पाखरांसाठी म्हणोनी,
पाखरांसाठी म्हणोनी, लावले बुजगावणे
पीक घेवोनी फरारी, जाहले, बुजगावणे
अडमुठा मी, मी अशिक्षित, आजवर होतो खरा
पूर्ण केला, ``कोर्स राखण'', बोलले बुजगावणे
कुंपणाने, शेत खावे, हीच अमुची संस्कृती
शेवटी, होऊन हतबल, चालले बुजगावणे
राखणीला, बहर आला, कोरडे पडले तळे
पाहुनी, रखवालदारी, हासले बुजगावणे
सनसनाटी बातमीने, थक्क झाले गांवही
पाखरांनी, खून केला, मारले बुजगावणे
ना सगा, ना सोयरा, ना सोबती, त्याचा कुणी
पाहिले, जेथे म्हणोनी, एकले बुजगावणे
कालवर, केवळ शिवारी, पाहिली बुजगावणी
आजला, हर माणसाचे, जाहले बुजगावणे
आजची, शेती घरांची, बंगल्यांची, जाहली
नाव गुरख्याचे, `इलाही', ठेवले बुजगावणे
|