महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे. सुमारे सात कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते. सह्याद्री हा महाराष्ट्राचा कणा आहे, तो हिमालया इतका विस्तीर्ण आणि उत्तुंग नसला तरी वयाने वडील आहे, त्याचा देह मजबूत आहे आणि तो भारताच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर असल्याने पावसाळी वारे त्याच्यावर आदळत असतात. त्याच्याशी काटकोन करून सातपुडा पर्वताच्या रांगा पूर्वेकडे गेलेल्या आहेत. या दोघा रक्षकांनी दक्षिण पठाराचे संरक्षण केले आहे. समुद्रकिनाऱ्यापासून सरासरी चाळीस मैलांवर तो उभा आहे; आणि तेवढ्या भूमीला कोकणपट्टी म्हणतात. पर्वताच्या पश्चिम बाजूला ढाळ मोठा आहे. तेथे पाऊस पुष्कळ पडतो आणि पश्चिम वाहिनी नद्यांना, छोट्या झऱ्यांना, पऱ्ह्यांना पाणी चांगले असते. तरीही जमीन खडकाळ असल्यामुळे कोकणातील शेती अतिशय कष्टांची असते. जीवनसंघर्ष उग्र असतो. अशा परिस्थितीत माणसेही सहनशील, काटक, बुध्दिमान आणि काहीशी रांगडी बनली असली तर नवल नाही. सह्याद्रीच्या पूर्वेकडील जमीन मात्र सावकाश सपाटीकडे जाणारी आहे. या पठाराच्या प्रदेशाला देश महणतात. देशावरील जमिनीचा पोत आणि कस यांत फार विविधता आहे. वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सातारा-कोल्हापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे, तर नगर-सोलापूरकडाची जमीन बव्हंशी कोरडी, रूक्ष आणि परिणामी नापीक, कोकणच्या मानाने देशावरची शेती अधिक बरकतीची आहे. पण एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील लोकांना शेतीभाती पिकविण्यासाठी फार मेहनत करावी लागते. एका मुडपलेल्या पंखावर कोकण आणि दुसऱ्या पसरलेल्या पंखावर देश असा सह्याद्री उभा आहे. त्याच्या पूर्वेकडच्या उतारावर त्याच्या शाखांमुळेच खोरी निर्माण झाली आहेत, त्यांना मावळ म्हणतात. सह्य सातपुडाच्या सपाट माथ्यांवर ठायीठायी किल्ले उभे आहेत. एवढे दुर्ग जगात दुसऱ्या कोणत्याही पर्वतावर नाहीत. याचा अर्थच असा की मराठ्यांना या सह्याद्रीने भक्कम संरक्षण दिलेले आहे आणि त्या बळावरच आक्रमकांचा प्रतिकार ते करू शकले. याशिवाय डोंगराकड्यांवर अनेक मंदिरे बांधलेली आहेत. मुळातच चित्रिविचित्र असलेली सह्याद्रीची मस्तके किल्ल्यांनी आणि मंदिरांनी नटलेली असल्यामुळे सह्याद्रीच्या परिसरातील क्षितिजरेषा चित्राकार झालेल्या आहेत. सह्याद्रीच्या कुशीत कोरलेल्या गुंफांतून प्राचीन काळची सौंदर्याची लेणी आपण पाहू शकतो. प्रचंड खडक, ताशीव कडे, मुकुटावर शिखरे, उंचउंच बोडके सुळके,अधूनमधून किर्र झाडीने भरलेलेया दऱ्या अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे सह्याद्रीला फार वेगळे सामर्थ्य आणि सौंदर्य प्राप्त झाले आहे.
|