भूमीच्या वैशिष्ट्यांबरोबर सृष्टी आणि हवामान यांतही विविधता निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यातच पावसाचे प्रमाण सर्वत्र भिन्नभिन्न असल्यामुळे महाराष्ट्राला अर्थातच एकजिनसी रूप नाही. कुठे माळ, कुठे खडकाळ, कुठे हिरवळ, कुठे रेताड, कुठे घनदाट रान, कुठे उजाड ओसाडी. कुठे पायऱ्यापायऱ्यांची, तर कुठे साफसपाटीची- म्हणाल तसली जमीन महाराष्ट्रात आहे. सृष्टीचीही अनेक रूपे. कुठे काटेरी झुडुपे, कुठे साग पळसांची राने, तर कुठे माडपोफळींची, आंबेफणसांची गर्दी. तरीही एकंदर चित्र पाहावे तर माणसाच्या जिजीविषेला आणि कर्तृत्वाला कठोर आव्हान देणारा हा प्रदेश आहे.
अशा प्रदेशातली माणसे म्हणूच घट्टमुट्ट आणि अभिमानी झालेली आहेत. जिथे खुषीची सोपी शेती असते तिथला जीवनसंघर्ष तुलनेने सोपा असतो. पण खडकाळ जमिनीशी आणि दुष्काळी परिस्थितीशी कायम मुकाबला करणाऱ्या मरहट्ट्यांची परिस्थिती वेगळी आहे. आठव्या शतकात उद्योतनसूरी या जैन ग्रंथकाराने कुवलय माला नामक ग्रंथात रेखलेली मराठ्यांची प्रतिमा आजही यथातथ्य वाटते, `मराठे सुदृढ आणि सावळे असतात; सहनशील, अभिमानी आणि कलहप्रिय असतात. दिल्याघेतल्याची भाषा फार करतात,' असे हा ग्रंथकार म्हणतो. मराठी माणसे असा शब्दप्रयोग ज्यांच्याबद्दल होतो ती एका वंशाची माणसे असा शब्दप्रयोग ज्यांच्याबद्दल होतो ती एका वंशाची माणसे मात्र नाहीत. महाराष्ट्र ही अनेक मानववंशाची मीलनभूमी आहे, अर्थातच मराठ्यांची लक्षणे वांशिक नाहीत. त्यांचे स्वभावविशेष भूगोलाने, सृष्टिवैचित्र्याने निर्माण केलेले आहेत. मराठे कलहप्रिय अभिमानी असतील पण प्रसंग ओढवल्याशिवाय ते लढायला बाहेर पडत नाहीत. मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा कृषीवल समाज आहे. ईशान्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही. पण वैऱ्याचा सूड घ्यावा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करावे आणि अन्यायाचा प्रतिकार करावा ही मराठ्यांची जीवनमूल्ये आहेत. चिनी प्रवासी ह्यू-एन-त्संग याने महाराष्ट्राचे अवलोकन केल्यावर लिहिले आहे: `येथील लोक धाडसी, उमदे, परंतु प्रामाणिक आणि साधे आहेत. विद्याभ्यासाचे ते चाहते आहेत. उपकारकर्त्याचे उपकार ते कधीही विसणार नाहीत; परंतु कोणी अपमान केला. तर प्राणाची तमा न बाळगता ते त्याच्यावर सूड उगविल्याशिवाय राहणार नाहीत. नि:शस्त्र माणसावर तो बेसावध असताना ते कधीही हल्ला करणार नाहीत. ज्याच्यावर हल्ला करावयाचा आहे, त्याला ते पूर्वसूचना देतील. त्याचप्रमाणे त्याला शस्त्रसज्ज होण्यास वेळ देतील. नंतरच त्याच्याशी चार हात करतील. पळणाऱ्या शत्रूचा ते पाठलाग करतील, पण शरणागताला उदार मनाने अभय देतील."
|