महाराष्ट्रात आदिवासी जीवनपासून ते अत्याधुनिक नागरी जीवनापर्यंत कलासक्ती आणि सौंदर्यपूजा यांना फार महत्त्वाचे स्थान आहे आदिवासींचे सण-उत्सव गाण्यानाचण्यानेच साजरे होतात, वारली ठाकर, महादेव कोळी, कोकणे, गोंड, माडिया असे अनेक प्रकारचे आदिवासी समाज महाराष्ट्राची संस्कृती श्रीमंत करतात. तीच गोष्ट वंजारा, धनगर, मच्छीमार कोळी, इत्यादींची, भक्तींच्या मस्तीत नाचणारे, वाघ्ये आणि मुरळ्या, वासुदेव, भुत्ये, चित्रकथी, भराडी, गोंधळी असे अनेक प्रकारचे कलावंत महाराष्ट्रात पुर्वापार आहेत. शिवकालानंतर महाराष्ट्रात शाहिरी कलेचा विकासही खूप झाला. ` अकट-बिकट कवनांच्या चाली' मधले पवाडे गाणारे शाहीर लोकमंच गाजवीत असतात. मोजक्या साथीदारांच्या मदतीने आणि डफ-तुण्याच्या साथीवर शाहिरी पवाड्याचा बुलंद आवाज ऐकू आला की मराठमोळ्या मनाला वेगळे स्फुरण चढते. देवळात भजन रंगते तर चव्हाट्यावर शाहिरी कला. उत्तर पेशवाईपासून लावण्याची रचना मराठी मनाला, भुलवू लागली. लावणीचे आकर्षण आजही कमी झालेले नाही. गण, गौळण, लावण्या आणि हजरजबाबी संवाद यांनी फुलवलेला तमाशाही रांगड्या मनाला पसंत पडतो. या तोकप्रिय कलांचे माध्यम स्वमतप्रसारासाठी भिन्न विचार प्रणालीच्या लोकांनी वापरलेले आहे. या सर्व कला सर्वार्थीं लोककला असल्यामुळे त्या शहरांतून, खेड्यांतून हजारोंच्या समुदायांपुढे सादर केल्या जातात. सनई-चौघड्यांच्या स्वरांत उगवलेला महाराष्ट्रातला दिवस भजनाच्या किंवा लावणीपवाड्याच्या किंवा नाट्यसंगीताच्या, किंवा अभिजात संगीताच्या स्वरांनीच संपतो.
भक्ती, शक्ती आणि कलासक्ती यांचे संगमतीर्थ म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्रातल्या या गुणसंपदेचा महाराष्ट्राला अभिमान वाटतो. येथे भक्तीला समतेचे अधिष्ठान आहे. शक्तीला स्वातंत्र्यप्रेमाचे वरदान आहे. आणि कलाशक्तीची परिणती जीवनानंदात होणारी आहे. ही अस्मिता केवळ परंपरेतून आणि पूर्वजपूजेतून निष्पन्न झालेली नाही. तिला कालानुरूप भिन्नभिन्न स्वरूपे प्राप्त होतात. सामाजिक प्रबोधन, राजकीय जागृती, विधायक कर्तृत्व, कला आणि क्रीडा यांतील गुणोत्कर्षासाठी धरलेली ईर्ष्या ही या अस्मितेची आधुनिक रूपे आहेत. आधुनिक भारताच्या म्हणजेच गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासाकडे नजर टाकली तरी असे दिसेल की राष्ट्रनिर्मितीच्या आणि प्रगतीच्या हेतूने जे जे उपक्रम झाले त्यांत महाराष्ट्र बिनीवरच राहिलेला आहे. राष्ट्रीय सभेची स्थापना आणि स्वातंत्र्याचे आंदोलन; धर्मसुधारणेचे प्रयत्न आणि समतेसाठी केलेले संघर्ष; ग्रामीण, पुनर्रचनेचे विधायक कार्य आणि ज्ञान-विज्ञानाची उपासना; कलाविकास आणि क्रीडा चातुर्य... लोकजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणे हा महाराष्ट्राचा नैसर्गिक स्वभावधर्म झाला आहे. राष्ट्रावर आलेल्या परचक्रांच्या वेळी ही महाराष्ट्राने आपला हविर्भाग आंनदाने दिला आहे.
महाराष्ट्र रांगडा आहे आणि रसिक आहे. झुंजार आहे आणि भाविक आहे. मराठी मातीच्या अभिमानाबरोबरच येथे साऱ्या देशाची चिंता आहे. ऐषआराम आणि मिजास यांच्यापेक्षा तो साधेपणा आणि सत्त्व सांभाळणारा आहे. महाराष्ट्र तत्त्वासाठी भांडतो आणि जीवनमूल्ये जपण्यासाठी निकराने झुंजतो; पन राष्ट्रापेक्षा आपण महान आहोत असे त्याने कधीही मानलेले नाही. महाराष्ट्राचे व्यक्तित्व म्हणजे केवळ गुणसंपदेचे भांडार नाही. जगात निर्दोष असे काय आहे? पीळ थोडा सैल केला, अभिमानाला अहंकाराचा वास मारू दिला नाही, निर्भय नि:स्पृह बाण्याला तुसडेपणाचि झाक आली नाही, `सत्यं ब्रूयात' ला `प्रिय ब्रूयात' ही जोड देता आली, तर महाराष्ट्र सर्वप्रिय होऊ शकेलही. पण मग तो कदाचित महाराष्ट्र राहाणार नाही. भारताच्या तारांगणात महाराष्ट्रा हा व्याधाचा तारा आहे. तेजस्वी. विविधरंगी. वैशिष्ट्याने डोळ्यात भरणारा. भारताचे सर्वच प्रदेश आपापल्या परीने सुंदर आहेत, तसा महाराष्ट्र ही सुंदर आहे आणि बाकी सर्वांच्या सौंदर्याला आधार देण्याएवढे त्याचे सामर्थ्य उदंड आणि उदार आहे. राष्ट्राने आपल्या सत्त्वशीलतेची कदर करावी आणि सेवा रुजू करून घ्यावी एवढेच त्याचे मागणे आहे.
|