अमरावती पासोडी, साडी
सोलापूर खण, साडी, सुती कापड
तुळजापूर खण, साडी, सुती कापड
कोल्हापूर कह्ण, सुती कापड
अहमदनगर सर्व प्रकारचे कापड
पुणे जरतारी साडी व इतर कापडा
धारवाड खण
पंढरपूर घोंगडी, पासोडी, पीताम्बर
अकोला पासोडी, शाल, साडी
बीड पासोडी, साडी
उपरोक्ल्त केन्द्राशिवाय कल्याण, रत्नागिरी,मालेगाव, जालना, सातारा,अ दामोळ, चांदवड, राजापूर ,वाई इत्यादि बाजार पेठातूनही सुती व रेशमी वस्त्रे तयार होत होती. या कालातील कांही महत्त्वाच्या व लोकप्रिय वस्त्रांचा आपण विचार करू या.
पैठणी :- पैठणी साडी हा मध्यमयुगीन महाराष्ट्रातील लोकप्रिय साडी प्रकार होय. गर्भरेशमी वस्त्रावर सोन्या-चांदीच्या जरीची मीनाकारी केलेल्या काठा-पदराच्या साडी प्रकारास पैठणी म्हटले जाते. रेशमा प्रमाणेच सुतावरही जरतारी काम करण्याचा प्रघात होता. तथापि रेशमाचा मलायमपणा अशा प्रकारच्या सुती साडिमध्ये येत नव्हता. तसेच सुत आणि जर यांच्यामध्ये रेशमाइतका सुसंवाद निर्माण होत नव्हता.
पैठणीची वीण अत्यंत साधी असून हात किंवा पाय चाळ्यातील नक्षीकाम हे पैठणीचे खास वैशिष्ट्य होय. हे नक्षीकाम झाला किंवा जेकार्ड सारख्या आधुनिक यंत्रप्रकारांची मदत न घेता केले जाते हे विशेष होय. केवळ ताणा-बाणा धांग्याच्या सहाय्याने नक्षीकाम करण्याचे तैत्र विकसित करण्यात आले होते. ताणा म्हणजे आडवे धागे [weft].पैठणी वरीलनक्षीकाम उभ्या धाग्याच्या अनेकरंगी लडी वापरून [Extra weft technique] करण्यात येते. नक्षी सामान्यतः पदर व काठावर काढली जाते. नक्षीवरून रांगावरून व जरतारी कामासाठी वापरलेल्या सोन्याच्या वजनावरून पैठणीला निरनिराळी नांवे मिळाल्याने स्पष्ट होते.
उत्तर पेशवाईमध्ये पैठणीस कमालीची लोकप्रियता लाभली होती. मराठा काळातील पैठणीवर `असावली' च्या फुलांचे सुंद्र नक्षीकाम केलेले आढळते. म्हणून त्य साडिला असावली साडी नांवही प्रापत झाले होते. महाराष्टातील हे सर्वात किमती वस्त्र असून त्याची किंमत वापरण्यात आलेल्या सोन्याच्या वजनावरून ठरत असे
भरजरी नक्षीचा पदर व उठावदार काठ ही पैठणीची खास वैशिष्टये मानावी लागतील. या पदरावर सामान्यतः असावली, अक्रोटी, गझवेल, बांगडीमोर, शिकार-खाना, अजिंठा-कमळ, ह्‌भा परिदा अशा प्रकारची नक्षी काढली जात असे. कांही पैठण्यावर जरतारी बुट्टी विणल्याचे आढळते. अशा साडीला बुट्टीदार पैठणी किंवा शालू म्हणत असत. गडद रंगाच्या पैठणीला शालू म्हटले जात असे. गडद हिरव्या रंगाचा व भरजारी काठा पदराचा शालू या काळात अतिशय लोकप्रिय असल्याचे आढळते. अशा प्रकारच्या शालूची लोकप्रियता स्त्रीजगतामध्ये शिंगेस पोहोचल्याचे दिसते. स्त्रियांचे या शालू विषयीचे आकर्षण हा काव्यसृष्टीतील महत्त्वाचा विषय होता. हिरव्या शालूचे धार्मिक सभारंभात अतिशय महत्त्व होते.
पेशवे दप्तरातील अनेक पत्रांवरून पेशव्याना पैठणच्या पैठणीचे व अन्य वस्त्रांचे खास आकर्षण असल्याचे स्पष्ट होते. ७-१२-१७६८ च्या एका पत्राद्वारे श्रीमंत माधवराव पेशवे यांनी असावली दुप्पट्टे, तसेच तांबड्या, हिरव्या, केशरी व डाळिबी रंगाची वस्त्रे मागविल्याचे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे ४-१२-१७६६ पत्राद्वआरे माधवरावांनी आपणास धोतराच्या काठावर ज्या प्रकारची नक्षी हवी आहे ती नक्षी स्वहस्ते काढून पाठविली आहे.
नंतरच्या काळात हैद्राबादच्या निजामानेही पैठणी साडीच्या खरेदीसाठि अनेक वेळा भेटी दिल्या होत्या. निलोफर या निजामाच्या सुनबाईने पैठणला भेट देऊन पैठणीमध्ये कांही सुधारणा सुचविल्या होत्या.
कालीघात पैठणी ही लग्नसभारंभात आवश्यक बाब बनली. राजापासून ते सर्वसामान्यापर्यंत सारे जण लग्न सभारंभात पैठणीसाठी हट्ट धरत असत. त्यामुळे पैठणीची मागणी वाढली. या वाढत्या मागणीचा पुरवठा करण्याच्या हेतूने अनेक केन्द्रावर पैठणी विणली जाऊ लागली. अशा केन्द्रापैकी येवले हे केन्द्र बरेच नांवारूपास आले. कोयरी पदर हे येवल्याच्या पैठणीचे वैशिष्टय होय. येवल्याशिवाय, पुणे, नाशिक, मालेगाव येथील पैठण्याही प्रसिद्ध होत्या. महाराष्ट्र संस्कृतीचे भिन्न धागे एकत्र करण्यात पैठणीचा सहभाग मोठा आहे.
जामदानी : भारतीय कलाकारांची अत्यंत वैशिष्टयपूर्ण कलाकृती म्हणजे जामदानी होय. तसेच पाहता जामदानीची वीण अत्यंत साधी व सोपी असते. तथापि ताण्यावर (warp) नक्षी जोडण्याचे काम अत्यंत कौशल्याचे व दीर्घ मुदतीचे असते. यासाठी निष्ठा आणि चिकाटी या दोन गुणांची आवश्यकता असते. औरंगजेबास जामदानीचे खास आकर्षण होते म्हणून या वस्त्र प्रकारास नंतर औरंगजेबी म्हणून ओळखण्यात येऊ लागले. केवळ शासनमान्य कलाकारच जामदानीचे विणकाम करू शकत असत.
हिमरू : हा मुस्लिम जगातातील लोकप्रिय वस्त्र प्रकार होय. ही भरजरी किमखाब या वस्त्राची प्रतिकृती होय. याचे मूळ नांव हमरू असून. हमरू म्हणजे प्रतिकृती. दक्षिणेमध्ये महंमद तुघलकाने सर्वप्रथम हे वस्त्र प्रचारात आणले. यामध्ये रेशीम व सूत यांचे मिश्रण परस्परात मिसळलेले असते. यापासून सर्व प्रकारची वस्त्रे बनविली जात होती. या प्रकारात रेशमाचे प्रमाण अधिक असल्याने ते मुलायम व किमती होते. म्हणून ते सर्वसामान्याना परवडणारे नव्हते. दौलताबाद, औरंगाबाद, पैठण, जालना येथे पूर्वी याची निर्मिती होत होती. आता हिमरू केवळ औरंगाबाद येथेच तयार होते.
मशरू : ही हिमरूची सर्वमान्य प्रतिकृती होय. यामध्ये सुताचे प्रमाण अधिक असल्याने ते सर्वाना परवडणारे होते. शुद्ध रेशमी वस्त्र परिधान करून प्रार्थना करण्यास प्रेषितांनी प्रतिबंध घातल्याने मशरू या वस्त्राची निर्मिती करण्यात आली. केवळ प्रार्थनेसाठी म्हणून हे वस्त्र मोठ्या प्रमाणात वापरले जात होते.
किमखाब : सोन्याच्या जरीची भरपूर मीनाकारी असलेले दक्षिणेतील एके काळचे लोकप्रिय सोनेरी वस्त्र होय. हे अतिशय किंमती राजेशाही वस्त्र असून त्याच्या निर्मितीस कठोर परिश्रम व बराच कालवधी लागत असे. एका पर्शियन राजदूतास हे वस्त्र प्राप्त करण्यासाठी पाच वर्षे थांबावे लागले होते. कारण या वस्त्राचे वीणकाम पैठणच्या हातमागावर चालू होते.
फेटा : डोक्याला गुंडाळण्याचे पुरुषांचे वस्त्र म्हणजे फेटा. फेट्याचे विविध प्रकार असून त्याला पगडी असेही म्हटले जात होते. बुट्टीदार पगडी हा पगडीचा लोकप्रिय प्रकार असून हिंदू आणि मुस्लिम याचा वापर करीत असत. जोरदार पगडी. खिडकीदार पगडी, नस्तालिक हे पगडीचे कांही लोकप्रिय प्रकार होत.
मंदिल : हा मलमली कापडाचा फेटा असून त्यामध्ये सोनेरी जर वापरला जात असे.
शंमला : हा फेट्याचा एक वेगळा प्रकार होय. बत्ती, सरबत्ती, सरबंद हे शिरोवस्त्राचेच भिन्न प्रकार होत. सर म्हणजे शिर व बंद म्हणजे बांधणे किंवा गुंडाळणे. तिवटे किंवा तिवट हा व्यापारी वर्गातील लोकप्रिय पगडी प्रकार होय.
रूमाल : हाही फेट्याचाच एक चौरस प्रकार होय. डोक्याला गुंडाळण्यासाठी याचा वापर केला जात होता.
दुपट्टा : खांद्यावर घेण्याच्या पट्टीस दुपट्टा असे म्हणतात. याच्या काठावर जरीकाम केलेले असते.
शेला : अंगावर घेण्याची एक किमती वस्त्र.
मेहमुदी : एक प्रकारचे सुती सफाईदार वस्त्र.
साडी : स्त्रियांच्या पोषाखातील प्रमुख घटक.
चंद्रकळा : एकरंगी रेशमी किंवा सुती साडी. काळी चंद्रकाळ सर्वात प्रसिद्ध होती.
खण : चोळीसाठी तयार केलेला खास वस्त्र प्रकार.
पीतांबर : पुरुषासाठी धार्मिक सोहळ्याच्या प्रसंगी परिधान करायचे रेशमी व जरतारी काठाचे महावस्त्र. याचे काट तुलनात्मक दृष्ट्या छोटे असून याला पदर नसतो. यालाच सोवळे, मुकटा म्हटले जात असे. येवले पीतांबरासाठी प्रसिद्ध होते.
कुर्ता किंवा कुडता : सैल झग्यासारख्या वस्त्र प्रकार. खमीज मुस्लिम वस्त्र प्रकार.
अंगरखा: जाम्याखाली वापरण्याचा वस्त्र प्रकार. मिना किंवा अंगी हे कुडत्यायेच भिन्न प्रकार होत.
मिरजी : डगला, कुफचा, कुबा हे अंगरख्याचे आणखी प्रकार होत.
जामा : मुस्लिम वस्त्र प्रकार.
पेशदार : रंगीत मलमलीपासून तयार करण्यात आलेले मुस्लिम परिवस्त्र.
लहंगा, कंचुकी: ही स्त्रियांची अर्न्तवस्त्रे होत.
या परिसरातील वस्त्रोद्योगास मुस्लिमानी पाठिंबा दिला. याशिवाय त्यांनी कांही लोकप्रिय वस्त्रप्रकारही रूद केले. महमुदी, जाफरखानी, औरंगजेबी, नाफरमानी इ. मुस्लिम बनली असल्याचे पेशवे दप्तरावरून स्पष्ट होते.
रंगकाम : भारतीयांना झळाळणाऱ्या रंगांचे खास आकर्षण आहे. त्यांची रंगांची आवड ही सामान्यतः परिसरावर अवलंबून आहे. कपड्यासाठी वनस्पतिज रंग वापरले जात होते. उदा. गोदावरी काठ आढळणाऱ्या लाखेपासून तांबडा रंग तयार केला जात असे. बाभळीच्या साली पासूनही रंग तयार होत होते. काळा, हिरवा, निळा हे रंग वरील रंगांत नीळ मिसळून करीत असत. सर्वसामान्यपणे पिवळा, जांभळा, नारिंगी, हिरवा, गुलाबी, विटकरी, काळा आणि तपकिरी हे रंग अधिक प्रमाणात वापरात होते.
भरतकाम : वस्त्रांना खुलविण्यासाठी, सुशोभित करण्यासाठी वस्त्रांवर भरतकाम केले जात असे. भरतकाम सुती व रेशमी अशा दोन्ही प्रकारच्या वस्त्रांवर केले जाई. अगदि प्राचीनकालापासून भरतकाम करण्याची कला भारतीयांनी आत्मसात्‌ केली होती. प्राचीन साहित्यामधून भरतकामाचे अनेक संदर्भ मिळतात. पैठणी आणि जामदानी वस्त्रें त्यांच्या जरातारी मीनाकारीसाठी प्रसिद्ध होती. युरोपीय देशामध्ये अशा प्रकारच्या वस्त्रांना फार मोठ्या प्रमाणात मागणी होती. तथापि १७०७ मध्ये ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदा करून भारतीय कापडाची आयात पूर्णतया बंद केली. त्यामुळे भारताच व्यापार बसला. आणि व्यापार बसल्याने भारताची सुबत्ता नष्ट झाली.
आता ही प्रारंपारिक कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता विज्ञानाने व तंत्रज्ञानाने वीणकाम, रंगकाम, भरतकाम, जरीकाम आदि अद्ययावत केले आहे. तथापि मानवाच्या अविरत श्रमातून साकार झालेल्या कलेची बरोबरी यंत्र करू शकणार नाही.

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer