वठलेल्या वृक्षांनीही,
वठलेल्या वृक्षांनीही, आमुच्या रोखल्या वाटा
जाऊ द्या आम्हा पुढती, देतील सावल्या वाटा
प्रत्येक पावलासाठी, नवनवे अडथळे होते
ज्या खडतर, अवघड, दुर्गम, आम्हास भावल्या वाटा
घेऊन संगिनी हाती, पळणारे बूट अघोरी
घोडयांच्या टापांखाली, निष्पाप चिरडल्या वाटा
पथिकांची फसगत केली, ते दिशाहीन भरकटले
विश्र्वासू वाटाडयांनी, वाटेस लावल्या वाटा
जी आली वाटयाला ती, मी वाट चालतो आहे
नशिबाने ज्याच्या त्याच्या हातावर लिहिल्या वाटा
सुटकेची धडपड केली, की आव आणला होता
मोहाने बरबटलेल्या, पायास चिकटल्या वाटा
चाकोऱ्या परंपरेच्या, की कक्षा प्रथा रुढींच्या
पायात रुतावा काटा, या तशाच रुतल्या वाटा
जन्माचा ठाव ठिकाणा, ना मरणाचीही भीती
आल्यात कोठुनी वाटा, अन् कुठे चालल्या वाटा
मायावी वाटेवरती, चकव्यांची चकवाचकवी
जाणशी `इलाही' तूही, मी कशा चकवल्या वाटा
|