वास्तव आणी, विस्तव मधला,
वास्तव आणी, विस्तव मधला, फरक न्यहाळत होतो
नैराश्याच्या, लोचनातला, नरक न्यहाळत होतो
जन्म-मृत्यूची नोंदच केवळ, ओळख म्हणुनी उरली
कबरीवरचा, केविलवाणा, फलक न्यहाळत होतो
धुक्याहुनही, धूसर पडदा, दूर जाहल्यावरती
स्वप्नामधल्या, वास्तवतेची, झलक न्यहाळत होतो
ज्योतीचे ते, कौर्य पाहुनी, काळवंडली आभा
खऱ्या प्रीतिच्या, वेडाची मी, धडक न्यहाळत होतो
गरजत होता, बरसत होता, सागर उधाणलेला
स्थितप्रज्ञासम, अचल असा तो, खडक न्यहाळत होतो
उत्तम गुण अन् उत्तम पदवी, उत्तम गौरव झाला
अर्धी भाकर, दिसेल म्हणुनी, पदक न्यहाळत होतो
खुणा कोणत्या, सांग, `इलाही', सोडल्यास तू मागे
जाता जाता, खांद्यावरुनी, सडक न्यहाळत होतो
|