आपण हिंदुस्तानचे राज्य जिंकले ते शेवटी मराठ्यांचा पराभव करूनच याची इंग्रजांना पुरती जाणीव होती. मरहट्टे सूडाला, प्रवृत्त झाल्याशिवाय राहात नाहीत हेही त्यांना माहीत होते. इतर काही प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्राला केवळ निष्ठूर छ्ळाच्या बळावर गुलामगिरीत जखडता येणार नाही हेही त्यांनी ओळखले होते. म्हणूनच एकोणिसाव्या शतकात, वरकरणी सामोपचाराचा मुखवटा चढवून, इंग्रजांनी महाराष्ट्रावर सावध करडी नजर ठेवली. तरीही महाराष्ट्र शक्य तसे आणि शक्य तेवढे वैर करीतच राहिला. परकीय आक्रमक राज्यकर्त्यांना महाराष्ट्र कधीच मनोमन क्षमा करीत नसतो. सन १८८५ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना होऊन अखिल भारतीय राजकरणाचे नवे युग सुरू होण्यापूर्वी महाराष्टाची तेजस्विता कित्येकदा प्रकट झाली. हे १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धावरून आणि त्या नंतरही वासुदेव बळवंत फडके यांच्या सारख्यांच्या बंडखोरीवरून सहज कळून येते.
या सुमारे सहाशे वर्षांच्या कालखंडात भाषा आणि साहित्य यांची समृद्धी वाढत गेली. सुलभ भक्तिमार्गाच्या रूपाने एक धार्मिक परिवर्तन घडून आले आणि उज्ज्वल इतिहासाने एक नवा सामूहिक पुरुषार्थ अस्तित्वात आणला. चातुर्वर्ण्याला मूठमाती देण्याएवढी शक्ती या धार्मिक आणि राजकीय परिवर्तनात नसली तरी त्याची धार थोडी बोथट करण्यात महाराष्ट्राला यश आले असे म्हणता येईल. मध्ययुगीन भारताचे सर्व दोष आणि उणीवा अर्थात महाराष्ट्रातही आढळतातच. भौतिक विद्यांची हेळसांड इतकेच नव्हे तर एकूण शिक्षणाविषयी संपूर्ण अनास्था हा त्यांतील प्रमुख दोष होता. त्यामुळेच तर अधिक प्रगत विज्ञानापुढे आणि सामाजिक संघटनेपुढे भारताला- पर्यायाने महाराष्ट्राला शरणागती पत्करावी लागली. ते काहीही असो- महाराष्ट्राची जमेची बाजूही फार मोठी असल्यामुळे मराठी मुलखाचा स्वत: विषयीचा अभिमान अदम्य आणि अजिंक्य राहिला आहे.
नव्या युगाची चाहूल भारतात आधी बंगालला आणि नंतर महाराष्ट्राला लागली. परंतु बंगालमध्ये निर्माण झालेल्या नव्या प्रेरणा मुख्यत: धर्म आणि शिक्षण यांच्या क्षेत्रांतील होत्या. महाराष्ट्रात मात्र समाजसुधारणा आणि राजकीय आकांक्षा यांनी भारलेले महापुरुष जन्माला आले. स्वराज्यनाशानंतरचा अंधार जेमेतेम पन्नास वर्षेही टिकला नाही. नव्या प्रबोधन युगाची फुटल्याचे पहिले चिन्ह रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी यांच्या लेखनात प्रकटते. आपल्या समाजची कठोर चिकित्सा करून, त्यांनी समाजाचा वरिष्ठपणा मिरवणाऱ्या ब्राह्मणांच्या खुळवट धार्मिक समजुतींवर आणि निरूपयोगी विद्येवर कडक टिका केली. सामजिक सुधारणेची प्रबल प्रेरणा निर्माण करण्याचे श्रेय त्यांच्या लेखनाला दिले पाहिजे. १८५८ च्या आसपास भारतातील तीन प्रमुख विद्यापीठे जन्माला आली. त्यांतून बाहेर पडलेल्या काही नामवंत महाराष्ट्रीय सुशिक्षितांना नवी दृष्टी प्राप्त झाली होती असे म्हणता येईल. न्यायमूर्ती रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची नांवे येथे सहजच आठवतात समाजाला सर्वांगी नवीन बळ प्राप्त व्हावे म्हणून आयुष्यभर वैचारिक आणि सामाजिक कार्य करणारे न्यायमूर्ती रानडे यांनी संस्थात्मक कार्याचा पाया घातला. राष्टीय सभेच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोठा होता. प्रार्थना समाज स्थापना करून त्यांनी नवी धर्मप्रवणता प्रकट केली. भारतीय अर्थशास्त्रांचा पाया घातला. नव्या राष्ट्रवादाचा पहिला उद्गाता म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांना आयुष्य अवघे बत्तीस वर्षांचे लाभले. त्यांचे लेखन मुख्यत: ज्या निबंधमालेत प्रसिद्ध झाले, ती माला ते केवळ आठ वर्षे चालवू शकले. पण एवढ्या अल्प अवधीत आपला इतिहास, भाषा, संस्कृती आणि राष्ट्र याविषयींचा ज्वलंत अभिमान त्यांनी जागवला आणि हे कार्य करीत असतानाच मराठी गद्याला अपूर्व सामर्थ्य आणि तेज दिले. गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतीबा फुले यांसारख्या थोर, त्यागी समाजसुधारकांनी एका नव्या समाजचे स्वप्न आपणापुढे उभे केले. लोकमान्य टिळक यांनी जनतेच्या शक्तीनेच पारतंत्र्य नष्ट होऊ शकले हा विश्वास अवघ्या राष्ट्राला दिला. `स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' ही घोषणा करणाऱ्या निर्भय लोकमान्यांनी ब्रिटिश सत्तेला पहिला प्रचंड हादरा दिला. खडतर कारावासाने दबून जाण्याइतकी आपली आत्मशक्ती लेचीपेची नाही हे स्वत:च्या कृतीने त्यांनी सिद्ध केले. लोकशक्तीनेच स्वातंत्र्यसंपादन आणि स्वातंत्र्यरक्षण होऊ शकते आणि ती जागृत करणाऱ्या प्रत्येकापाशी धैर्य हवे. देहदंड सोसण्याची तयारी हवी ही शिकवण देणारा हा थोर राष्ट्रपुरुष ज्ञानेश्वर आणि शिवाजी यांच्या मालिकेत शोभू लागला.
|