संप्रदाय शब्दाचा अर्थ - कधीं कधीं शब्द, पदें किंवा वाक्यें यांचा उपयोग त्यांच्या मूळ किंवा स्पष्ट अर्थाहून भिन्न अर्थानें भाषेंत रूढ झालेला असतो. अशा शब्दांना, पदांना किंवा वाक्यांना संप्रदाय ह्मणतात. उदाहरणर्थ - अजागळ शब्द घ्या. याचा मूळ अर्थ शेळीच्या गळ्याला स्तनासारखे दिसणारे मांसाचे लोंबत असलेले दोन अवयव असा आहे. पण `रामभाऊ सारखा अजागळ माणूस नव्हता बुवा आपण पाहिला' या वाक्यांत हा मूळ अर्थ नष्ट होऊन त्याचे जागीं `कर्तृत्त्वशून्य मनुष्य' असा एक स्वतंत्र अर्थ मूळ अर्थांतून निघाला व तोच पुढें रूढ होऊन बसला. यालाच मराठी भाषेंत संप्रदाय व इंग्रजी भाषेंत Idiom म्हणतात. `आतां येऊन जाऊन काय तें वतन राहिलें आहे' किंवा `ती बोलून चालून स्त्री आहे' या वाक्यात `येऊन जाऊन' आणि `बोलून चालून' या पदांच्या मूळ अर्थांचा पत्ताही न लागतां अनुक्रमें `वरकड कांहीं नाहीं, काय तें वतन आहे तेवढेंच' आणि `उघड उघड' अशा रूढ अर्थांनींच त्यांचा वाक्यांत उपयोग करण्यांत आलेला आहे. कधीं कधीं सबंध वाक्यचें वाक्य संप्रदाय ह्मणून योजण्यांत येतें. उदाहरण - `तो नाकावर माशी बसूं देत नाही.' या वाक्याचा, तो कोणाचें उणें बोलणें सहन करीत नाहीं, हा रुढार्थ आहे. पण हा अर्थ आला कसा हें पाहण्यास थोडेंसे डोकें खाजविल्याखेरीज गत्यंतर नाहीं. नाकावर माशी बसली असतां नाकाला खाज सुटाते, हा आपला नेहमींचा अनुभव लक्षांत घ्यावा, तेव्हा कोठें वरच्यासारख्या वाक्याचा अर्थ लागणार! ह्मणूच भाषाशास्त्रज्ञांनी असे शब्द, पदें व वाक्यें याना संप्रदाय असें नांव देऊन त्यांचा एक निराळा वर्ग केलेला आहे.
मराठी भाषेंत असे संप्रदाय सुमारें तीन चार हजार आहेत. त्या सर्वांचे सोपपत्तिक विवेचन करण्यास हजार दोन हजार पानांचा ग्रंथ पाहिजे. संस्कृत, हिंदुस्थानी, गुजराथी अशा निरनिराळ्या भाषांतून संप्रदाय व ह्मणी हीं आलीं आहेत. अस्सल मराठी संप्रदायांप्रमाणेंच या परभाषांतून आलेल्या संप्रदायांच्या व ह्मणींच्या उपपत्तीचा संबंध पुष्कळ वेळां अलिखित असा एखाद्या दंतकथेशीं, धर्मविषयक समजुतींशीं, आचारांविचारांशीं, समाजाच्या प्रकृतिविशेषाशीं किंवा अनेक शास्त्रीय प्रमेयें आणि सिद्धांत यांच्याशी असतो. ह्मणून सगळ्या दंतकथा, सगळ्या ऐतिहासिक गोष्टी, कल्पित गोष्टी, पुराणें, धर्मपर वा नीतिपर वाक्यें, लोकांच्या समजुती, आचार व शास्त्रें यांचे ज्ञान असल्याशिवाय संप्रदाय व ह्मणी यांची उपपत्ति लावण्यास प्रवृत्त होणें हें धार्ष्ट्यांचे काम आहे. बरें, इतकी सगळी तयारी करून सुद्धां एकानें दिलेली उपपत्ति दुसऱ्याला पटेलच असा काय नेम आहे ? कारण, पुष्कळ वेळां एकाच संप्रदायाची किंवा ह्मणीची उपपत्ति निरनिराळे विद्वान् गृहस्थ निरनिराळ्या प्रकारें देतांना आढळतात! त्यांतली सयुक्तिक कोणती, अयुक्तिक कोणती, ग्राह्य कोणती, अग्राह्य कोणती हें ठरवावयाचें कोणीं ? येवढी जीवाची यातायात करून आणि शिरावर जड जोखीम घेऊन एखाद्यानें संप्रदाय व ह्मणी याचें सोपपत्तिक विवेचन करणारें असें पुस्तक लिहून प्रसिद्ध केलें, तर त्याला फाडून खाणारे निष्ठुर टीकाकार आपलीं शस्त्रें पाजळून बसलेच आहेत ! या व इतर अडचणींना भिऊन आजपर्यंत या कार्याला कोणीं हात नसावा अशी माजी समजूत आहे.
मराठी भाषेचे संप्रदाय व ह्मणी हा विषय भाषेच्या दृष्टीनें जसा महत्वाचा आहे तसा मनोरंजकही आहे. पण कोणाला ? तर ज्याचें मन भाषाविषयांत रममाण होईल त्याला. इतरांना तो रुक्षच वाटावयाचा ! यामुळें कादंबऱ्या व नाटकें यांच्या पुस्तकांना जसा लोकश्रय मिळतो, तसा प्रस्तुत पुस्तकास मिळणें शक्य नाहीं; तथापि अलीकडे कांहीं अंशीं मराठी लेखक व वक्ते यांच्या परिश्रमानें व कांहीं अंशीं एम. ए. म्याट्रिक व स्कूलफायनल या परिक्षांत मराठी भाषेचा प्रवेश झाल्याकारणानें लोकांत मराठी भाषेविषयींची आस्था उत्पन्न होऊं लागली आहे. तेव्हां प्रस्तुत विषयावर केलेल्या परिश्रमांचे पहिलें फळ महाराष्ट्रापुढें मांडण्यास सध्यांचा काळ अधिक अनुकूळ आहे असें वाटल्यावरून पंधरावर्षांपूर्वी माझ्या वडील बंधूंनीं आरंभ केलेलें हें कार्य तडीस नेऊन थोड्याशा अंशांनी तरी त्यांच्या व मातृभाषेच्या ऋणांतून मी मुक्त होत आहें याबद्दल मला समाधान वाटणें स्वाभाविक आहे.
-वासुदेव गोविंद आपटे.
(आनंद मासिकाचे संस्थापक)