महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा विलक्षण अभिमान आहे. पुष्कळांना हा अभिमान अतिरेकी वाटतो. आजही महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात सर्व पक्षांचे, पंथाचे अनुयायी शिवछ्त्रपतींच्या विषयी असीम आदरभाव बाळगतांना दिसतात. या घटनेचे कारण नीट समजावून घेतले पाहिजे. प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शिवाजी महाराजांची स्वराज्यस्थापना म्हणजे सामान्य सत्तांतर नव्हते; ते युगांतर होते. कोणीही यावे आणि लुटावे, लुबाडावे हे चालू देणार नाही हा आपल्या राष्ट्राचा निर्धार शिवछत्रपतींच्या कर्तृत्वामुळे निर्माण झालीले आहे. स्वराज्य म्हणजे काय आणि राजाचा धर्म कसा असावयास पाहिजे याचे महाराजांना विलक्षण स्पष्ट भान होते. त्यांनी जाणीवपूर्वक देनदुबळ्यांचा सतत कैवार घेतला. मस्तवाल लोकांनी चालवलेली स्त्रीच्या अब्रूची धूळदाण बंद केली. सैन्याने सर्व रसद सरकारातून घेतली पाहिजे आणि जरूरच पडली तर सर्व काही बाजारात किंमत मोजून विकत घेतली पाहिजे असा छत्रपतींचा दंडक होता. तो घालून देताना महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांस बजावले होते `गरीबाच्या भाजीच्या काडीला दाम दिल्याशिवाय हात लावाल तर खबरदार. तसे केलेत तर यापरीस मोगल परवडला असे रयतेस होऊन जाईल' अशा अनेक गोष्टी आहेत. त्यावरून त्या प्रजाहितदक्ष राजाची दृष्टी चोख होती . त्याला न्यायाची कदर होती आणि गरिबांचा कळवळा होता हे सहज समजते. त्यामुळे राजकीय यश आणि पराक्रम यांच्याबरोबर शिवाजी राजांच्या आदर्श राजधर्माची महती महत्त्वाची आहे. युरोपीय व्यापारी म्हणजे सामान्य व्यापारी नव्हत हे त्यांनी ओळखले होते. समुद्रावरुन येणाऱ्या आक्रमकांचा बंदोबस्त समुद्रावरच केला पाहिजे हे ओळखून त्यांनी अजिंक्य नौकादल उभारले. अशी दूरदृष्टी इतिहासकाळात कोणीच दाखवलेली दिसत नाही. शिवाजी महाराजांची दृष्टी धार्मिक भेदांच्या बाबतीत उदार होती, व्यापक होती. त्यांच्या सैन्यात मुसलामानांचाही भरणा होता. राज्यात हिंदु देवस्थाप्रमाणे, मशिदी आणि दर्गे यांचाही सांभाळ केला जाई. शिवाजी राजे अत्यंत न्यायी होते. प्रसंगी अपराध्यांना कडक शासन करावे लागले तरी त्यांची वृत्ती अंध, लहरी, दुष्टपणाची नसे. अपराध्याला शासन करून पुढीलांना जरब बसवावी असा त्यांचा हेतू असे. सहसा त्यांची वृत्ती क्षमाशीलतेची होती. जातीने मोहिमा कराव्या, आदर्श घालून द्यावा पण त्याबरोबरच कनिष्ठ सहकाऱ्यांकडून कामगिरी करून घ्यावी असे नेतृत्वाचे गुण त्यांच्या ठायी होते. आधीच्या सलतनती आणी पुंडपाळेगार यांच्या अन्यायी, जुलमी कारभारच्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर शिवछत्रपतींची प्रजाहितदक्ष आणि न्यायाची भूमिका झळझळीपणे उठून दिसते. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राचा कायाकल्प झाला. आणि अठराव्या शतकात मराठ्यांचे कर्तृत्व झपाट्याने चहूदिशा पसरले.
मराठी मनाला या अलौकिक इतिहासाचा फार अभिमान आहे; क्वचित इतिहासाच्या अभिमानाचा अतिरेकही होत असेल. महाराष्ट्राचे त्रिदोष सांगताना विनोबांनी या अतिरेकाकडे अंगुलिनिर्देश केलेला आहे. पूर्वजांच्या गौरवावर भर देऊन आपली कर्तृत्वशून्यता छपवण्याचा प्रयत्न करणे अर्थातच गैर आहे. परंतु या गोष्टीला दुसरी एक बाजू आहे. या अभिमानानेच मराठ्यांचे सत्त्वरक्षण केलेले आहे आणि राष्ट्रासाठी त्याग करण्याची प्रेरणा सतत जागृत ठेवलेली आहे. शिवाजी महाराजांच्या नंतरही पहिले बाजीराव पेशवे म्हणजे मध्ययुगातील एक अत्यंत श्रेष्ठ सेनापती. त्यांच्या मर्दुमकीने दिल्लीच्या पातशाहीचा पायाच उखडला गेला आणि मोगल सत्ता हे महादजी शिंद्याच्या हातचे खेळणे होऊन बसले. स्वराज्याचे साम्राज्य होण्याच्या या प्रक्रियेत शिवाजी महाराजांनी दिलेली व्यापक दृष्टी हळूहळू अंधुक होत गेली असली तरी ती अगदीच नष्ट झाली नाही. म्हणून तर १७६१ साली पानिपताच्या तिसऱ्या युद्धात अफगाण आणि रोहिले यांच्या आक्रमाणचा बंदोबस्त करण्यासाठी मराठी फौजा उत्तरेत दौडत गेल्या. खैबर खिंडीतून कोसळणारी आक्रमणे थोपवलीच पाहिजेत या ईर्ष्येने सिंधु आणि काबुल नद्यांच्या संगमापाशी असलेल्या अटकच्या किल्ल्यावर धडकलेले होते याचा महाराष्ट्राला का अभिमान वाटू नये? त्यांच्या विजयी वारूची छाती पानपतावर फुटली पण म्हणून काही त्यांच्या पराक्रमाची, अवघ्या हिंदुस्तानच्या रक्षणासाठी त्यांनी प्रकट केलेल्या वीरश्रीची किंमत कमी होत नाही.
|