मिळावयाचा, नाही इथल्या,
मिळावयाचा, नाही इथल्या, वळचणीसही थारा
जगू द्यायचा, नाही मजला, तुझ्या गांवचा वारा
फूल टपोरे, सोडुन गेले, थेंब टपोरे मागे
स्वप्नांचा आषाढ जाहला, कोसळती जलधारा
कसा भरवसा ठेवायाचा, आरशावरी आता
छबी घेउनी, फरार झाला, काचेवरला पारा
आजादीचे, स्वातंत्र्याचे, स्वैर मुक्त्तचे भोक्त्ते
जो तो येथे, बांधत आहे, स्वतःभोवती कारा
काचा-कवडयांच्या खेळाने, महान त्यांना केले
कुणी तरी भेटेल इथे मज, रत्ने पारखणारा
चंद्र सूर्य ग्रहणाने शापित, बने तारका उल्का
अथांग असुनी, विशाल असुनी, सागर खारा खारा
शंख शिंपले काठावरती, माणिक, मोती उदरी
म्हणून तो, अनमोल खजीना, सहज न सापडणारा
आकाशाला किनार आहे, काठ असे सिंधूला
दाणा दाणा, टिपून चिमणी, पिलास भरवी चारा
मदांध सत्ताधिशाप्रमाणे, नकोस वागू सूर्या
आज ना उद्या, कधी तरी, उगवेल दुपारी तारा
फूलपाखरू, चिमटीमध्ये, धरणे सोपे आहे
सांग `इलाही', सहजासहजी, सापडेल का पारा?
|