कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची अभिमानजनक कामगिरी आहे ती नाट्य आणि संगीत यांच्या क्षेत्रात. यांत महाराष्ट्र अग्रेसरच आहे. जवळ जवळ ह्जार वर्षे भारतात रंगभूमी लुप्तप्राय झालेली होती. तंजावरच्या मराठा राज्यात अठराव्या शतकात तेथील, राजांच्या प्रोत्साहने आणि त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने भारतीय नाट्यसृष्टीचा पुनर्जन्म झाला. दुर्दैवाने दळवळणाच्या अभावी तंजावरी नाटके मराठी असूनही महाराष्ट्रात पोचलीच नाहीत. पुढे १८४३ साली सांगलीच्या संस्थानिकांच्या सूचेवरून विष्णुदास भावे यांनी सीतास्वयंवर नाटक रचले. आधुनिक मराठी रंगभूमीचा शुभारंभ या नाटकाने झाला असे मानतात. त्यानंतर चाळीस वर्षे विष्णुदासी पद्धतीची पौराणिक नाटके रंगभूमीवर येत राहिली. या काळातच संस्कृत आणि इंग्रजी नाटकांच्या अनुवादांचा कालखंड आला. १८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठी शाकुंतल रंगभूमीवर आणले आणि येथूनच मराठी रंगभूमीचा वैभवकाळ सुरू झाला. चित्रपट सृष्टीचा प्रभावामुळे मराठी रंगभूमीच्या वैभवात दहापंधरा वर्षेच काय तो खंड पडला. एरवी गेली शंभर वर्षे नाट्यसृष्टी विविध प्रकारच्या नाट्यकृतींनी सैव बहरलेली दिसते. याचे श्रेय किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, गडकरी, खाडीलकर, वीर वामनराव जोशी, सावरकर, वरेरकर, अत्रे, रांगणेकर, वर्तक, काणेकर, शिरवाडकर, कानेटकर, तेंडुलकर, जयवंत दळवी, मतकरी, प्रभूती नाटकारांना आहे. तसेच भाऊराव कोल्हटकर, गणपतराव जोशी, केशवराव भोसले, बालगंधर्व, मास्टर दीनानाथ, केशवराव दाते, गणपतराव बोडस, पेंढारकर, नानासाहेब, फाटक, ज्योस्त्ना भोळे, दुर्गा खोटे, मास्टर दत्ताराम, श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर, विजया मेहता, दामू केंकरे.... अशा कित्येक गुणी प्रतिभाशाली कलाकारांनाही हे श्रेय दिले पाहिजे. अवघ्या शंभर वर्षाच्या इतिहसात उत्तमोत्तम नाटके निर्माण होणे हा महाराष्ट्राचा भाग्ययोगच म्हटला पाहिजे. महाराष्ट्र हा खरोखरच नाटकवेडा मुलुख आहे. व्यावसायिक नाटक कंपन्या आणि हौशी नटसंच दोहोंची संख्या येथे फार मोठी आहे. येथील रंगभूमी राजधानीच्या शहरापुरती आणि अति सुसंस्कृत लोकांपुरतीच मर्यादित नाही. अनेक शहरे, छोटीमोठी खेडी, कामगारांच्या वसाहती सर्वत्र रंगभूमीच्या उपासना चालू असते.
गेल्या दीड शतकात हिंदुस्तानी संगीत कलेकाही महाराष्ट्रात माहेरघर मिळालेले आहे. पंडित बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर, विष्णु दिगंबर पलुस्कर, भातखंडे, भास्करबुवा बखले, प्रो. देवधर नारायणराव व्यास, विनायकबुवा पटवर्धन, रातंजनकर प्रभूनींनी अभिजात संगीताचा प्रसार भारतभर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेई. रहिमतखां, अबदुल करीम खां, अलादियाखा आणि या सर्वांचे शिष्य-प्रशिष्य यांनी महाराष्ट्रात अभिजात संगीत रसिकप्रिय केले. बझेबुवा, भास्करबुवा, मास्तर कृष्णराव, बालगंधर्व, गोविंदराव टेंबे, सुरेशबाबू, हिराबाई, केसरबाई, मोगूबाई, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, जसराज, जितेन्द्र अभिषेकी माणिक वर्मा, किशोरी अमोणकर, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू....
अशी उल्लेखनीय कलाकारांनी नामावळी फार मोठी आहे. ही नामावळी लांबवण्याचा मोह टाळून एवढेच नमूद केले पाहिजे की अखिल भारतातील गाणारे-बजावणारे कलावंत, मग ते थोर असोत की होतकरू, आपल्या कलेचे चीज करण्यासाठी महाराष्ट्राकडेच मोहरा वळवतात. `गानेवाले जगह जगह पर होते हैं सुननिवाले सिर्फ महाराष्ट्र में मिलते हैं' हा एक बुजुर्ग गायकाचा- बडे गुलाम अलींचा अभिप्राय पुरेसा बोलका आहे. संगीताची उपासना करणाऱ्या लेकी सुना आणि पुरुषही महाराष्ट्रात घरोघरी आढळतील.
चित्रपटसृष्तीचा भारतातील मुळारंभ महाराष्ट्रात झाला. दादासाहेब फाळके भारतीय चित्रसृष्टीचे जनक आहेत. या कलेच्या विकासक्रमातला `प्रभातकाल' महाराष्ट्रातच उगवला; आजही चित्रपटांमध्ये विविध दालनात अनेक नामवंत महाराष्ट्रीय कलाकार वावरत आहेत. चित्रपटातील पार्श्वगायनाच्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ कलावती म्हणून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे नांव सर्व दुनियेत मशहूर झाले आहे.
|