फूल नको, दे हात मला तू,
फूल नको, दे हात मला तू, हाच साजणी हुंडा
जीवनभर दे साथ मला तू, हाच साजणी हुंडा
आंदण म्हणुनी, नको बंगला, नको हवेली कोठी
घे अपुल्या, पदरात मला तू, हाच साजणी हुंडा
प्राजक्त्तासम, टपटपणारा, शिंप सडा प्रीतीचा
चिंब भिजव, प्रेमात मला तू, हाच साजणी हुंडा
नजरेने, कुरवाळ आपुल्या, दे जागा तू ह्रदयी
बघू नको, पाण्यात मला तू, हाच साजणी हुंडा
मधुमासासम, सहवासाचा, गंध मनी दरवळतो
हवीस हर, श्र्वासात मला तू, हाच साजणी हुंडा
निरांजने, मंदिरी तेवती, तसा तेवू दे मजला
ठेव तुझ्या, ह्रदयात मला तू, हाच साजणी हुंडा
हुंडा तर मज, हवाच आहे, सांग तुझ्या आप्तांना
मिळावीस, हुंडयात मला तू, हाच साजणी हुंडा
असेल माझी, सदा मागणी, (पण) आशिर्वचनांची
बघ या, हव्यासात मला तू, हाच साजणी हुंडा
हुंडयाचा, नरभक्षक गिळतो, रोज हजारो अबला
नकोस ओवू, त्यात मला तू, हाच साजणी हुंडा
आरशापरी, अणुरेणूवर, बिंब तुझे उमटावे
तुझ्यात मी, माझ्यात मला तू, हाच साजणी हुंडा
|