मुक्त्तक
हां! नाव गाव माझे, बदलून पाहिले मी
अन् मुखवटे हजारो, चढवून पाहिले मी
मी काय काय केले, सांगू किती कुणाला?
तळहात आज दोन्ही, उसवून पाहिले मी
स्वतःचा चेहरा नाही,
स्वतःचा चेहरा नाही, स्वतःचा, दाखला नाही
उतारा सात बाराचा, कधी मी, काढला नाही
सशाची हार झालेली, कथा मी, वाचली होती
कुठेही थांबलो नाही, विसावा, घेतला नाही
कधी आकाश फाटावे, कधी धरणी दुभंगावी
स्वतःच्या अस्तनीचाही, भरोसा, राहिला नाही
दिले भरपूर डोळयांना, दिले भरपूर ह्रदयाला
अखडता हात स्वप्नांनी, कधीही, घेतला नाही
फुले शापित असावी का? असावी रातराणीची!
रवीचा चेहरा त्यांनी, कधीही, पाहिला नाही
दिले का घोटभर पाणी, कधी आकाशगंगेने?
`इलाही' मृगजळामागे, कधीही, धावला नाही
|