ज्ञानेश्वरांच्याप्रमाणे शिवाजी महाराजांनाही प्रस्थापित समाजधुरीणांविरूद्ध झुंजावे लागले. छोट्यामोठ्या जहागिरी आणि वतने सांभाळीत बसलेल्या आणि केवळ स्वार्थाच्या लोभाने जुलमी सत्तेविरूद्ध हत्यार उचलावयास नाखूष असलेल्या सरदार वतनदारांचा शिवाजी महाराजांना विरोधच होता. मोरे, शिर्के, सुर्वे, सावंत प्रभूती त्या काळचे मातबर सरदार स्वराज्याच्या शत्रूच्या फळीतच राहिले. मराठी मातीतून छत्रपतींनी नवी माणसे उभी केली. मावळ खोऱ्यांतले मावळे आणि कोकणचे काटक कुणबी यांच्यामधूनच कर्तबगार माणसे तयार करून शिवाजी महाराजांनी प्रचंड साम्राज्य शाहीला हादरा देण्याचा चमत्कार करून दाखवला, ज्ञानेश्वरादी संतानी कर्मकांडाचा दबदबा नाहीसा करून जड धार्मिक नेतृत्वाचा निरास केला. नेमेकी अशीच कामगिरी शिवाजी महाराज आणि त्यांच्या धारकऱ्यांनी केली. सामान्यांतून असामान्य वीर पुरुष निर्माण केले. नवे लढाऊ राजकीय नेतृत्व जन्माला घातले. सूर्यवंश, चंद्रवंश असल्या मानीव कल्पनांचा अहंकार धरून खानदानाच्या खोट्या अभिमानाने क्षुद्र वतने सांभाळत बसलेल्या दिखाऊ सरदारांची मिजास शिवाजी महाराजांनी साफ उतरवली, पालकर, पासलकर, जेधे, मालुसरे, गुजर, महाडीक ही शिवकालातली नावे पहा. किंवा त्यानंतरही जाधव, घोरपडे, वगैरे वीरांची नावे पहा. हे सर्वसामान्य थरांतून वर आलेले नेतृत्व होते जे स्पष्ट आहे. पुढेही पहिल्या बाजीरावाने शिंदे, होळकर, गायकवाड असे नवे सरदार निर्माण करून हिंदुस्तानभर मराठ्यांचा अमल बसवला. `शिवाजीने सारे नूतनच केले' असा अभिप्राय राचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रांत आहे. या नूतन पुरुषार्थात पराक्रम शक्ती, युक्ती, सावधानता हे शककर्त्याच्या अंगी स्वाभाविक असणारे विशेष गुण येतात. त्याप्रमाणे सामान्य माणसांकडून असामान्य कर्तृत्व करवून घेण्याची प्रतिभाही येते. शिवाजी महाराजांच्या थोरवीचा प्रत्यय त्यांच्या मृत्युनंतर येतो. १६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यु झाल्यावर बलाढ्य औरंगजेबाशी सत्तावीस वर्षे मराठे गनिमी काव्याने लढत राहिले. निर्नायक झालेल्या महाराष्ट्राने प्रबळ मोगलशाहीशी दिलेली झुंज ही महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या तेजस्वी अभिमानाची ज्वलंत साक्ष आहे. औरंगजेबाला महाराष्ट्राच्या भूमीत १७०७ साली मूठमाती मिळाल्यावर ही झुंज संपली. मोगल साम्राज्यशाहीचे पेकाट मराठ्यांनी असे मोडले की मिळमिळीत सौभाग्यासारखी ती दिल्लीली जेमेतेम टिकून राहिली इतकेच. मोगल साम्राज्याची ही कथा तर मग दक्षिणेतील दुबळ्या पातशाह्या नष्ट झाल्या असल्या तर नवल कसले?
|