Maharashtra | महाराष्ट्र
MarathiMati.com - Android App on Google Play Store

संगीत

अशोक रानडे

महाराष्ट्र(Maharashtra State,India)

महाराष्ट्र म्हणजे मध्यराष्ट्र, देशाच्या मध्यभागी असेलला हा प्रदेश. भारताच्या उत्तर व दक्षिण भागातील सांस्कृतीक चेतनांचा इथे नेहमीच संगम घडत आलेला आहे. अनेक दिशांना येणारे प्रवाह महाराष्ट्राच्या धार्मिक व सामाजिक घडणीशी एकरूप होत गेले व साहित्य, दृश्य कला आणि प्रयोगित कला यातून अविष्कृत होत राहिले. यापैकी संगीताची परंपरा, मग ते वन्य जमातींचे असो, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत वा लोकप्रिय असो- आपला समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा व्यक्त करते.

वन्य जमातींचे संगीत

या संज्ञेत भारताच्या दाट वनांच्या पर्वतीय क्षेत्रात नित्य राहणाऱ्या भिल्ल, महादेव कोळी, गोंडा, वारली, कोकणा, कातकरी, ठाकूर, गावीत, कोलाम, आंध, मल्हार आणि पारधी या लोकांच्या संगीताचा समावेश होतो.
आदिम संगीताचे महत्त्वाचे वैशिष्टय हे की ते नृत्यबद्ध हालचालींशी जुळलेले असते. म्हणून बहुतेक संगीताच्या प्रसंगांना `नाच' असे संबोधिण्यात येते यात नवल नाही. जसे, वारल्यांचे तारापी नाच आणि घोर नाच आणि आगऱ्यांचे गणेश नाच नि होळी नाच. शिवाय या लोकांचे सांगीतिक आविष्कार त्यांच्या व्यापक सामूहिकतेने लक्षणीय ठरतात. त्यामुळे पदन्यास, हालचाली आणि शब्दोच्चार यांचा अचूक एकमेळ जमणे आवश्यक असते. ही सामूहिकता हेच सांगीतिक आविष्कारातील संमोहित करणाऱ्या पुनरावृत्तीचे कारण असते. अशा संगीतासाठी प्रभावी नाद निर्माण करणाऱ्या वाद्यांची योजना आवश्यक ठरते. तीव्र स्वर आणि खणखणीतपणा यांचे अधिराज्य असते. त्यासाठी लहान बासऱ्या, ढोल, जोरकसपणे फुंकून वाजविली जाणारी (सुषिर) वाद्ये उपयोगात आणली जातात. एकसुरी आघातने किंवा घासून निर्माण होणारे ध्वनी निवडले जातात. आदिम वाद्ये बहुधा सहजी उपलब्ध होणाऱ्या आणि कमी खर्चाच्या वस्तूंपासून - उदा. बांबू, जनावरांची कातडी, भोपळे, मातीची भांडी, पाने- इ. वस्तूंपासून तयार केली जातात. या वस्तूंपासून घडवलेली वाद्ये म्हणजे फाकवलेल्या, खुळखुळणाऱ्या बांबूच्या काड्या, तारपे, (एक आदिम सुषिर वाद्य, ज्यात नादांच्या प्रतिध्वनीसाठी दोन भोपळे जोडलेले असतात), डेरा (चामड्यावर घासून नाद निर्माण करणारे वाद्ये), थाळ (धातूच्या थाळीवर लांबट दांडा घासून एकसूरी नाद निर्माण करणारे वाद्य), घुंगरू (तालाकरता वापरात असलेले लोकवाद्य). ही वैशिष्टयपूर्ण वाद्ये विलक्षण कुशलेने वाजविली जातात. आदिम संस्कृतीतील वाद्यांचे महत्त्व वन्य जमातीतील पुराव्यावरून आणि नांवावरून ध्यानात येते. उदाहरणार्थ, आगरींना ढोल आगरी म्हणतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते रावणाच्या दरबारातील ढोल वदक होते.
आदिम संगीतरचना धार्मिकतेने आणि उत्कट धर्मविधींनी ओथंबलेल्या असतात. जन्म, नामकरणविधी, विवाह, मृत्यू अशा व्यक्तीच्या जीवनचक्रातील महत्त्वाच्या घटना संगीताशी निगडित असतात. संगीत आणि नृत्य यातून अनेकदा पावसाच्या आगमनाचा आनंद किंवा सुगीचा उल्हासही व्यक्त होतो.

लोकसंगीत

संस्कृतीतील काही असांगीतिक घटकही लोकाविष्काराच्या वैभवाची साक्ष पटवितात. महाराष्ट्रात प्रमुख देवदेवतांव्यतिरिक्त पंथीय व स्थानिकदैवतेही पुष्कळ आहेत. देवतासमुच्चय विस्तृत झाल्यामुळे संगीत आणि नृत्य यांचा समावेश असलेल्या धर्मविधींमध्येही साहजिकपणेच भर पडत जाते. या विधींचा जातिव्यवस्थेशी संबंध असतोच असे नाही. राज्याच्या विविध भागात दरवर्षी भरणाऱ्या हजारो यात्रांमधेही सांगीतिक प्रसंगांना भरपूर अवसर मिळतो. शिवाय, महाराष्ट्रात सत्तराहून अधिक महत्त्वाची पवित्र क्षेत्रे आहेत. या क्षेत्रातील देवळाशी कायमचे जोडलेले रंजनकार लोकपरंपरा दृढ करण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात. लोकसंगीताचा फार मोठा भाग स्त्रीगीतांनी व्यापलेला आहे हेही उल्लेखनीय आहे.

लोकसंगीत म्हटले म्हणजे सर्वसामान्यपणे सहज समजल्या जाऊ शकणाऱ्या गीतांचे वैपुल्य. विवध कारणांसाठी लोकसंगीत हे एकत्रितपणे सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप घेते. अशा कार्यक्रमात सांधिक गायन, समूह नृत्य वा अभिनय यांच्यावर कमीअधिक प्रमाणात भर दिला जातो. परिणामतः लोकसंगीताची नेटकी वर्गवारी करणे शक्य होत नाही. महाराष्ट्रातील लोकसंगीताचे साठाहून अधिक प्रकार या वेगळ्या दृष्टीकोनातून तपासले पाहिजेत. या गीतप्रकारांचे सांगीतिक मूल्य योग्य रीतीने समजावून घ्यावयाचे झाल्यास त्यांची एकाच वेळी तीन आलेखांवर योग्य ठिकाणी स्थापना करून पाहिली पाहिजे.

हे तीन आलेख पुढीलप्रमाणे :

(१) ध्वनी-परिणाम -
(Sound-effect)-पासून गीतापर्यंत;

(२) हालचालीपासून नृत्यापर्यंत; आणि

(३) सामान्य वागण्यादिसण्यापासून नाट्य आविष्कारापर्यंत.

नंदीवाला

या कलाप्रकारात ध्वनी-परिणामांचा उपयोग संगीतासारखा केलेला असतो. महाराष्ट्रातील नंदीवाला हा एक खास. वैशिष्टयपूर्ण मनोरंजन करणारा कलाकार आहे. त्याला नेमून दिलेल्या गावोगावी फिरून तो शिकवून तयार केलेल्या प्राण्यांचे खेळ दाखवतो. जोडीला भविष्य सांगतो. गुबगुबी (ज्यात चामड्याच्या दोन गोलाकार तबकड्यांवर घासल्याने नाद निर्माण होतो, असे वाद्य), घड्याळ-टिपरु (गुबगुबीवर ठोका वाजवण्यासाठी असलेला लाकडी हातोडा), आणि चिमुकल्या घंटा ही वाद्ये तो साथीला घेतो. तालयुक्त वादन , त्या लयांशी जुळणारे शब्दोच्चार , तसेच मोठ्याने आघात करून वा घासून निर्माण होणारा नाद- या सर्व गोष्टींमध्ये सांगीतिक तत्त्वांचा पुरेपूर उपयोग केलेला असतो. खेळ दाखवून झाल्यावर नंदीवाला बक्षिसी मागतो.

बहुरूपी

या कलाकारात नाट्याभिमुख गीतांचा अंतर्भाव असतो. बहुरूपी या संज्ञेचा शब्दशः अर्थ `अनेक वेष बदलणारा' असा आहे. प्रत्यक्षात बहुरूपी हा रंजन करणारा व्यावसायिक कलाकार आहे. वेगवेगळ्या वेषांमध्ये येऊन तो रिझवतो व भिक्षा मागतो. बहुरूपी हे बहिरोबा, खंडोबा, जारवाई, जनाई इत्यादी पंथीय दैवतांना वाहिलेले असतात. `सखुबाई, बकुबाई, लग्नाला चला.. तुम्ही लग्नाला चला,' अशा प्रकारची विवाह निमंत्रणांची विनोदी गाणी गाणारे म्हणून सर्वपरिचित आहेत, स्त्रियांची, गरोदर स्त्रियांचे तरुण मातांची सोंगे ते उभे करतात. यमक-अनुप्रासांनी सजलेली पद्यरचना आकर्षक, जलद गतीने ते सादर करतात. साथीला कोणतेही वाद्य नसते.

धनगरी ओव्या

या प्रकारातील गीतांमध्ये हालचालींना प्राधान्य असते. हा गीत प्रकार नगरांशी संबंधित आहे. व्युत्पतिशास्त्रानुसार `दन' म्हणजे गुरेढोरे- या कानडी शब्दांपासून `धनगर' हा शब्द आलेला आहे. ही गीते शंकराचा अवतार जो `बीरुबा' याच्याभोवती गुंफलेली असतात. याविषयीची दंतकथा अशी आहे की फार पूर्वी एकदाएका वारुळातून मेढ्यांचे कळप बाहेर आले व ते शेतातील उभ्या पिकांचा फडशा पाडू लागले. दाद मागण्यासाठी लोकांनी शंकराकडे धाव घेतली तेव्हा त्याने धनगर निर्माण केले.

धनगर रंगीबेरंगी पोशाख करून एकत्र जमतात. एक भला मोठा ढोल वाजवणाऱ्याभोवती फेर धरून नाचू लागतात. जोषपूर्ण हालचाली असलेल्या या नाचाला `गजनृत्य' (खुल्या मैदानात धनगरांनी केलेले सामूहिक नृत्य) म्हटले जाते. `ओव्या' गीते बहुधा अहिराणी या बोलीभाषेत रचलेली असतात. त्यातून बीरुबाची कथा सांगितलेली असते. त्याची स्तुती केलेली असते. बहुधा काही लौकिक विषयांनाही त्यात स्पर्श केलेला असतो. भरीव, जोषयुक्त लय कडव्यांच्या शेवटी आघात देण्याची पद्धत आणि आवाजाची भक्कम फेक ही या खुल्या मैदानातील गायनाची खास वैशिष्टये. `ओवी' हा ( लोकसंगीतात उत्स्फूर्त रचनेसाठी वापरला जाणारा) छंद वापरल्याने रचनेतील लवचीकता व मार्दव निर्माण होते.

वासुदेव गीत

वासुदेव गीत हा कलाप्रकार नृत्याभिमुख सांघिक आविष्काराकडून गानाभिमुख एकल (सोलो) आविष्काराकडे झुकत असलेला दिसतो. वासुदेव हा कलाकार मस्तकावर मोरपिसांचा मुकुट घालून. मुरली वाजवीत हुबेहूब कृष्णाचा अवतार धारण करतो. पायात घुंगरू बांधून, हातात मंजिरीची जोडी घेऊन गात गात, स्वतःभोवती गिरक्या घेत वासुदेव चपळपणे नाजूक हलके नृत्याचे पदन्यासही करीत असतो. पहाटेच्या प्रहरी अंगणात भिक्षेसाठी येणारा हा वासुदेव फिरस्त्या भक्तांपैकी एक आहे.

वाघ्या मुरळी

`गोंधळ' या गीताचाच हा एक उपप्रकार. मात्र या प्रकारात अंतर्भूत असलेल्या `स्त्री' या घटकामुळे गोंधळामध्ये नसलेली सुस्पष्ट अशी सौंदर्याभिमुखता त्यात येते व त्यामुळे एक गुणात्मक फरकही निर्माण होतो. वाघ्या हा पुरुष व मुरळी ही स्त्री हे खंडोबाचे भक्त असतात. (खंडोबाला ते वाहिलेले असतात).

या प्रकारात प्रस्तुतीसाठी किमान एक वाघ्या आणि एक मुरळी आवश्यक असतेच. मुरळी ही मुख्य नर्तिका असते. तर सुरत्या-वाघ्या ही व्यक्ती तिला जी साथ करते त्याला `जागरण' असे म्हणतात. मुरळीचे सुंदर, चपळ नृत्य, तिचा आकर्षक, नेटका पोषाख, व तिच्या हालचालीत भारून टाकणारी पण संस्कारित (sophisticated) या साऱ्यामुळे या प्रयोगाला एक आगळाच उठाव मिळतो. तुणतुणे, खंजिरी, घुंगरु याबरोबरच मुरळीच्या साडीच्या पदराला बांधलेली छोटी घंटा- `घोळ'- जी मुरळी वाजवीत असते- ही सर्व साथ वाद्ये `जागरणा'त वापरलेली असतात. `हाबा हाबा' यासारख्या निरर्थक वर्णांचा नादपूर्ण वापर, मधूनमधून स्वर सोडून म्हटले जाणारे तुकडे आणि काही नेमक्या व सहजी ओळखता येतील अशा रागांच्या चौकटीत बसविलेली गीते या साऱ्या गोष्टीमुळे, एरवी `लोकसंगीत' म्हणून संबोधिल्या जाणाऱ्या गीतप्रकारांहून हा कलाप्रकार कितीतरी उच्च दर्जाची कलात्मकता व्यक्त करण्याची ईर्षा प्रकट करतो.

वर सुचविलेल्याप्रमाणे, लोकसंगीताच्या प्रकारांची यादी करण्यासाठी क्रीडागीते, श्रमगीते, विधीगीते अंगाई व स्त्रियांच्या इतर दैनदिन उद्योगांशी निगडित असणारी गीते अशा गीतप्रकारांच्या वर्गवारीचे सखोल विश्लेषण करण्याची गरज आहे.

आज सुमारे साठएक गीतप्रकार सापडतात. प्रत्यक्षात मात्र तो महाराष्ट्राच्या लोकसंगीताच्या संपत्तीचा एक लहानसा अंश आहे.

भक्तिसंगीत

भक्तिसंगीत हे एक महत्त्वाची व चारशेहून अधिक वर्षे अखंड चालत आलेली परंपरा आहे. समाजाच्या सर्व थरांवर भक्तिसंगीताची पकड आहे. लोकसंगीत आणि कलासंगीत या दोहोंनाही एकजीव करून टाकण्याच्या असामान्य कामगिरीमुळे तर भक्तिसंगीत विशेषच लक्षवेधक ठरते. एक पंथ वा चळवळ म्हणून भक्तिमार्गाने चौथ्या शतकापासूनच भारतावर अधिराज्य गाजविले व संगीत हे त्याचे अविभाज्य अंग बनले. भक्तिमार्गामुळे संपूर्ण भारतातच संतांचा एक विशिष्ट वर्ग उदयाला आला. हे संत भक्त, कवी, गायक तसेच गुरूही असत. त्यामुळे संगीताचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला व वैविध्यपूर्ण संगीताची निर्मिती झाली. ह्या प्रकाराचे अनेक वैशिष्टये आहेत.

पहिले महत्त्वाचे वैशिष्टय हे की भक्तिसंगीताने उच्चारणाच्या तीन पद्धती शोधून काढल्या :

१) नामसंकीर्तन

२) पठण व

३) गायन

भक्तिसंगीताने एकल वा सामूहिक गायनपद्धतीचा ही अवलंब केला. दुसरे असे की त्याने वाद्यांचीही अत्यंत सूज्ञपणाने निवड केली. परंपरेनुसार वीणा, एकतारी ही स्वरांची साथ देणारी वाद्ये, तर तालासाठी मृदंग, खंजिरी, मंजिरी, टाळ आणि चिपळ्या यांचा वापर केला गेला. या संगीतप्रकारात वापरली जाणारी वाद्ये, एक मृदंगाचा अपवाद सोडल्यास, वाजवण्याला सोपी, आणि सांभाळण्याच्या दृष्टीने सुलभ असतात. लयीसाठी चार किंवा आथ आवर्तने असणारे ताल बहुधा वापरले जातात व त्यांच्यासाठी काही विशेष कौशल्याची व गुणवत्तेची गरज नसते.

भक्तिसंगीताचे विविध गायनप्रकार आहेत. उदा. भजन, कीर्तन, संकीर्तन, गायन इ. या प्रकारांमागे दीर्घ इतिहास आहे व बाराव्या शतकापर्यंत त्याचा मागोवा घेता येतो. धवळे, अभंग, गौळण, पद, भारूड, स्तोत्र, आरती, करुणाष्टक, श्लोक, ओवी, फटका, कटाव, विराणी असे आणखी काही प्रकार या गायन परंपरेशी जुळलेले आहेत. अनेक शकांच्या कालप्रवाहात भक्तिसंगीताच्या बऱ्याच रचना लोप पावल्या असल्या तरी अद्यापही बऱ्याच मोठ्या संख्येने त्यातील काही प्रचलितही आहेत. कारण की वारकरी , समर्थ, दत यासारख्या संप्रदायांनी आपल्या अनुयायांना दैनदिन धार्मिक विधींमध्ये या रचनांचा उपयोग करण्याचे बंधन घातलेले आहे. नामसंकीर्तन आणि पठण हा त्यांच्या दैनिक नेमधर्माचा महत्त्वाचा भाग असतो.

भक्तिसंगीताची अखंड परंपरा उत्क्रांत होत जाणाऱ्या नव्या धार्मिक चळवळींमुळे चिरस्थायी व समृद्ध होत गेली आहे.

महाराष्ट्रातीला कीर्तनप्रकाराल काही वेधक उपपरंपरांच्या शाखा फुटलेल्या आहेत. कीर्तन या प्रकाराने दक्षिणेकडच्या अशाच एका आविष्काराला एक पायाभूत आकारही पुरवलेला आहे. १९८३ नंतर महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झालेल्या मराठी नाट्य संगीतालाही कीर्तनाने भरीव योगदान दिलेले आहे. कीर्तनांच्या सर्व शाखा-उपशांखाची सखोल चर्चा करणे येथे शक्य नसले तरी पुढील आकृतीवरून त्यातील विविध प्रकारांची कल्पना येऊ शकेल.

कीर्तन
नारदीय वारकरी

एकनाथी गाणपत्य रामदासी शाक्त ख्रिस्ती गाडगेमहाराज कैकाडी महाराज
राष्ट्रीय संप्रदाय संप्रदाय

शास्त्रीय वा कला संगीत

व्याख्या व परिभाषा यांच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये न शिरताही शास्त्रीय वा `कला' संगीताचे वर्णन `अभ्यासपूर्ण परंपरेतेल सूत्रबद्ध व्याकरण असलेले संगीत' असे करता येईल. या वर्णानाशी जुळेल अशा प्रकारचे संगीत महराष्ट्रात इ. स. २०० इतक्या जुन्या काळापासुन अस्तित्वात आहे.

गाथासप्तशती या दुसऱ्या शतकातील संग्रहग्रंथात त्या काळच्या सर्व सामान्य जीवनपद्धतीची झलक दिसते. या गाथांचे बारकाईने वाचन केल्यास दिसते की त्याकाळी व्यावसायिक नर्तक नयनरम्य नृत्ये सादर करीत दुंदुभी, नगारा, मृदंग, वीणा तसेच बासरी या वाद्यांचा उपयोगकेला जाई. याप्रमाणे दणदणीत आणि हळुवार, तालबद्ध आणि सुरेल अशी संगीताची रूपे प्रकट होत. या संकल्पात पत्नीच्या गायनाला पतीन संगीत साथकेल्याचा उल्लेख आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर उच्च आणि निम्न असे दोन्ही सांगीतिक आविष्कार त्याकाळी प्रतिष्ठा पावलेले होते.

त्यानंतरच्या शतकातील अनेक चित्रींचे व इतर पुरावे पाहाता असे दिसते की अनेक प्रकारच्या समारंभात - उदा : मिरवणुका, बारसे, धार्मिक उत्सव किंवा दानधर्म यासारख्या प्रसंगी- संगीताचे आयोजन असे. तसेच चौपदीसारखे पद्‌बंध प्रचलित होते हे संत नामदेवांच्या, ग्रंथसाहेब या शिखांच्या धर्मग्रंथात समाविष्ट असलेल्या, काही रचनांना रागदारीतील चाली दिलेल्या आहेत यावरून सिद्ध होत. याचा अर्थच असा की, पुढील कालात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणून मान्यता पावलेले कलासंगीत महाराष्ट्राने कितीतरी आधीच निवडले होते. सोळावा शतकाच्या सुमाराला उत्तर भारतीय पद्धती निश्चितपणे प्रचलित होती हे दासोपंतांच्या (१५५१-६१५) भक्तिपर रचनांना हुसेनी आणि काफी रागातल्या चाली आहेत यावरून स्पष्ट होते. इतकेच नव्हे तर त्यांची मारू आणि गोंड यासारख्या काही रागांना दक्षिणशाला असे म्हटले आहे. त्यावरून ते त्या काळात दक्षिण प्रदेशात प्रचलित होते हेही स्पष्ट होते. महाराष्ट्राप्रमाणेच जवळच्या विजापूर राज्यातही उत्तर भारतीय संगीताकडेच अधिककल असलेला दिसून येतो ही लक्षणीय गोष्ट आहे.

उदाहरणार्थ, इब्राहिम अदिलशहा-द्वितीय -(१५८०-१६२६) आपल्या किबाब-ए-नौरस या ग्रंथात जी शास्त्रीय परिभाषा आणि रागांची नावे वापरतो तिच्यावर स्पष्टपणे पर्शियन प्रभाव आहे. शिवाय , बंदिशी-चिजा, हिंदुस्थानी संगीतातील चिजांप्रमाणेच, ब्रज भाषेतील आहेत. इब्राहिम आदिलशहा हा हिंदुस्थानी प्रवर्तक असण्याचा संभव आहे. विजयनगरच्या पराभूत साम्राज्यातील कलावंतांनी आदिलशाहच्या दरबारात आश्रय घेतला असणेही शक्य आहे. त्यामुळेच हा दाक्षिणात्य शैलीचा अभाव विशेष अर्थपूर्ण ठरतो.
शिवाजीच्या कारकीर्दीत संगीतातील प्रस्थापित वळणे कायम राहिली. त्यांच्या निधनानंतर (१६८०) पुढे जवळजवळ पन्नास वर्षे, संगीताच्या पोषणासाठी पुरेशी साधने उपलब्ध करून देणारे आणि संगीताकडे कल असणारे शिवाजीच्या वंशजांचे पंतप्रधान-पेशवे आणि इतर मराठे पुढारी यांचा काळ येईतो कलांना आणि संगीताला आश्रयदात्यांचे औदासीन्यच सोसावे लागले.अल्प काळ पेशवेपदावर असलेल्या राघोबाने (१७३४-१७८३) तानसेनच्या वंशावळीतील एका गायकाची मैफिल आयोजित करण्यात किती खर्च केला याचा तपशील नोंदवलेला आहे. राघोबाचा पुत्र दुसरा बाजीराव याने चिंतामणी मिश्रा या धृपद गायकाला पदरी ठेवले होते. याप्रमाणे १८९९ साली ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर चढेपर्यंत महाराष्ट्रात धृपद, धमार, ख्याल, टप्पा, यासारखे संगीत प्रकार आणि सारंगी, सतार, पखवाज यासारखी वाद्ये सामावून घेणारी दृढ आणि विस्तृत संगीतपरंपरा विकसित झाली होती. याशिवाय, हिंदुस्थानी संगीतातल्या ठुमरीच्या तोंडवळ्याची बैठकीची लावणी हा प्रकारही याच काळात निर्माण झाला व रुजला.

ब्रिटिशांच्या राजवटीत, महाराष्ट्रात संगीताची नुसती भरभराटच झाली नाही तर विविध प्रकारे त्याला उत्तेजनही मिळाले. ह्या काळात सुशिक्षित मराठी उच्चभ्रू वर्गाने विविध कलांमध्ये रस घेण्यास आणि कलावंतांना सातत्याने आश्रय देण्यासही सुरूवात केली होती. श्री. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे असे प्रोत्साहन मिळणाऱ्यांपैकी एक . त्यांच्या कर्तृत्वकालात त्यांनी मुंबईहून एका संगीतविषयक मासिकाचे संपादन केले होते. या मासिकाला श्री रामकृष्ण भांडारकरांचे आणि आणखीही काही विद्वज्जनांचे साह्य मिळालेले होते. महाराष्ट्रात हिंदुस्थानी संगीताच्या ख्याल गायकीला पीठ मिळवून देण्यावर या मासिकाचा विशेष भर होता. संगीताच्या अभिवृद्धीसाठी करण्यात आलेल्या या संघटनात्मक, पद्धशीर प्रयत्नांमुळे श्रोतृवर्ग वाढला व संगीताची जाणही वाढली. संगीताच्या विकासाला हातभार लावणाऱ्या घटकांमध्ये कलेच्या संस्थीकरणाला विशेष महत्त्व आहे. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे १९०१ साली एक संगीत विद्यालय सुरू केले. त्यानंतर लगेच काही वर्षात उस्ताद अब्दुल करीमखान यांनीही तशाच प्रकारची संस्था मुंबईत स्थापन केली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पारशी समाजाने पाश्चिमात्य संगीताच्या विकासाला गती दिली.

स्टाफ नोटेशन या युरोपीयन स्वरलेखनाच्या पद्धतीशी परिचय झाल्यामुळे विष्णु दिगंबर यांनी १९०० च्या सुमाराला भारतीय स्वरलेखनपद्धती विकसित केली. भातखंडे यांनी इतिहास, समीक्षा व व्याकरण अशा सिद्धान्तिक अभ्यासशास्त्रांची भर घातली. मौखिक परंपरेचे लिखितात रूपांतर करणे आणि ती परपंरा सूत्रबद्ध करणे ही त्यांची मोलाची कामगिरी आहे. सविस्तर संशोधन करून त्यांनी हिंदुस्थानी संगीताच्या व्याकरणाची रचना केली. आणि १९०९ साली संगीत पद्धती या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. याच्या जोडीला सतार, मृदंग आणि हार्मोनियम यांच्या आकर्षक व माहितीपूर्ण पुस्तिकाही निघाल्या. कु. क्लेमेन्ट देवल, जी. बी. आचरेकर, कृष्णराव मुळे इत्यादींनीही संगीताच्या व्याकरणेतिहासात्मक चर्चेत भर घातली. पाश्चिमात्य देशांना भारतीय संगीताची ओळख करून देण्याचा उद्देशाने १९१२ मध्ये वेस्टर्न इंडियन फिलहार्मोनिक सोसायटीचीस्थापना झाली. काही भारतीय संगीतकारांनी युरोपीयन तज्ञांकरवी पाश्चात्य संगीताचे धडे घेतले.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास महाराष्ट्रात विकसित झालेला एक जोमदार व समर्थ सांगितिक प्रकार म्हणजे नाट्यसंगीत, शास्त्रीय आणि रंजक संगीताचे अनोखे मिश्रण असलेला हा प्रकार. या प्रकराचे सामर्थ्य त्याच्या एकरूप होऊन जाण्याच्या व आत्मसात करण्याच्या क्षमतेत आहे. भाऊराव कोल्हटकर, बालगंधर्व, केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ या आणि अशाच कित्येक गायक नटांमुळे एक प्रमुख सांगीतिक प्रवाह म्हणून नाट्यसंगीताचा उत्कर्ष झाला. १९३१ साली बोलपटांचे आगमन झाले, तोपर्यंत नाट्यसंगीत सतत वृद्धिंगत होत राहिले.

काही संस्थानांमध्ये बॅण्ड संगीताला मान्यता प्राप्त झाली. तसेच ऑर्केस्ट्रा वृंदसंगीतही लोकप्रिय झाले. पंडित विष्णु दिगंबर, उस्ताद अब्दुल करीम यांनी आणि इतरांनीही जलशांमध्ये वृंदसंगीताचा उपयोग केला. १९३० पर्यंत हिंदुस्थानी ख्याल गायकीच्या प्रमुख घराण्यांनाही महाराष्ट्रात चांगलेच स्थैर्य लाभले होते.

नवी सांगीतिक वाद्ये

पखवाज आणि तबला यासारख्या पारंपारिक वाद्यांमध्ये व्हायोलिन आणि पायपेटी यांची भर पडली. पुढे भारतीयांनी भात्याची पेटीही प्रयुक्त केली. या दोन्ही प्रकारच्या पेट्या महाराष्ट्रात कमालीच्या लोकप्रिय झाल्या. बॅंजो आणि पियानो यासारखी पाश्चिमात्य वाद्येही वृंदसंगीतात तसेच सिनेसंगीतात वरचेवर उपयोगात आणलि जाऊ लागली. संगीताच्या सर्वच प्रकारांवर कमीजास्त प्रमाणात वेगवेगळ्या घटकांचा प्रभाव पडत होता. त्यापैकी १९२८ नंतर भारतात सहजी उपलब्ध झालेला. ग्रामोफोन आणि नाट्य व चित्रपट संगीताचे ध्वनिमुद्रण हे सांगता येतील. त्याचसुमारास भारतात आकाशवाणी प्रक्षेपन सुरू झाले. आणि संगीताच्या क्षेत्रात नव्या शैली व प्रवाह यांचा परिचय करून देण्यात आकाशवानीने हातभार लावला. पण याहूनही महत्त्वाची कामगिरी वृत्तपत्रांनी बजावली. मराठी आणि इंग्रजी वृतपत्रांनी, एकोणिसाव्या शतकात, वृत्तांत आणि समीक्षा यांच्याद्वारे सुशिक्षित व सुसंस्कृत वर्गाची- कलांच्या नव्या आश्रयदात्यांची- अभिरूची प्रभावित केली.

लोकप्रिय संगीत

लोकप्रिय संगीताच्या अस्तित्वाचा माग घेऊ गेल्यास तो सतराव्या शतकापर्यंत जाऊन पोचतो. राजा शिवाजीच्या काळात पोवाड या गीतप्रकाराला विशेष उत्तेजन मिळाले असावे असे मानण्यास जागा आहे. खुल्या मैदानात, जोषपूर्ण व लयबद्ध रीतीने गायल्या जाणाऱ्या पोवाड्यात थोर पुरूषांची स्तुती आणि त्यांच्या शौर्यगाथांची वर्णने असतात. पुढाऱ्यांच्या सामाजिक कार्याचा गुणगौरवही असतो. बदलत्या काळानुसार पोवाड्यांच्या विषयांची कक्षा विस्तारत गेली आणि दुष्काळ, पेशव्यांचे होलीकोत्सव येथपासून तो गोवा-मुक्ति आंदोलन (१९५५) किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ(१९५६-६२) पर्यंतच्या अनेक विषयांवरील रचनांचा त्यात समावेश होत गेला. गायकांच्या उंच, खणखणीत, खड्या आवाजाच्या साथीला तुणतुणे आणि हलगी ही वाद्ये असत.

१८६० च्या सुमाराला लोकनाट्याचाच एक नवा प्रकार- वग- प्रचारात आला. वग हा एक वर्णनपर, लावणीगायन, नृत्य आणि प्रभावी पण असंस्कारित अभिनय यांनी नटलेला संगीतप्रकार आहे. उमा आणि बाबू सावळजकर हे वग सादर करणारे पहिले यशस्वी कलावंत मानले जातात. पुण्यात सुरू झालेल्या बोलपटांद्वारे महाराष्ट्राने एका झगमगीत युगात प्रवेश केला. पुढे मुंबई हे भारताच्या चित्रपट उद्योगाचे प्रमुख केंद्र बनले. एकाहत्तर रचना असलेल्या इंद्रसभा (१९३१) चित्रपटापासून तो एकही गीत नसलेल्या नौजवान (१९३१) चित्रपटापर्यंत भारतीय सिनेसृष्टीने संगीताशी असलेल्या आपल्या नात्याच्या विविध बाजूंचे दर्शन घडवले. सर्वसाधारपणे पौराणिक कथा व संगीत या कच्च्या मालावर चित्रपट सृष्टीतील प्रायोगिकतेची उपजीविका चालत आलेली दिसते. लता मंगेशकर या प्रतिभावंत गायिकेच्या व इतरही पार्श्वगायकांच्या आगमनाने पार्श्वसंगीतामुळे संगीताच्या क्षेत्रात गुणात्मक बदल घडून आला. भारतीय जनतेवरील सिनेसंगीताची विलक्षण पकड हा एक अपूर्व चमत्कार आहे हे वेगळे सांगायला नकोच.

१९३१ पासून महाराष्ट्रात आणखी एक लोकप्रिय संगीतप्रकार रूढ झाला तो म्हणजे भावगीत, कविता निव्वळ पाठ म्हणून दाखवण्याऐवजी ती सुरांवर गाऊन दाखवणे हे भावगीत गायनामागील तत्त्व आहे. भावगीत गायनाच्या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ज्यांनी मोलाची भर घातली अशा प्रातिनिधिक गायकांमध्ये श्री. जी. एन्‌. जोशी. जे. एल. रानडे, गजानन वाटवे, सुधीर फडके यांचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील मेळा-गीतांचा उदय आणि हळूहळू होत गेलेला ऱ्हास यांचीही नोंद घेणे आवश्यक आहे. लोकांना परस्परांच्या जवळ आणण्याच्या व त्यांना ब्रिटिशांविरुद्ध सुरु असलेल्या संग्रामात सामील करून घेण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी लोकप्रिय केलेल्या गणेशोत्सव आणि शिवजयंती समारंभातून मेळा-गीते निर्माण झाली. समूहनृत्ये/गायन, कवायती यांचा समावेश असलेल्या विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचाच मेळागीते हाही एक भाग असे.

आजच्या महाराष्ट्रातील हे सांगीतिक दृश्य म्हणजे परस्परांना सारख्याच प्रभावित करणाऱ्या अनेक शक्तींचा संपन्न मिलाफ आहे. पूर्वी कधीही संस्कृतीतील संगीतबाह्य क्षेत्रे संगीताच्या इतकी जवळ आणि तरीही इतकी दूर नव्हती! सांस्कृतिक विभाजनाच्या आणि कलात्मक एकात्मतेच्या विरोधभासात्मक प्रक्रिया एकाच वेळी वाटचाल करीत आहेत आणि म्हणूनच भविष्यात समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानाला आज जागरूक प्रतिसाद देण्याची गरज निर्माण झाली आहे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer