नकोस सांगु, सखी मला
नकोस सांगु, सखी मला तू, सरला चांदणचुरा
ओंजळ ओंजळ, देत रहा गं, मजला चांदणचुरा
सहवासाने, तुझ्या जरासे, तेज मला लाभले
तुझ्यामुळेही, या ह्रदयाचा, बनला चांदणचुरा
अंधाराने भेट दिली वा, दिली मला देणगी
रित्या रिकाम्या, घरात माझ्या, भरला चांदणचुरा
``चमचमणारे कण वाळूचे'' म्हणणारे ऐकले
रत्नपारखी खराच मी, पारखला चांदणचुरा
दगा दिला झोळीने माझ्या, हजार छिद्रे तिला
बघता बघता, गळून पडला, सगळा चांदणचुरा
आवेगाने, मी चंद्राला, अशी मारली मिठी
झंझावाती कवेत माझ्या, उरला चांदणचुरा
दूर निघोनी, जाण्यासाठी, भेटलीस तू मला
तू गेल्यावर, गालावर, ओघळला चांदणचुरा
अता कशाला, तुझ्या स्मृतींचा, वावर भवती हवा?
दारे खिडक्या बंद, छतातुन, झरला चांदणचुरा
सर्वतोपरी इलाज केले, बरी जाहली नाही
हट्टी जखमेमधे शेवटी, भरला चांदणचुरा
चिता प्रीतिची, विझली आता, विझला चांदणचुरा
कर्तव्याची आच, तिने सावडला चांदणचुरा
वळवानंतरच्या पागोळ्या, तशा तिच्या पापण्या
स्वतः `इलाही', अधराने, मी टिपला चांदणचुरा
|