मुक्त्तक
किरणांची, आर्जवे करोनी, वस्ती थकली बाबा
अंधाराच्या, ओझ्याने ती, दबली खचली बाबा
भल्याबुऱ्याची, जाणिव झाली, या वस्तीला आता
बघता बघता, अंधराशी, गट्टी जमली बाबा
प्राक्त्तनापुढे, हात टेकले,
प्राक्त्तनापुढे, हात टेकले, हरलो बाबा
मी माझेपण, जपता जपता, दमलो बाबा
आघातानी, सांग कुठे, कुचराई केली
वज्राहुनही, कठोर आता, बनलो बाबा
संवेदनशिल, दिलेस मन तू, दिलीस प्रतिभा
फुलाप्रमाणे, कवितेमधुनी, फुललो बाबा
चंदनापरी, झिजलो त्याची, फळे मिळाली
उपकाराच्या, ओझ्याने मी, दबलो बाबा
हे श्र्वासांच्या, संख्येवर का, ठरवायाचे?
जगलो म्हणजे, काय नेमके, जगलो बाबा
ज्या वृक्षाच्या, छायेमध्ये, उन्हे बैसली
विसाव्यास मी, तिथे घडीभर, बसलो बाबा
कुणी ओढले पाय, तर कुणी, वाट ओढली
तुझ्यामुळे मी, आजवरी, सावरलो बाबा
वाटाडयाने, वाट लावली, लुटले मजला
असा कसा मी, परावलंबी, बनलो बाबा
मी न तारका, मी न आरसा, पतंग नाही
तरी कसा मी तुटलो, फुटलो, कटलो बाबा?
एक चक भाकरी रथाचे, दुसरे पैसा
अश्र्व स्वतः मी, स्वतः सारथी, बनलो बाबा
ओढ तुझ्या भेटीची मज, लागली `इलाही'
अखेर श्र्वासांच्या विळख्यातुन, सुटलो बाबा
|