Maharashtra | महाराष्ट्र
MarathiMati.com - Android App on Google Play Store

चालीरीती आणि परंपरा

सरोजिनी बाबर

महाराष्ट्र(Maharashtra State,India)

वाजत्या घुंगूरवाळ्याची पावलं घरात उमटणार आहेत अगर आपण आत्या होणार आहोत यातली चाहूल घरात लागली तरी आमची ब्रह्मानंदी टाळी लागायची. अशा वेळी मनात यायचं की, आपल्या वहिनीला एक सुंदर देखणी मुलगी व्हावी. त्या चंद्रज्योतीच्या उजेडात सारं घरदार उजळून निघावं आणि आपण हौसे मजेच्या सगळ्या सोपस्कारांच्या धांदलीत स्वतःला हरवून बसावं . लाल चुटूक होठांच, भुरभुरत्या जावळाचं, मऊसूच अंगाचं, गुलाबी गालांचं हसरं बाळ घरात यायचं म्हणजे केवढा आनंद! रेशमी खणाच्या कुंजीत हे राजबिंड रुपडं गुंडाळून सरीबिंदलीच्या न्‌ वाघनखाच्या साजानं नटवलं किंवा शेलक्या वस्त्रांच्या झुबल्या टोपड्यांनी शिणगारीत हातावर घेतलं म्हणजे किती मज्जा! हो बाई, सोनार घरी जाऊन सगळी बाळलेणी घडवून आणीन तरच राहीन पाच कुवारणी पुजून जिवतीची आराधना करीत घरात ह्या राणीच्या रुपानं महादेवीच अवतरलीय असा सांगावा घरोघरी धाडीन तरच नावची म्हणावी मी!

खरंच, दादाला मुलगी झाली ना की, माझ्या पायाला भिंगरी लावीन कायम काय आणायला फिरीन मी, झालंच तर मनाला पंख लावीत संगं भूक-लाडू तहान-लाडू घेऊन बारशाची निमंत्रण करायला घरोघरीचे उंबरठे झिजवीन. आमची आजी तर म्हणते की, पहिली मुलगी व्हावी म्हणजे घरात लक्ष्मी नांदते. तिच्या रुपानं सरस्वतेचा संचार होतो घरोदारी. तिच तर सांगणंच मुळी की, समींदर उफडा करीत हिरे माणीक वेचून बाळाचं झबलं टोपडं गुंफावं. खेळण्या पाळण्याला राघू मैना लावावेत. चंद्रसूर्याचे दिवे पाजळावेत. दारी लामण दिव्यांची रोषणाई करावी आणिक जिनगराला सांगून पाळण्यावर खेळण्याची अब्दागिरी झोकात तयार करून घ्यावी. पाच सवाष्णींच्या ओट्या भराव्यात. गावातल्या देवीला पुरणावरणाच महानैवेद्य दाखवून बाळीला आशीर्वाद मागावेत. झेंडू झेंडू गोंडं लावून राणीला टोपडं घालाव. आणिक त्या टोपड्याला पिंपळपान जडवून बाळीच्या गोरेपणाची बडेजाई मांडावी.

आमची आई तर म्हणते की, दादाची लेक म्हणजे दुधावरची साय. लेकासारखी तिची जोपा व्हावी.

लेकीची अंगलट जाईच्या फोफावानी
बया माऊलींन जोपा केलीया लेकावानी
अशीच भाषा बघणारानं केली तर खरं म्हणावं!

वाढत्या वयाचं लेणं लेत लाडाची लाडुबाई घरात रांगायला लागली, घुंगूरते पाय घेऊन पळायला लागली म्हनजे तिच्या कवतिकाला आमच्या घरी उधाण येत. आमच्या ताईला मुलगी झाली तर तिला खेळायला गावोगांच्या किती मावल्या आल्या. भाजक्या चूल उतरंडीचा रग्गड खेळ घरात आला. तऱ्हेतऱ्हेच्या गोंड्यांनी तिची लांबसडाक केसांची वेणी गुंफली गेली. जरतारी काठाची रेशमी पोताची परकर पोलकी शिवली गेली न्‌ भातुकलीचा अगर भोंडल्याचा घरातल्या ओसरीवर दणका उडून गेला. चवीधवीचे खाऊ खिरापतीला आले. निरनिराळ्या गीतांचे स्वर घुमले न्‌ आजोळ घराला जशी इंद्रसभेची शोभा आली. भातुकलीला तर सगळं गाव बघायला लोटावं अशी बारकाली-बारकाली भांडीकुंडी गोळा झाली. लेकीला जणू संसाराचा श्रीगणेशा शिकवला गेला. बरोबरच्या मुलीबाळींच्या सहवासात तिचं बालपण झोकात सजलं गेलं.

घरातली मुलगी म्हणजे काळजाचा घड. आज नाही उद्या ती सासरी जाणार. म्हणून तिचं कौतुक आणखीनच. देवादिकांनी ऊसमुळे, पानमळे आया मुलींना आंदण दिले तर आपणही काही भरघोस द्यावं हो हौस. त्यासाठी मुलगी वयात आल्यापासूनची तयारी. ऐपतीप्रमाणं देण्याघेण्याचा विचार. बरोबरीचा जावई शोधण्यासाठी धडपड. शिवाय

तुझ्या ग गालावरी कुणी ग गोंदले

फूल कुणी ग टोचले गुलाबाचे

लेकीच्या देखणेपणाबद्दलची ही हौस मौज मनात, त्यातून मग-

नवरी पाहू आले आले गडाचे गणपती

भांगतुऱ्या लक्ष मोती उषाताईंच्या

नवरी पाहू आले सोपा चढूनी अंगणी

नवरी शुक्राची चांदणी मैनाराणी

ठुश्या पेट्याखाली कंठ्याचे बारा सर

दिल्या घरी राज्य कर उषाताई

असली भाषा घरात निघालेली. जाई जुईच्या मांडवाची बोलणी चाललेली. आणखीन्‌-

गोरज मुहूर्त मुहूर्त पवित्र

उच्चारती मंत्र ब्रह्मवृंद

अशा सुख सोहळ्याचा विचार झालेला, वाजंत्री बोलाविलेली. पाच कळसांत न्हाणं धुणं व्हायचा बेत जुळवलेला. रुखवत सजवलेले. सवाष्णींनी गणगोतांसह देवदेवताना आमंत्रित करणारी गीतं गात हळद दळलेली. मुहूर्तमेढ पूजलेली. आंबा शिंपावा, घाणा भरावा, गौर पुजावी यातली आखणी झालेली. तर अशा धांदलीत शेलक्या वस्त्रालंकारांनी सुशोभित झालेली राधिका लगीन साज लेत बोहल्यावर आली की, आता ती परत घरी जाणार या कल्पनेनं काळीज हादरून जातं.

जरतारी पायघोळ साडी नेसलेली, गोऱ्या कपाळी कुंकवाची चिरी त्यालेली, वेणीवर मोगरीच्या कळ्या माळलेली, कोवळ्या नाकात सर्जाचे नथ घातलेली, बाजुबंद वेळा त्यालेली, तोडीचे वाक्या न्‌ कुलपाचा कंबरपट्टा घातलेली लाडकी लेक चार चौघींच्या कळपातून उठून जाणार म्हणून वारा डुरा झालेली जीव कसाबसा सावरीत आईवडील एक अंगाला उभे रहातात. जावयाला डोळे भरून पहातात. "आम्हा घरीचा पाळणा तुम्हा घरी बांधिला" म्हणत व्याही-विहिणींना विनवीत "बाळीला सांभाळा" म्हणतात.

अशा वेळी पतीबरोबर सात पावलं चालून त्याच्याबरोबर आपल्या घरी जायला उतावीळ झालेली मैना गृहलक्ष्मी होऊन उंबरठ्यावरचं माप ओलांडीत पुढं निघालेली असते. लहानपण मागं सरलेलं असतं. पोक्त पणानं घेरलेलं असतं, जबाबदारीनं माखलेलं असतं. माहेरघरचा विरह हलक्या पावलांनी मागं लोटीत उगवत्या चंद्राच्या भेटीला केव्हा जाईन या उत्सुकतेनं ती भुलून जाते... म्हणून हंड्या-झुंबरांच्या लखलखाटातील मांडव ओलांडून डोईवर जरीमंदील ल्यालेल्या, त्यात मानाचा तुरा खोवलेल्या, हळदीच्या गालावर काळी टिकली लावलेल्या, कपाळावर वर्खाचा मळवट माखलेल्या, अंगावर जरीकाठी उपरणं घेतलेल्या, अंगात कोट न्‌ पायात नवा जोडा घातलेल्या, शिरी बाशिंग लेवून ऐटबाज नजरेनं तिच्याकडे पहाणाऱ्या जीवन साथीबरोबर ती हळूहळू चाललेली असते... तिला

भरताराचं सुख हसत सांगे वालू

मुखीच्या तांदूळानं सर्जे नथीचं झालं लालू.

या सुखाची मालकीन केव्हा एकदा होईन झालेला असतं. .....
एवढचं नाहीतर-

जाई मोगऱ्याच्या कळ्या लाल भरजरी शेल्या

सांगा वहिनी तुम्हा गुंफीता कशा आल्या

संसार करायची अशी जिद्द तिनं ध्यानी मनी बाळगलेली असते, तिला स्वतःचं जग निर्माण करायचं असतं. "चंद्रानं केलं खळं, सूर्यानं केली खोपी न्‌ रावांच्या मांडीवर मी गेली झोपी " असला उखाणा घालीत आयुष्याचा अर्थ लावायचा असतो. शिवाय-

टिप्पूर चांदणं चांदण्याजोगी रात

शेजेच्या भ्रताराची देवासारखी सोबत

यातील गंमत चाखायची असते. राजलक्ष्मीचं वैभव उभं करीत जावानणंदात नाव कमवायचं असतं. शेरभर सोन्याचे अंलकार लेण्यापेक्षा ठसठशीत कुंकवाची मला गरज अधिक आहे हे तिला सिद्ध करायचं असतं. म्हणून मग ती ज्याला सांगून टाकते-

हिऱ्यामाणकांचं मला नाही भूषण

हळदीवैल कुंकू माझं जरीचं निशाण

आणि त्याच दिमाखानं आपल्या घरात प्रवेश करते. दिल्या घरी सुखानं राहिल पाहिजे ही आईच्या शिकविणीची बाळघुटी तिच्या संगती असल्यामुळे घरदार सावरताना आईचं प्यालेलं दूध तिच्या मनगटी खेळतं रहातं. सर्वाच्या मर्जीमाप तिचं वागणं बोलणं झाल्याकारणानं ती कुणाच्या नजरेला खुपत नाही का कुणाच्या टोचणीतही गवसत नाही. सासुरवासातले खाचखळगे हे राधा हसत मुखानं बुजवून टाकते.

होता होता ह्या राणीला दिवस जातात. तोंडावर गर्भाकाया उमटते न्‌ मग घरात आनंदी आनंद उसळून जातो, " डोहाळे कडक आहेत" यापलिकडे बोभाटा होत नाही. आवड निवड लक्षात घेऊन गाभुळली चिंच आणा, पिकलं कवठ आणा, गुलाबी पेरू मागवा, कोवळी वाळकं आणा, कोवळ्या वांग्याची भाजी करा, आवळे आणून द्या, थालीपीठे लावा असल्या कितीक गोष्टी कौतुकानं पुढं येतात. त्यामुळे आधीच उलट्या झाल्यानं अन्नाची शिसारी आलेली ही मैना आणखीनच लाजून चूर होते. आडभिंतीला बसून रानमेवा खातखात उदरी येणाऱ्या बाळराजाबद्दलची गोड चित्रं मनोमनी उभारते.

दरम्यानच्या काळातील सण उत्सव घरी झोकात साजरे होतात. दारी सडा सारवण येऊन तऱ्हेतऱ्हेची रांगोळी घातली जाते हळदकुंकवाची बोलावणी होतात. महानैवैद्य पुरणावरणाचा शिजतो. देवदेवतांची महापूजा बांधली जाते. सौभाग्यवाणाची देवघेव होत रहाते. पोरीचा जीव भरल्या निरीमुळे हाबकला जाऊ नये अगर भीतीन तिला घेरलं जाऊ नये म्हणून परोपरीनं तिची जोपा होते.

पाचव्या अगर सातव्या महिन्याचा मुहूर्त साधून कधी मळ्यातल्या केळीच्या बनातल्या मखरात बसवीत तर कधी रानातल्या झाडांना झोपाळा बांधून त्यावर बसवीत, कधी घरात वाडी भरून चौरंगावर बसवीत तर कधी नदीतल्या होडीत बसवीत अशी थाटामाठानं गणगोतांच्या सहवासात डोहाळजेवणं साजरी केली जातात. आवडी निवडीचे शिजवीत तिला धीर दिला जातो. हिरव्या बांगड्या, हिरवी साडी, फुलांचा रंगी-बेरंगी साज तिच्या साठी आणून हौस मौजेने तिचं कौतुक मांडल जातं.

गर्भीणनारी तुझा गर्भ डौलदार

उदराला येऊं दे कृष्णदेवाचा अवतार

या कल्पनेनं घरदार उल्हासून जातं. चांदण्या रात्री जेवणं होतात. जेणेकरून तिचं मन खुशीन रमेल ते सारे सोपस्कार पार पाडले जातात. सासरीमाहेरी अशी दुहेरी गुंफा मोठ्या आनंदानं पार पडते. अशावेळी-

राणीला डोहाळे कंताला काय कळे

रसलिंबू गळे बागेमधी

राणीला डोहाळे कंतानं जाणीयले

रुमाली आणीयेले बाल-आंबे

असली गंमत घडून आल्यामुळं त्यातली चव हिच्या मुखी आणखीनच सुखावते.

डोहाळ्याची गीते गात तिचं घरात झालेले जेवण तिला चांगलं मानवतं. आपल्या बाळाबद्दलची सुखस्वप्नं ती रंगवीत असते.

सडा घालून रांगोळी काढताना दाराशी गाईची पावलं मग ती अशी सुरेख काढते की, जणू तिच्या बाळाला ही पायघडी घालायला निघालीय म्हणावी! स्वस्तिक म्हणजे सूर्यदेवाची बैठक, तर ते काढताना हिच्या मनात आपल्या बाळाचं उज्ज्वल भवितव्य असायचं. म्हणून त्या भाग्य रेषा उमटताना तिचा जीव हारखायचा.

घरात सणासुदींचे दिवस आले की, महालक्ष्मीगत हिची सासू हिला पण हातावर सुवासाचा गंध माखायला लावायची. त्यामुळे घागरी फुंकताना तिचे ओठ हलायचे-

घागर घूमूदे घूमू दे

रामा पवा वाजू दे

चंदनाची उटी गवर माजी लेवू दे.

त्यामुळं सायासानं घरात उभ्या केलेल्या महालक्ष्मी प्रसन्न झालेल्या दिसायच्या. हळदीकुंकवाला येणाऱ्या बायकांनी मग कौतुकानं म्हणावं, तुमच्या घरची ही लक्ष्मी सुखा समाधानाच्या पावलांनी आलीय! तुम्ही मोठ्या भाग्याच्या तशी सासू मालन हारखून जात खुशीन मान हलवणार. तिरक्या नजरेने सुनेला बघणार न्‌ रात्रीला मीठ मोहऱ्यांनी तिची नजर काढून टाकणार.

अशा वेळी कामकारणानं गावाला गेलेल्या वकीलाची वार्ता हिच्या ओठांवर घुमणार-

माळ्याच्या मळ्यामंदी केळी नारळी जावा जावा

मधी गुलाबा तुजी हवा वास घेणार गेले गावा

राणीचा गळा तर असा सुरेख की, ऐकणाराची तहानभूकच हरपून जावी... घरातल्या कामाधामाचा तर हिला उरक दांडगा. त्यामुळं तिकडून जाता येता ही गुणगुणणार-

कपाळीचं कुंकू बाई घामानं रंगलं

आत्तीचं ग माझ्या फूल जाईचं चांगलं

भरताराचं सुख जसं पुनवेचं चांदणं

हावशा कांत माझा जणु केवड्याचं पान

पण मग क्वचितच माहेर आठवलं की, हे साजणी कावरीबावरी झालीच म्हणावी. आई, वडील, भाऊ, बहीण, भावजय, भाचे मंडळी, काका, मावशी, चुलता, चुलती, आजी, आजोबा सगळे सगळे नजरेपुढं आले की, तिनं जाऊन येते आईकडं अशा घोकणी नवऱ्यापुढं घातलीच समजावी. मग इथला डामडौल किती पण असून दे ! तिथल्या सुखाची सर इथं नाही न्‌ इथल्याची तिथं नाही हे कळत असलं तरी तुलना सोडून देत ती आल्या गेल्याजवळ सांगावा देणारच की, कमानी दरवाजाच्या माझ्या माहेरी जाऊन आईला सांगा की, मला घेऊन जा म्हणावं! मग काय? शेलक्या वारूवर स्वार होऊन दादाराया येणार न्‌ ही पण चट्‌किनी दीड दोन दिवसांच्या बोलीनं का होईना जाणार म्हणजे जाणारच. अशावेळी पुरण पोळीची, लाडवाची नाही तर सजुरीची पाटीभर बुत्ती तिच्यासंगं येताजाताना जाणार. आणिक घरोघरी मैना आल्याची खूण म्हणून तिचं वाटपही होणारच. तशात नागारपंचमी यावी म्हणजे मग तर बघायलच नको. श्रावण मासातल्या रिमझिमत्या पाऊस काळात नागदेवांची पूजा करून माहेरी असलेल्या बंधुराजांचं उदंड चिंतायचं. आणि सासर घरच्या धनदौलतीचा, वाडवडिलांच्या रुपानं येणारे नागदेव, सांभाळ करतील म्हणून मनोभावे त्यांच्यापुढ नतमस्तक व्हायचं! ... घराण्याचे कुळाचार सांभाळायचे. नागांचा फणा दुखावेल म्हणून काही वाटायचं नाही, काही कुटायचं नाही, काही चिरायचंही नाही!... घरच्या वडिलधाऱ्यांच हे वळण उचलायचं ... तीच गोष्ट संक्रांतीची. नवीन गाडगी सुगडं-(ववसा) आणून धुवून घेत रंगवायची. या सुगडांना रंगीत पाटावर मांडून त्यात उसाचे गरे, ओल्या हरभऱ्याचे घोस, गाजराचे तुकडे, पावट्याच्या शेंगा, गव्हाच्या ओंच्या, शेंगदाणे असलं काय काय परीचं शेतात नव्यानं आलेले घालायचं. तीळगूळ घ्यायचा. पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून पाच सवाष्णींना सुगड देत घेत सौभाग्यवर्धन साधायचं घरची चालरीत सांभाळायची.

तर अशा कामात ही राधिका मोठी हुषार. एकदा पाहिल की ते लगेच ध्यानात घेईल. कृतीत आणील. म्हणून तिचं शहाणपण सर्वांच्या खात्रीत उतरतं न्‌ ती घरात सुगरण ठरते.

आता माणूस कितीही शहाणा असला तरी भांड्याला भांडं लागलं की, कुरबूर निघतेच. पण म्हणून डगमगून अगर रडत बसून होत नाही. उठता बसता नवऱ्याकडे कागाळी करून चालत नाही. जो भेटेल त्याच्या जवळ माहेरी सांगावा देऊन वातावरण पेटवता येत नाही. सार पाणी प्यावं त्या रीतीनं गिळावं लागतं

बंधुजी विचारीतो मैना सासुरवास कसा

चिताकाचा फासा रूतावा तसा

अगर

बरम्या लिवून गेला तसा

यातली पण वाटाघाट करून निभाव लागत नाही, म्हणून मग ही शहाणी विचार करते की, उद्या माझं बाळ माझा पांग फेडील. हसत मुखानं मी त्याला एकेकाच्या मांडीवर दिलं की, सगळ्यांचा राग खाली बसेल.

आणि ही गोष्ट खरी. लहानग्या बाळराजाच्या दर्शनानं माणूस झाल गेल विसरून जातो. मोकळ्या मनानं बाळाशी खेळतो. हा आपला कुलदिपक आहे या विचारानं कडीखांद्यावर घेत त्याची हौसेनं जोपा करतो.

घरातलं बाळराज म्हणजे जणु सोन्याचा ढीग, भलं दांडगं ऐश्वर्य. जिवाभावाचा विसावा. सासरमाहेरचे ऋणानुबंध जोडणारा सांधा. वडीलधाऱ्यांसकट सर्वांच सुख निधान.

म्हणून मग ही गर्भारपणातल्या त्रास आनंदान सहन करीत लवकरच जन्माला येणाऱ्या आपल्या राजबिंड्याच्या विचारात स्वतः हरवून बसते. बाळाचे डोळे कसे असतील, ओठ कसे असतील, हातपाय कसे नाचतील, आपल्याकडे बघत बघत आपल्या अंगावर पिताना बाळ कसं सुखावेल, आपली त्यावेळी ब्रह्मानंदी कशी टाळी लागेल. बाळाचं कौतुक सासरी माहेरी कोण्या रीतीनं केलं जाईल वगैरे वगैरे अनेक कल्पना तिच्या मनी घोळू लागतात...

त्यामुळं आपला बाळ कुणासारखा दिसेल या विचारात असताना ते थोरामोठ्यांची आठवण करते. देवदिकांच्या पूजेत रमते. वडीलधाऱ्यांच्या विचारात रहाते. पतीदेवाच्या गुणरूपात गुरफटून घेते न्‌ मग अखेर शेवटी माझं बाळ कृष्णदेवाच्या रूपानं येऊंदेल या कल्पनेत विसावते. त्या कारणानं उदरातील बाळाचा भार पेलीत वडीलधाऱ्यांना नमस्कार करताना ती बाळाला आशीर्वाद मागते. एवढच नाही तर आपलं आयुष्य उणं करीत बाळाचं वाढूं दे म्हणून देवापाशी मागणं मागीत तुळशीला प्रदक्षिण घातले... अशा वेळी ढुश्श्या मारीत तिचं बाळ तिला सांगून टाकतं की, `थांब, मी कोण आहे ते तुला लौकरच दाखवतो '.... त्यासरशी ती अशी खुदकिनी हसते की, जणू तीच यशोदा न्‌ देवकी झालीय म्हणावी!

MarathiMati.com - Android App on Google Play Store

MarathiMati.com - Android App on Google Play Store

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Nashik Diary - Nashik City Explorer