ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाने व्यापक स्वरूप ध्यानात घेतल्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा थोर भाग्यविधाता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यावयास हवे. यादवकाळानंतर साडेतीनशे वर्षेपर्यंत बहामनी सुलतानांच्या अमलाखाली महाराष्ट्र आला होता. या राजवटीच्या खुणा महाराष्ट्रातील भग्नावशेषांत जशा दिसतात. तशा मराठी भाषेत घडून आलेल्या अनेक बदलांतही दिसतात. मराठी शब्दसंपत्तीत अरबी आणि फारसी वाणाच्या शब्दांची मोठी भर या काळात पडली. अपभ्रंश भाषांचे लेवाडेपण मराठीत नाही. तिच्यावर संस्कृतीचे बेमालूम कलम करून सिद्ध झालेल्या मराठी भाषेची वीण चांगलीच मजबूत आहे. अरबी, फारसी शब्दांचा प्रवाहही मराठीने रिचवून टाकला आणि तोही असा की भाषा दुबळी होण्याऐवजी तिचे सामर्थ्य आणि देखणेपण वाढले. हे घडत असताना राजकीय आणि सामजिक दृष्ट्या मात्र महाराष्ट्राचा विपत्काल ओढवलेला होता. गुलामीचे जिणे महाराष्ट्राच्या वाट्याला आले होते. रयतेवर जुलूम जबरदस्ती आणि अत्याचार होत होते. रयतेवर जुलूम जबरदस्ती आणि अत्याचार होत होते. उत्तरेतील मोगल सम्राटांची नजरही महाराष्ट्राकडे वळल्यावर तर हे ग्रहण आता कधीच सुटणार नाही असे वाटून जनसामान्यांची मने अगतिक झाली होती. वर्षांमागून वर्षे, शतकांमागून शतके उलटली तेव्हा कोठे मराठा सरदार दरकदार जरा डोके वर काढू लागले आणि शहाजी राजे भोसले बहामनी सुलतानांच्या सिंहासनामागचे सूत्रधार बनले. या सुलतानांचे जोखड झुगारून स्वराज्यांची स्थापना करावी हे धाडस मात्र शहाजी राजांना झाले नाही किंवा झेपले नाही. ते महत्कार्य त्यांचा पुत्र शिवाजीच करू धजावला. शहाजी आणि शिवाजी या पिता पुत्रांमधील पिढीचे अंतर जबरदस्त म्हटले पाहिजे. स्वजनांची मानहानी थांबवण्यासाठी, दीनदुबळ्यांचा छळ नाहीसा करण्यासाठी आणि स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी दक्षिणेतील सुलतान आणि दिल्लीचा सम्राट या दोहोंविरूद्ध तरवार उपसणाऱ्या या महापुरुषाने लोकोत्तर गुणांच्या बळावर महाराष्ट्रात स्वराज्यांची प्राणप्रतिष्ठा केली. छत्रपतींचे चरित्र आणि चारित्र्य यांनी प्रभावित झालेल्या मराठ्यांनी पुढे अवघ्या हिंदुस्तानच्या संरक्षणाचा वसाच घेतला मराठ्यांच्या यशापयशांची पुष्कळ मीमांसा झाली आहे, होत आहे आणि पुढेही होत राहील. परंतु राष्ट्रीय स्वभिमानाचा आणि अन्याय प्रतिकाराचा तेजस्वी आदर्श मराठ्यांनी निर्माण केला हे ऐतिहासिक सत्य अबाधितच राहील.