त्या पुष्पाच्या, काळजावरी,
त्या पुष्पच्या, काळजावरती, कातळ लिहिले होते
तृषार्त माझ्या, ओठांवरती, मृगजळ लिहिले होते
भेट म्हणोनी, आठवणींचे, पुस्तक देउन गेली
मुखपृष्ठावर, दरवळ, मागे, मोहळ लिहिले होते
शान्ततेस का, दोष द्यायचा, नियतीची ही करणी
तिच्या अभागी, भाळावरती, वादळ लिहिले होते
अथांग सागर, विशाल सागर, तरी कसा दुर्दैवी
ललाटावरी, त्याच्याही, वडवानळ लिहिले होते
अक्षर अक्षर, तळव्यावरचे, मेंदीने गिळलेले
नयनी काजळ, गालावरती, ओघळ लिहिले होते
अखेर वादळ, पळून गेले, नाही जमले त्याला
त्या ज्योतीच्या, वलयावरती, ओंजळ लिहिले होते
आठवणींची, आभासांची, अन् स्वप्नांची गर्दी
एकान्ताच्या, दारावरती, वरदळ लिहिले होते
डोकावुन मन. बघते म्हणुनी, तरतुद ही केलेली
गतकाळाच्या, खोलीवरती, अडगळ लिहिले होते
कसे जाहले, गढूळ जीवन, कुणी `इलाही' केले
लिहिणाऱ्याने, लिहिताना तर निर्मळ लिहिले होते
|