शब्दांचे अंतरंग, जाणशील,
शब्दांचे अंतरंग, जाणशील, तर कळेल
अर्थांचे पोत, पदर, परखशील, तर कळेल
मखमाली वाटेवर, कळप चालतात फक्त्त
पायंडा, तू नवीन, पाडशील, तर कळेल
घरभेद्या स्वप्नांना, घेतलेस, तू घरात
घातपात, झाल्याचे, पाहशील, तर कळेल
लुबाडून, वा लुटून, सौख्य लाभले कुणास
जे आहे, जवळ तुझ्या, वाटशील, तर कळेल
सोन्याचे सोनेपण, सिद्ध होतसे मुशीत
श्रद्धेचे पुस्तक तू, चाळशील, तर कळेल
सत्त्वपरिक्षा असेल, वा तुझे असेल दैव
सत्यांच्या पात्यावर, चालशील, तर कळेल
काय खरे, काय बरे, कळायला, हवे तुला
जग उघडया डोळ्यांनी, पाहशील, तर कळेल
एकमेव पुस्तक `मी', समजण्यास, अवघड पण
पुन्हा पुन्हा एकान्ती, वाचशील, तर कळेल
टाकीच्या घावाचे, मोल तू, करू नकोस
शिल्प स्वतःचे स्वतःच, घडवशील, तर कळेल
नयनरम्य सृष्टी ही, जीवनही मधूर गोड
बघण्याचा दृष्टिकोन बदलशील तर कळेल
आरशास सांगतेस, मनोगते, तुझी सदैव
`इलाही'स माळलेस, भेटशील, तर कळेल
|