NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store
MarathiMati.com - Android App on Google Play Store

गोखरु

Gokharu

गोखरु
गोखरु

गोखरु ह्याला काही भागात ‘सराटे’ असेही म्हणतात. निसर्गाने विनासायास उपलब्ध करून दिलेली ही औषधी वनस्पती असून गावात व गावाबाहेर सहज, हवी तेवढी मिळू शकते. गोखरू म्हणजे गावाबाहेरील त्रासदायक काटेरी वनस्पती वीर्यवर्धक आणि मुत्रखडानाशक म्हणून हिची ख्याती आहे. विनामूल्य भरपूर उपलब्ध होणार्‍या या वनस्पती औषधीचा लाभ घेऊन पहाण्यास हरकत नाही.

गोखरूची रोपटी पावसाळ्यात सर्वत्र विशेषतः पडीक जागेत आपसुक उगवलेली आढळतात. रोपटे फूट-दीड फूट उंच व पसरट असते. पाने हरभरा अथवा तीळाच्या पानासारखी बारीक असतात. फुले लहानशीच व पिवळी असतात. मुळ्यांना एक प्रकारचा उग्रवास असतो. ह्याचे दोन प्रकार आढळतात. लहान गोखरू आणि मोठा गोखरू. ह्या दोन जाती रोपट्याची लहान-मोठी पाने आणि लहान-मोठी फळे (गोखरू) ह्याच्या आकारावरून वेगळ्या मानल्या जात आसल्या तरी या दोन्ही जातीतील औषधी गुणधर्म सर्वसाधारणतः सारखेच असतात.

गोखरूत विविध क्षार तत्व, स्थिर तेल, गंधयुक्त द्रव्य, राळ, नायट्रेट इत्यादी आढळतात.

औषधदृष्ट्या गोखरू मूत्रसंस्थेवर प्रभावकारक असून नाडी-शक्तिवर्धकही आहे. याशिवाय कृमिनाशक, कफ-पित्तनाशक, सूज नाशक, शक्तिवर्धक व बलवर्धक रसायन मानण्यात येते.

औषध रूपाने प्रमुखतः ह्या फळाचाच उपयोग करतात. पण ह्याचा उपयोग करण्यापूर्वी शुद्ध तुपात थोडे भाजून शुद्ध करून घ्यावे.

गोखरू मूत्रसंस्थेवर अत्यंत गुणकारी आहे. विशेषतः लघवी मार्गात मूत्रखडा म्हणजे ‘युरीन स्टोन’ होऊन तघवी थेंब थेंब व अत्यंत कष्टदायक होत असेल तर गोखरूचे चूर्ण करून साधारणतः लहान चमचाभर मधातून चाटण घेत रहावे. त्यावर शेळी अथवा मेंढीचे दूध घ्यावे. मूत्रखडा कणकण तुटून नष्ट होऊ लागतो. शेवटी त्याचा आकार लहान होतात. लघवीतून बाहेर पडून जातो. हा प्रयोग ८-१५ दिवस करीत रहावा. ह्याच्या काट्यात मूत्रखडा कण कण तोडण्याचा विशेष गुण आहे.

गोखरूचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय वैद्यक शास्त्रात ह्याला उत्तम वीर्यवर्धक व पौरूष्य शक्तिवर्धक मानण्यात येते. कामशक्तीवर्धक विभिन्न औषधीत गोखरूचा उपयोग प्रामुख्याने करण्यात येतो.

प्रमेह, गरमी, प्रमा ह्या विकारग्रस्त रूग्णांनी ह्याचे चूर्ण मधासोबत चाटत रहावे. अथवा गोखरू दोन भाग व एक भाग ओवा टाकून त्याला काढा तयार करावा. हा काढा चवीपुरता साखर भेसळ करून पित रहावा. गोखरू रोपाच्या पानाचा रस काढून तोही मध अथवा साखर टाकून घेता येतो.

शरीर पुष्ट करावयाचे असल्यास गोखरूचे लहान चमचाभर चूर्ण ग्लासभर दुधात टाकून घेत रहावे. त्यात चवीपुरती साखर टाकावी.

आमवातावर गोखरूच्या काढ्यात थोडी सुंठ मिळवून हा काढा पित राहील्यास लाभ होऊ शकतो.

शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक होऊन त्यापासून कोणता विकार झाला असल्यास गोखरूचा काढा साखर अथवा मध टाकून घ्यावा.

गोखरूचा उपयोग करून ‘गोक्षुरादी घृत’ आणि ‘गोक्षुरादी अवलेह’ तयार करतात. उपरोकत बहुतेक सर्व विकारांवर सर्वसामान्य औषधीच्या रूपाने यांचा उपयोग करता येतो. विविध औषधी निर्माण करणारे कारखाने घृत व अवलेह तयार करून विकतात. हे घृत व अवलेह पौष्टिक टॉनिक रूपानेही सेवन करून त्यापासून यथोचित लाभ घेता येतो.

असा हा गोखरू गावाबाहेर आपसूक उगवत असल्याने निसर्गदत्त मौलिक औषधी आहे. त्याचा यथाशक्य लाभ घ्यावा.


MarathiMati.com - Android App on Google Play Store