गेल्या शंभर वर्षांच्या इतिहसावर नजर टाकली तर या महापुरुषांच्या बरोबरच आणखीही थोर विभूती दिसू लागतात. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे, चाफेकर, कर्वे, कान्हेरे प्रभूती क्रांतीकारक, सेनापती बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, अशी नररत्ने महाराष्ट्राच्या कुशीत जन्माला आली. अगदी गेल्या पन्नाससाठ वर्षांतही महात्मा गांधीप्रणीत सत्याग्रही आंदोलने असोत किंवा सशस्त्र क्रांतिकारकांची आतंकवादी आंदोलने असोत, महाराष्ट्राने बलिदान करणाऱ्या अनेक त्यागी वीरांना जन्म दिला असे दिसेल, सारांश, आधुनिक भारताच्या जडणघडणीतही महान् कामगिरी करून महाराष्ट्राने आपले नांव सार्थ केले आहे.
पराक्रमाची धडाक्याने वाजणारी नौबत, भक्तीच्या मळ्यात अखंड दुमदुमणारा गजर आणि समाजक्रांतीसाठी चाललेल्या आंदोलनांतील घोषणा आणि यांच्या धडाक्यात सौंदर्योपासनेचा मंद्रमधुर आवाज बुडुन जातो. या सौंदर्योपासनेने आमच्या महावस्त्राला जरीचे काठ लावले आहेत. आणि यांच्यावर जरीचेच असंख्य बुंदही झळकावले आहेत. उत्तर भारताच्या मानाने महाराष्ट्रात साधनसमृद्धी कमी आहे आणि म्हणून ख्याली-खुशालीही बेताची आहे. दक्षिण भारताच्या तुलनेने पाहता महाराष्ट्राला शांतताही फार थोडी लाभली. परिणामी महाराष्ट्रात बुलंद भव्य इमारती उभ्या राहिल्या नाहीत आणि नाजूक नक्षीची प्रचंड मंदिरही झाली नाहीत. मराठी तट्टे ठेगणी आणि माणसेही अटकर बांध्याची; तसेच इथले स्थापत्यही अल्पप्रमाण. अंबरनाथ किंवा सिन्नर येथील देवळांसारखे काही अपवाद वगळले तर शिल्पी लोकांची करामत फारशी दिसत नाहे. काही गढ्या आणि वाडे यांचे बांधकाम प्रेक्षणीय आहे. क्वचितच कळाशीदार कारंजी, चौक आणि बगीचेही आहेत. पण एकंदरीने भव्यतेपेक्षा उपयुक्ततेलाच अधिक महत्त्व होते. महाराष्ट्राला अभिमान वाटतो तो दोन गोष्टींचा . सह्याद्रीच्या कुशीतली लेणी आणि सह्याद्रीच्या माथ्यावरचे किल्ले. पहिली सौंदर्यतीर्थे आणि दुसरी सामर्थ्याची आधिष्ठाने. घारापुरीच्या त्रिमूर्तीएवढे भव्य आणि प्रभावी शिल्प क्वचितच कोठे दिसेल. सुडौल रेषा, उजळ रंग आणि भावदर्शी मुद्रा यांच्यामुळे अजिंठ्याच्या लेण्यांतली चित्रकला जगविख्यात झाली आहे. वेरूळची लेणी म्हणजे पाषाणशिल्पांच्या गतिमानतेचा चिरंतन प्रत्यय. अर्थात ही सर्व कमाई प्राचीन काळची आहे. महाराष्ट्राचे `महाराष्ट्रपण' पूर्ण होण्याच्या आधीची. त्या मानाने किल्ले निकटच्या इतिहास काळतले आहेत. त्यांचे तटबुरुज आणि दरवाजे सौंदर्यपेक्षा सामर्थ्याचा अनुभव देतात. राजगड, रायगड, प्रतापगड, पुरंदर यांसारखे सह्याद्रीच्या सिखरांवरचे गड, औरंगाबादजवळील देवगिरी ऊर्फ दौलताबाद; आणि जंजिरा, सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग ज्या प्रदेशात आहेत त्याच्या वीरवृत्तीचा पुरावा अधिक शोधण्याची गरज नाही.
अलीकडे मराठाकालीन चित्रकलेचे काही चांगले नमुने प्राप्त झाले आहेत. परंतु चित्रकलेच्या वैभवाचे दर्शन आधुनिक महाराष्ट्रातच घडते. केरळीय चित्रकार राजा रविवर्म्याने महाराष्ट्रात वास्तव्य केले होते तेव्हापासून आभिजात वळणाऱ्या चित्रकलेने येथे मूळ धरले. मुंबई शहरात कलाशिक्षणाचा आरंभ झाल्यापासून चित्रकलेच्या विश्वात एक मुंबई पठडी निर्माण झाली. स्वरूपाच्या चित्रक्लेचा आपल्या देशतील चित्रकारांना परिचय होऊ लागला. त्यामुळे या विविध शैली आणि निष्ठा जोपासणारे अव्वल दर्जाचे अनेक चित्रकार महाराष्ट्राने भारताला दिले आहेत. त्या मानाने महाराष्ट्रातील शिल्पकला डोळ्यात भरण्याजोगी नाही. तिला जवळ असणारी पुतळे घडवण्याची कला मात्र येथे उच्च दर्जाची आहे.
|