marathi calendar marathi dinadarshika

चला मित्रांना बोलावुया महाराष्ट्राच्या विलोभनीय सफरीवर..

Travel Maharashtra State - Join MarathiMati.com

HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER   

Marathi eMail - Send eMail in Marathi Language Marathi Greetings - Send Marathi Greeting Card For Free AksharMancha - Open Stage For Marathi Poet Writer Artist Bhagyavedh - Astrology in Marathi Marathi Websites & Useful Links, Directory of Marathi Websites Maharashtra Art - Art (Kala) of Maharashtra State MarathiMatitale Kohinoor - the Legends of Maharashtra State
Marathi Lekh - Marathi Articles Marathi Dinadarshika Marathi Calendar Maharashtra State Resource - Travel, Culture, Art, Letrature and more... Shatayushi - 100 Years of Fitness Marathi Tarun - Maharashtra Youth Guide Marathi Sahitya - Marathi Language Literature Aapali Marathi - All about Marathi Language
Samwad - World of Words Maharashtra, Marathi Related News & Events in Marathi Language Mazha Balmitra - Special Section for Marathi Kids Karamnuk - Entertainment Section for Marathi Film Marathi Drama Marathi Jokes Marathi Vinod Maharashtra Travels - Maharashtra State Travel Information Marathi Culture - Maharashtra State Culture Information Marathiche Mandand - Legends of Marathi Language
MarathiMati - Home

मराठीमाती डॉट कॉम / महाराष्ट्र राज्य संदर्भ कोष

BACK | MAHARASHTRA HOME

Maharashtra State Information about Travel, Literature, Culture, Art, Sports

Print this page Print this Information | Send to your friends Send to Friends

 

धर्म पंथतीर्थक्षेत्रेविधी आणि संस्कारचालीरीती परंपराप्राक्कालीन वाङ्‍मयीन अभिव्यक्तीआजकालचे वाङ्‍मयनाटकचित्रपटसंगीत

चित्रपट - वसंत साठे

चित्रपट व्यवसायाच्या सुरवातीपासूनच धंदा म्हणून आणि कला म्हणूनही त्याचा जो विकास झाला त्यात महाराष्ट्राचा वाटा महत्त्वाचा आहे. १८९५ च्या जुलैमध्ये लुमिअरे बंधूंनी तयार केलेल्या सिनेमाचा पहिला खेळ मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये झाला. १९१२ मध्ये पुंडलीक चे चित्रीकरण याच शहरी झाले आणि दादासाहेब फाळके - भारतीय सिनेमाचे जनक - यांनी राजा हरिश्चंद्र या, सिनेइतिहासातील मैलाचा टप्पा ठरणाऱ्या चित्रपटाचे चित्रीकरणही इथेच केले. १९३१ साली बोलक्या चित्रपटाचे आगमन होईपर्यंत मुंबईच भारतीय सिनेसृष्टीचा केंद्रबिंदू होती, पण तिच्याबरोबरच पुणे, खडकी, कोल्हापूर, नाशिक या गावीही चित्रीकरणाचे काम चालू होते. कोल्हापूरला बाबुराव पेंटर यांच्या उत्कृष्ट `सेटस्‌' मुळे चित्रीकरणाचे एका श्रेष्ठ कलेत रूपांतर झाले. त्यांची सैरंध्री एतद्‍देशीय चित्रपट कलेतील एक लक्षणीय टप्पा आहे.
विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात मुंबईतील चित्रपट व्यवसायाची भरभराट झाली. अनेक चित्रपट कंपन्या अस्तित्वात आल्या. पौराणिक कथा विषयांबरोबरच मराठ इतिहासातील प्रसंग, तसेच रोजच्या जीवनातील समस्याही चित्रीकरणासाठी निवडल्या गेल्या. या कालातील दोन सर्वात उल्लेखनीय चित्रपट म्हणजे महाराष्ट्र फिल्म कं. चा ऐतिहासिक चित्रपट सिंहगड (१९२३) आणि त्याच कंपनीचा सामाजिक चित्रपट सावकारी पाश (१९२५). या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन बाबूराव पेंटर यांचेच आहे. सिंहगड मध्ये तानाजीच्या आणि शिवाजीच्या इतर शूर शिपायांच्या देशभक्तीची कथा चित्रीली आहे. तर सावकारी पाश मध्ये गरीब मराठी शेतकऱ्याच्या सावकाराकडून होणाऱ्या पिळवणुकीची. हा चित्रपट सत्यजित राय यांच्या पाथेर पांचाली आधी चाळीस वर्षे काढला गेला असून त्यातील सद्यःस्थितीचे चित्रीकरण हृदयाला भिडणारे आहे. याला भारतातील पहिला वास्तव चित्रपट म्हणता येईल. यातील तरुण शेतकऱ्याची भूमिका करणारे व्ही. शांताराम पुढे एक श्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी आणखी दोन महत्त्वाच्या मूक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली ती याच काळात. नेताजी पालकर (१९२८) आणि उदयकाल (१९३०). या चित्रपटाचे मूळ नांव स्वराज्य-तोरण होते. पण त्या काळच्या सेन्सॉरने त्यास हरकत घेतल्यावरुन ते बदलून उदयकाल असे ठेवण्यात आले. त्यात शिवाजीच्या तारुण्यातील धाडसी मोहिमांची कथा दाखवण्यात आली होती.
बोलपट
अमेरिकेत बोलपटांची निर्मिती सुरू होऊन तीन-चार वर्षे नाही झाली तोच भारतात पहिला बोलपट निर्माण केला गेला. आलम आरा या पहिला भारतीय बोलपटाने प्रकाशन १९३१ च्या मार्चमध्ये करण्याचा मान मुंबईचा होता. या चित्रपटाचे निर्माते अर्देशीर एम्‌ इराणी होते. त्यात झुबेदा व मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या. यानंतर जवळ जवळ १ वर्षाने, फेब्रुवारी १९३२ मध्ये व्ही, शांताराम यांनी पहिला मराठी बोलपट प्रकाशित केला. या चित्रपटासाठी त्यांनी दादासाहेब फाळक्यांच्या हरिश्चंद्राचीच कथा निवडली. त्याचे नांव होते अयोध्येचा राजा आणि तो मराठी व हिंदी या दोन्ही भाषात एकदमच काढला गेला. यानंतर प्रभात व इतर महाराष्ट्रीय चित्रपट संस्थांनी दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटापर्यंत द्वैभाषिक चित्रपट काढण्याचा नेम कायम ठेवला.
अयोध्येचा राजा मुख्यत्वेकरून पडद्यावरचे नाटक होते असे म्हणावे लागेल. संवादापेक्षा घटना वा `ऍक्शन' यांच्यावर भर देणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे प्रभात आणि व्ही. शांताराम यांचाच अग्निकंकण. भटक्या लोकांनी पळवून नेलेल्या राजपुत्राची गोष्ट यात सांगितली आहे. एकाच वेळी मराठी व हिंदी अशा दोन आवृत्त्या एकदम काढण्याच्या प्रथेमुळे हे चित्रपट भारतभर वितरण करण्याच्या व खपण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाकांक्षी प्रमाणावर चित्रिलेले होते. सर्वप्रथम रौप्यमहोत्सव (२५ आठवडे ) साजरा करणारा मराठी चित्रपट भालजी पेंढारकर यांचा श्यामसुंदर. यात शाहू मोडकने कृष्णाची तर शांता आपटेने राधेची भूमिका केलेली होती. १९३३ मध्ये देखील व्ही. शांताराम यांनी रंगीत चित्रपटाच्या चित्रीकरणात रस घ्यायला सुरवात केली होती. त्यांच्या सैरंध्रीची त्यांनी एक रंगीत आवृत्ती जर्मन रंगप्रक्रिया वापरुन तयार केली होती. पण या त्यांच्या प्रयत्नास दुर्दैवाने यश आले नाही. भारतातील रंगीत चित्रपट मात्र दुसऱ्या महायुद्धानंतरच उदयास आले. मेहबूब यांचा आन, सोहराब यांचा झांसी की रानी आणि व्ही. शांताराम यांचा झनक झनक पायल बाजे हे तीन पहिले भारतीय रंगीत चित्रपट. ईस्टमन कंपनीच्या रंगप्रक्रिया येथे सुरू झाल्यावरच रंगीत चित्रपटांची चलतीही सुरू झाली. अंबालाल पटेल यांनी मुंबईत प्रथम प्रक्रियाकरणाची प्रयोगशाळा १९५० नंतर सुरू केली.
सामाजिक चित्रपट
सैरंध्रीच्या अपयशानंतर प्रभातने सिंहगड हा ऐतिहासिक चित्रपट प्रकाशित केला आणि मग लवकरच पुण्यात स्वतःची मोठी चित्रपट नगरी खोलून त्यांनी पुण्यास बस्तान हलवले. १९३४ पर्यंत मराठीत संपूर्ण सामाजिक चित्रपट बनविण्यात आलेले नव्हते. पुण्यात जम बसवल्यानंतर प्रभातने पहिला सामाजिक चित्रपट तयार केला. विनायक हे त्याचे दिग्दर्शक होते. विलासी ईश्वर हा तो चित्रपट. भा. वि. वरेकरांच्या कादंबरीकर आधारित होता. परंतु त्यास म्हणावे तितके यश मिळाले नाही. १९३५ पर्यंत विश्राम बेडेकरांनी राम गणेश गडकऱ्यांच्या ठकीचे लग्न चे व चि. वि. जोशांच्या सत्याचे प्रयोग चे चित्रीकरण करून ४००० व ६००० फूट लांबीचे दोन छोटे चित्रपट काढले. दोन्हीचे प्रकाशन एकदमच झाले. परंतु त्यांनाही लोकाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
तथापि पहिल्याच अपयशाने फारसे खचून न जाता विनायकांनी दुसरा सामाजिक चित्रपट छाया हंस पिक्चर्ससाठी काढला. हा वि. स, खांडेकरांच्या एका कथेवर आधारित असून त्याच्या पटकथेस पारितोषिक मिळाले. आणि विनायक यांचा एक प्रगतिशील दिग्दर्शक म्हणून सर्वत्र बोलबाला झाला. त्यानंतर त्यांनी आचार्य अत्र्यांच्या औपचारिक, विडंबनात्मक, व प्रचलित समाजव्यवस्थेवर टीका करणाऱ्या लिखाणावर आधारित धर्मवीर, ब्रह्मचारी, ब्रॅंडीची बाटली आणि अर्धांगी हे चित्रपट काढले. तसेच वि, स. खांडेकरांच्या दमदार व दर्जेदार कथांवर आधारित देवता, अमृत आणि माझे बाळ हेही.
उज्ज्वल काल
मराठी चित्रपटांच्या इतिहासात १९३६ ते ४२ हा काळ सर्वाधिक निर्मितीक्षम ठरेल. विनायक यांच्या सामाजिक चित्रपटांव्यतिरिक्त बाबूराव पेंटर यांनी आपल्या मूक सावकारी पाश ला याच काळात बोलके केले आणि व्ही. शांताराम यांनी आपला प्रसिद्ध कुंकू निर्मिला तोही १९३७ मध्ये. हा चित्रपट तर भारतभर गाजला. याच्यात शांतारामनी कुठलेही पार्श्वसंगीत न वापरता फक्त नैसर्गिक आवाजच वापरले. त्यानंतर आले त्यांचेच माणूस - एक वेश्या आणि एक पोलिस यांची कथा आणि शेजारी - आंतजातीय. आंतर्धर्मीय सलोख्याचीकथा या तिन्ही चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या दुनिया न माने, आदमी व पडोसी अशा होत्या. परंतु मूळ मराठी चित्रपट त्यांच्या हिंदी आवृत्त्यांपेक्षा सरस होते हे कुणालाही कबूल करावे लागेल.
या तीन सामाजिक चित्रपटांबरोबरच प्रभातने महाराष्ट्राच्या संतांच्या जीवनावर आधारित धर्मात्मा, तुकाराम आणि ज्ञानेश्वर हे तीन चित्रपटही याच काळात काढले. पहिल्यात अस्पृश्यतेविरुद्ध हृदयस्पर्शी आवाहन आहे, तर दुसऱ्यातील वास्तववाद व माणुसकी नावाजण्याजोगी आहे. याच चित्रपटाला (तुकाराम) व्हेनिस येथील चित्रप्टमहोत्सवात पारितोषिक मिळाले आणि तो मुंबईतील एका चित्रपटागृहात एक वर्ष चालला. ज्ञानेश्वर मध्ये मानवतावाद व समता यांचा संदेश विशेष प्रभावीपणे देण्यात आला होता. त्याचप्रमाणे तो सिनेतंत्रातील `स्पेशल इफेक्टस्‌'च्या बाबतीत उल्लेखनीय आहे. त्यातील ज्ञानेश्वराने चालविलेल्या भिंतीची तुलना `अमेरिकन सिनेमॅटॉग्राफर' या मासिकाने अलेक्झांडर कॉर्डाच्या थीफ ऑफ बगदाद मधल्या जादूच्या उडत्या सतरंजीशी केली आहे. शेजारी मधील धरण फुटण्याचे देखावे प्रल्हाद दत्त यांनी तांत्रिक कौशल्याची कमाल करून हुबेहूब वाटावे इतके थरारकरीत्या घेतले आहेत.
याच सुमारास भालजी पेंढारकरांनी बरेच ऐतिहासिक चित्रपट काढले, नेताजी पालकर आणि स्वराज्य सीमेवर हे त्यापैकी दोन. त्यांच्या राजा गोपीचंद ह्या पौराणिक आणि सुनबाई ह्या सामाजिक चित्रपटानाही बऱ्यापैकी दाद मिळाली. शेजारी चे पटकथा लेखक विश्राम बेडेकर यांनी पहिला पाळणा काढून नांव केले. १९४१ मध्ये शांतारामनी प्रभात सोडले. त्याच सुमारास अत्रे आणि विनायक यांची फारकत झाले. विनायकांनी त्यानंतर लग्न पहावं करून, सरकारी पाहुणे आणि पहिली मंगळागौर हे विनोदप्रधान चित्रपट काढले. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे आणि तेव्हा जारी केलेल्या फिल्म कपातीमुळे मराठी चित्रपटनिर्मिती जवळ जवळ संपूर्ण बंद पडली. १९४३ ते ४६ च्या दरम्यान फक्त दहा मराठी निघाले, पण त्यांच्यात प्रभातचा उत्कृष्ट रामशास्त्री व प्रकाश पिक्चर्सचा लोकप्रिय रामराज्य हे होते. या काळात अत्रे-विनायक यांनी विशेष नांव घेण्याजोगे काही केले नाही.
संवर्धन काल
दुसऱ्या महायुद्धाचा शेवट आणि स्वतंत्र भारताचे नवे लोकशाही राज्य या दोन्ही घटनांमुळे मराठी चित्रपट क्षेत्रात नाविन्याचे वारे वाहू लागले. या नव्या जोमाचे दर्शन व्ही. शांताराम यांच्या रामजोशीत व मंगल पिक्चर्सच्या जय मल्हार मध्ये होते. लोकनाट्य, लोकसंगीत व लोकनृत्यावर भर असणारे हे चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरले. तमाशा आणि लावणी या लोकप्रिय ग्रामीण करमणूक प्रकारांची मराठी चित्रपटातील चलती या दोन चित्रपटापासून सुरू झाली. दोन्ही चित्रपटांचे गीतकार व रामजोशी चे पटकथा-लेखक ग. दि. माडगूळकर यांचा स्वातंत्र्योत्तर मराठी चित्रपटांच्या प्रगतीत व जडणघडणीत मोठा वाटा होता.
हे चित्रपट बघायला गर्दी करून जाणाऱ्या प्रेक्षक वर्गातही या काळात मोठाच बदल घडून आला होता. सुशिक्षित मध्यम वर्गाऐवजी आता त्याच्यात गिरणी कामगार, कारखान्यातील कामगार, शेतकरी व ग्रामीण मजूर यांचा भरणा दिसू लागला. या नव्या जमान्यात चित्रपटाच्या प्रत्येक क्षेत्रात नवनवे तारे चमकताना दिसु लागले. दिग्दर्शानात राजा परांजपे, दत्ता धर्माधिकारी, राम गबाळे, राजा ठाकूर, अनंत माने, माधव शिंदे, अभिनयात सुलोचना, वनमाला, उषाकिरण, चंद्रकांत, सूर्यकांत, हंसा वाडकर, राजा गोसावी, रमेश देव, सीमा , जयश्री गडकर, शकुंतला, अरुण सरनाईक, पटकथा लेखनात ग.दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर, पु.ल. देशपांडे , दिनकर पाटील, ग, रा. कामत, तर संगीतात सुधीर फडके, वसंत पवार, वसंत देसाई आणि दत्ता डावजेकर. १९५० नंतरच्या दशकात या सर्वांच्या प्रयत्नामुळे मराठी चित्रपटांची दखल सर्व भारत घेताना दिसू लागला. यापैकी काही चित्रपट असे : राजा परांजपे यांचा पेडगावचे शहाणे, दत्ता धर्माधिकारींचा बाळा जो जो रे, राजा ठाकुरांचा मी तुळस तुझ्या अंगणी राम गबालेंचा जशास तसे, अनंत मानेंचा अबोली आणि माधव शिंदेंचा कांचनगंगा.
खेरीज व्ही. शांतारामनी अमर भूपाळी काढला. त्याची पटकथा विश्राम बेडेकरांची होती. मराठी राज्याच्या अखेरच्या काळातील होनाजी या लोककवीच्या आयुष्यावर हा आधारित होता. बेडेकरांनी स्वतः याच काळात वासुदेव बळवंत काढला. अत्र्यांनी साने गुरूजींच्या कादंबरीवर श्यामची आई काढला. त्याला त्या वर्षीचा सर्वोतुकृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावण्याचा मान मिळाला आणि त्यानंतरच्या त्यांच्या महात्मा फुले नेही राष्ट्रीय पारितोषिकाचा मान अत्र्यांना पुन्हा मिळवून दिला. सदाशिव राव कवींनी त्याच काळात वहिनींच्या बांगड्या व शेवग्याच्या शेंगा हे दोन लोकप्रिय चित्रपट घेतले.
हिंदी चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेला व यशाला भुलून राजा परांजपे व दत्ता धर्माधिकारी यांनी त्या प्रांतातही पाऊल पण त्यांच्या प्रयत्नास यश आले नाही. राजा परांजपे यांनी जगाच्या पाठीवर काढून आपले अपयश पार धुवून टाकले; तर अनंत माने यांच्या सांगत्ये ऐका (१९५९) ने पुण्यात एकाच गृहात १३८ आठवडे सतत हजेरी लावून एक विक्रमच प्रस्थापित केला.
सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याचा जन्म झाला. राज्य सरकारने ताबडतोब नाटकांवरील करमणूक कर माफ करून तीन सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटांसाठी पारितोषिके जाहीर केली. हे पारितोषिक मिळवणारा पहिलाच चित्रपट प्रपंच हा कुटुंबनियोजनाची भलावण करणारा होता आणि त्यांत वाढत्या कुटुंबाचा भार न पेलवणाऱ्या बापाची शोककथा ग. दि. माडगूळकरानी सांगितली होती. पारितोषिकांबरोबरच राज्य सरकारने तीन चित्रपटांना दर वर्षी करमणूक कर माफ करण्याचेही ठरवले. परंतु त्याचा फायदा प्रेक्षकांना न होता निर्मात्यांना होईल अशी व्यवस्था केली आणि ही सवलत मिळणाऱ्या चित्रपटांच्या निर्मात्यांना करमणूक करातून दोन लाख रुपये देण्यात येऊ लागले. दहा वर्षे राबवण्यात आलेल्या या योजनेचा काही लक्षणीय फायदा मात्र वाढीव चित्रपट संख्येच्या रूपाने होताना दिसेना. किंबहुना १९६० नंतरच्या दशकात मराठी चित्रपटांची निर्मिती घटत घटत वर्षास दहा बारा चित्रपटांवर येऊन ठेपली. आणि त्यांतही अनंत मानेच्या तमाशाप्रधान चित्रपटांस सर्वाधिक लोकप्रियता लाभली. या चित्रपटांचे घटना क्षेत्र ग्रामीण व मुख्य भूमिका तमासगीरांच्या असल्या तरीही खेड्यातील पंचायत अधिकाऱ्यांची लाचलुचपत लाभली. पाटलाचे ना कर्तेपण अशा सामाजिक समस्याही त्यांनी हाताळल्या. त्यामुळे त्यांना प्रेक्षकवर्ग मोठ्या संख्येने लाभला. या दशकातील काही नांव घेण्याजोगे चित्रपट असे : माधव शिंदेचा कन्यादान, राजा ठाकुरांचा रंगल्या रात्री अशा, वसंत जोगळेकरांचा शेवटचा मालुसरा आणि भालजी पेंढारकरांचा साधी माणसे.
याच सुमारास मराठी चित्रपटांसमोर दोन मोठे प्रतिस्पर्धी उभे राहिले : मराठी नाटक आणि हिंदी चित्रपट. करमणूक कर माफ केल्यानंतर मराठी नाट्यभूमीला मोठा भरभरटीचा काळ आला आणि रंगभूमीवर एकामागून एक येणाऱ्या आकर्षक नाटकांना गर्दी करून जाणाऱ्या मध्यम वर्गीय शहरी प्रेक्षकवर्गाला मराठी सिनेमा पार मुकला. तसेच आदल्या दशकात रंगचित्रीकरणाशी झटापट करणारा हिंदी सिनेमा १९६० नंतर त्या तंत्रावर प्रभुत्व मिळवून भराभर रंगीत चित्रपट प्रकाशित करू लागला. या दोन प्रतिस्पर्ध्यांमुळे मराठी सिनेमा तमाशा व ग्रामीण प्रेक्षक यांच्यावर अधिकाधिक अवलंबून राहू लागला.
पुनरूज्जीवन
सन १९७० च्या आसपास मराठी चित्रपटांचा प्रेक्षक वर्ग जवळ जवळ संपुष्टात आला होता. अशा काळी दोन नवीन चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांना पुन्हा खेचून आणण्यात यश मिळवले. दादा कोंडकेंचा सोंगाड्या आणि व्ही. शांतारामचा पिंजरा हे दोन चित्रपट. कोंडकेंच्या साध्या भोळ्या नायकावर ( त्यानी ही भूमिका स्वतःच केली. ) व शांतारामच्या सुरेख रंगावर, आकर्षक संगीतावर व हृदयस्पर्शी कथानकावर प्रेक्षक खूष झाले. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेण्याचे, तसेच त्यांना निर्भेळ व सशक्त करमणूक पुरवण्याचे सामर्थ्य मराठी चित्रपटांत आहे हे दोघांनीही सिद्ध करून दाखवले. अशा चित्रपटांना प्रेक्षकांची वानवा नसते हेही. पिंजरा सर्वाधिक लोकप्रिय हिंदी चित्रपटांपेक्षाही प्रचंड `हिट' ठरला.
करमणूक कर परतीबाबत मराठी चित्रपट महामंडळाने शिफारस केलेली योजना राज्य सरकारने १९७५ मध्ये स्वीकारल्यावर चित्रपटनिर्मितीला पुन्हा चालना मिळायला मदत झाली. य़ा योजनेनुसार रंगीत चित्रपट निर्मात्याला रु. ८ लाख व कृष्ण धवल चित्रपट निर्मात्याला रु. ४ लाख इतकी रक्कम प्रथम चित्रपट वितरणानंतर व दुसरा पूर्ण केल्यानंतर मिळू लागली. या योजनेमुळे आता जवळ जवळ सर्व मराठी चित्रपट रंगीत निघू लागले आहेत, तसेच निर्मितीत वाढही झालेली आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, अर्थपूर्ण आणि आशयनघन चित्रपटांची निर्मितीही लक्षात येण्याइतकी वाढली आहे.
सन १९७५ साली जब्बार पटेल यांनी चित्रपट दिग्दर्शनात प्रथम पाऊल टाकले. विजय तेंडुलकरांनी लिहिलेला व पटेलांनी दिग्दर्शिलेला सामना बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिके मिळवून गेला. त्यांच्याच जैत रे जैत ला राज्य सरकारचे पारितोषिके मिळाले. त्यानंतरचा त्यांचा सिंहासन सत्ताधीशांच्या सत्तेच्या राजकारणाचे वास्तव चित्रण करतो; तर उंबरठा कौटुंबिक जीवनाची कोंडी फोडून मुक्त होऊ बघणाऱ्या स्त्रीचा संघर्ष दाखवतो. तसेच पीडित स्त्रियांना संरक्षण देणाऱ्या संस्थांतील लाचलुचपतही. जयू आणि नचिकेत पटवर्धन यांनी जुलमी रॅंडची हत्त्या करणाऱ्या चाफेकर बंधूंवर २२ जून १८९७ हा चित्रपट काढला आहे. तसेच अमोल पालेकरांचा फ्रान्समध्ये पारितोषिक मिळवणारा आक्रित भोळ्या समजुती व जुनाट रूढींचा समाजावरील पगडा दाखवतो. अशाच अनेक इतर विविध समस्यांना सामोरे जाणारे किंवा गुंतागुंतीच्या घटनांचे विश्लेषण करणारे आणखी काही नवे चित्रपट म्हणजे : अनंत मानेंचा सुशीला, बाबासाहेब फत्तेलाल यांचा चोरीचा मामला, दादा कोंडकेंची हिट मालिका, राजदत्तचा देवकीनंदन गोपाला. अलीकडे मराठे चित्रपट पूर्वापेक्षा लोकप्रिय आहेत. हुंडाबळीच्या विषयावरील लेक चालली सासरला तर सर्व महाराष्ट्रात जोरात चालू आहे. यावरून हे स्पष्ट होत की आता तमाशा लावण्याचा मसाला घातल्यावाचूनही मराठी चित्रपट सहज लोकप्रिय होऊ शकतात. या चित्रपटांची तांत्रिक पातळीही निश्चित उंचावली आहे. चित्रपटांची तांत्रिक बाजू अधिक भक्कम व आधुनिक व्हावी यासाठी राज्य सरकारने मुंबईच्या एक उपनगरात मोठी चित्रनगरी बांधली असून तेथे डबिंग, ध्वनिमुद्रण व मिक्सिंग यांसाठी अत्याधुनिक सामग्री वापरण्याची सोय केलेली आहे. नुकतीच राज्य सरकारने बांधायला हातात घेतलेली कोल्हापूरची चित्रनगरीही पुढच्या वर्षी पूर्ण व्हावी, आणि त्यानंतर तेथे मराठी तर मुंबईत हिंदी चित्रपट निर्मिती असे विभाजन होईल. येथे मुख्य समस्या सिनेगृहात मराठी चित्रपट दाखवायची वेळ खरेदी करणे हीच आहे. राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे वर्षातून चार आठवडे तरी प्रत्येक चित्रपटगृहाने मराठी चित्रपट दाखवलेच पाहिजेत. परंतु या आदेशाचे काटेकोर पालन होते अशी परिस्थिती नाही. परंतु आता हिंदी चित्रपट फार मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ फिल्मच्या रूपाने निघू लागल्यामुळे ही समस्या आपोआपच सुटण्याची शक्यता आहे. याखेरीज वरील करपरतीच्या योजनाही सरकार राबवीत असल्याने मराठी चित्रपटांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे यात शंका नाही.

  LEGAL PLACE ADVERTISE  
Write to: Harshad Khandare
All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare.
मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८
OWNWAY Art & Technology
Channel Websites -MarathiMati™.com - MarathiMati™.net - MarathiMati.org - MarathiMati™.tv - MARATHIPATRA.com - NashikDiary.com - PUNEPRIME.com - NamdeoShimpiSamaj.org - MAHARASHTRAPRIME.com