वाट चालण्या, पाउल आता,
वाट चालण्या, पाउल आता, गगन मागते आहे
नग्न गरीबी, मखमालीचे, वसन मागते आहे
भीती नाही, तिला जिवाची, हवी काळजी घ्याया
लवलवणारी, ज्योत दिव्याची, पवन मागते आहे
उदासवाणी, नजर पोरकी, हिंडे दारोदारी
नयनी यावे, तेज म्हणोनी, सपन मागते आहे
पिंजऱ्यातला, पक्षी-आशा, बंड करोनी उठली
रहावयाला, शुभ्र ढगांचे, सदन मागते आहे
वांझपणाचा, शाप अघोरी, दिला लतेला कोणी?
वसंताकडे, अगतिकतेने, सुमन मागते आहे
किती खायच्या, ठेचा अजुनी, किती खायच्या ठेचा?
बोट आंधळे, वाटेकडुनी, नयन मागते आहे
हट्ट तिचा, पुरविण्या नेहमी, प्रीती तत्पर असते
आज वंचना, ह्रदयाचेही, हवन मागते आहे
माझ्या नांवापुढे `इलाही', नांव तुझे दे मजला
हात तुझा दे, साथ तुझी दे, वचन मागते आहे
|