वेलीवरच्या, कळी फुलाची,
वेलीवरच्या, कळी फुलाची, हवी काळजी घ्याया
उपवर झालेल्या, स्वप्नाची, हवी काळजी घ्याया
चाहुल देते हूल कधी, कधी चकवितो, भास तुझा
मलाच आता, आभासाची, हवी काळजी घ्याया
प्लॉट पडावे, तसेच पडतिल, आज ना उद्या तुकडे
अतापासुनी, आकाशाची, हवी काळजी घ्याया
एक अस्मित, विकल्यावरती, काय राहते मागे
स्वतःच अपुल्या, अस्तित्वाची, हवी घ्याया
स्वप्नासम तकलादू झाले, शब्द, प्रतिज्ञा, वचने
प्रत्येकाने, विश्र्वासाची, हवी काळजी घ्याया
कालीदासा, तूच सांग रे, काय करू मी आता
डोळ्यांमधल्या, आषाढाची, हवी काळजी घ्याया
अनावधाने, घडले त्याची, इतुकी कठोर शिक्षा
सांग एकदा, कशाकशाची, हवी काळजी घ्याया
नाचक्की तर होतच असते, होतो बोभाटाही
पानिपानी, इतिहासाची, हवी काळजी घ्याया
माथ्यावरचा, सूर्य `इलाही', ढ्ळू लागल्यावरती
आरशातल्या, प्रतिबिंबाची, हवी काळजी घ्याया
|