तुझ्या घराचे, अंगन बनुनी,
तुझ्या घराचे, अंगन बनुनी, राहू दे मजला
तुझ्या घराची, वळचण बनुनी, राहू दे मजला
साज तुझा, शृंगार तुझा मी, व्हावेसे वाटे
कुंकुम, कंकण, पैंजण बनुनी, राहू दे मजला
ह्रदयी माझ्या, पहावीस तू, तुझी छबी सखये
आरस्पानी, दर्पण बनुनी, राहू दे मजला
आभासाने सर्व दिले, सहवासाने छळले
आता केवळ, सुमिरण बनुनी, राहू दे मजला
विरहाच्यां वणव्यात जाहली, ह्रदयाची होळी
अता यापुढे, श्रावण बनुनी, राहू दे मजला
मला मिळाला, मौल्यवान तव, प्रीतीचा ठेवा
हिरा सखी तू, कोंदण बनुनी, राहू दे मजला
तळहाताच्या, मेंदीचाही, रंग फिका होतो
तुझ्या अन्तरी, गोंदण बनुनी, राहू दे मजला
तुझ्या निरागस नययी करण्या, स्वागत स्वप्नांचे
पापण्यांवरी, तोरण बनुनी, राहू दे मजला
उलावीस तू, फुलावीस तू, परिमल तू व्हावे
मधुमासाचे, कारण बनुनी, राहू दे मजला
जुन्या कहाण्या, नकोत मजला, नको भाकिते ही
तुझ्या स्पंदनाचा क्षण बनुनी, राहू दे मजला
चकोर तू आहेस `इलाही', तृषार्त प्रीतीचा
तुझ्याचसाठी, चांदण बनुनी, राहू दे मजला
|