प्रवाहातल्या, ओंडक्यापरी,
प्रवाहातल्या, ओंडक्यापरी, वाहतोस आता
जे सोयीचे, तेच खरे तू, मानतोस आता
अमृत अमृत, जप तप व्रत तव, अमृतमय वाणी
हलाहलाचे, घोट लीलया, पाजतोस आता
कधी भरवसा, ठेवलास का, विश्र्वासावरती?
कधी कुणाचा, खिसा, गळा तू, कापतोस आता
खेळण्यापरी, मोडतोड तू, केली स्वप्नांची
रात्ररात्रभर, स्वप्नांसाठी, जागतोस आता
मृगजळ म्हणजे, काय नेमके, समजलेच नाही
कांचनमृग सौख्याचे धरण्या, धावतोस आता
ध्येयावरती, नजर तुझी अन्, ध्येय क्षितिजरेषा
काय चिरडले पायी, कोठे पाहतोस आता?
भिती वाटते, तुला स्वतःची, काय असे घडले
पुढयातला, प्रत्येक आरसा, फोडतोस आता
विशालपण घेतले मनाचे, तुझ्या बंगल्याने
दारिद्रयाची, जुनी ठिकाणे, टाळतोस आता
तीच सावली, खरी `इलाही', देते जी छाया
उन्हाकडे तू, कसली भिक्षा, मागतोस आता?
|