नांव तुझे मी, लिहिले
नांव तुझे मी, लिहिले वेडया, अश्रूंवरती
गांव तुझेही, वसले वेडया, अश्रूंवरती
असली नकली, नकली असली, कळले नाही
खरोखरी मी, फसले वेडया, अश्रूंवरती
अखेर त्याला, कळली नाही, व्यथा मनीची
विसंबून मी, बसले वेडया, अश्रूंवरती
आस आसवे, ध्यास आसवे, श्र्वास आसवे
आजवरी मी, जगले वेडया, अश्रूंवरती
काडीचा, आधार मिळावा, बुडणाऱ्याला
जीवन माझे, तरले वेडया, अश्रूंवरती
भेटीगाठी, होत राहिल्या, एकान्ती अन्
मन माझेही, जडले वेडया, अश्रूंवरती
जाळलेस तू, झाड `इलाही', नयनांचे पण
अंकुर ताजे, फुटले वेडया, अश्रूंवरती
|